दारू तीच, फक्त बाटली बदलली, फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला, राहुल गांधींना चीनच्या देणग्यांवरून सवाल
राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांचाही उल्लेख करत त्यांनी व्हिएतनाम आणि थायलंडला जाण्याच्या कारणांवर प्रश्न उपस्थित केले.
Chief Minister Fadnavis takes aim at Rahul Gandhi’s stance : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोक्तांत्रा बचाव यात्रेतील सभेतून काँग्रेससह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विरोधकांकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चांवर आक्षेप घेत, हे मोर्चे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या आधारे निर्माण झालेल्या घटनात्मक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसला चीनकडून मिळणाऱ्या कथित देणग्यांचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांच्यावर देखील थेट प्रश्नांची सरबत्ती केली.
फडणवीस म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्यानंतर आता राहुल गांधी देखील नागरिकांचे मूलभूत अधिकार संपुष्टात आणण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा आरोप विरोधकांवर होत आहे. इंदिरा गांधींचा नातू आता पुन्हा तेच घेऊन रस्त्यावर उतरला आहे. दारू तीच आहे, फक्त बाटली बदलली आहे, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांचाही उल्लेख करत त्यांनी व्हिएतनाम आणि थायलंडला जाण्याच्या कारणांवर प्रश्न उपस्थित केले.
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने चीन हा महत्त्वाचा धोका असल्याचे सांगत फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या ट्रस्टला चीनकडून देणगी का मिळते, असा सवाल केला. भारताला पाण्यात पाहण्यासाठी आणि भारतात घुसखोरी करण्यासाठी कोणता देश आतूर आहे, तर तो चीन आहे. मग चीनकडून काँग्रेस आणि तुमच्या ट्रस्टला डोनेशन का मिळत आहे? असा प्रश्न त्यांनी राहुल गांधी यांना उद्देशून केला. चीनच्या पैशांच्या माध्यमातून भारतात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘मोदीजींचा बाप काढणाऱ्यांना महाराष्ट्र खड्ड्यात गाडेल’; एकनाथ शिंदेंचा इंडिया आघाडीला इशारा
विरोधकांकडून हातात लाल रंगाचे संविधान घेऊन आंदोलन केले जात असल्याचा संदर्भ देत फडणवीस यांनी त्यावरही टीका केली. लाल संविधान हा केवळ मास्क आहे, मुखवटा आहे. या लाल पुस्तकाचा वापर करून षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमधील घटनात्मक बदलांचा उल्लेख करत अशाच प्रकारची रणनीती भारतात राबवली जात असल्याचा दावा त्यांनी केला. विरोधक संविधानावर थेट टीका करत नसले, तरी संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांना लक्ष्य करून त्यांची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
संविधान खराब आहे, असे म्हटले तर लोक विरोध करतील. त्यामुळे संविधानाने तयार केलेल्या संस्थांना बदनाम केले जात आहे, असे ते म्हणाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG), संसद आणि निवडणूक आयोग यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात असल्याचे सांगत फडणवीस यांनी न्यायव्यवस्थेलाही लक्ष्य केले. संसदेत निर्णय घेण्याऐवजी रस्त्यावर निर्णय घेण्याची भूमिका मांडली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या न्यायालयांबद्दलही अपमानास्पद वक्तव्ये केली जात असल्याचे सांगत, हीच अराजकता निर्माण करण्याची प्रक्रिया असल्याचा दावा त्यांनी केला.
एकूणच, ‘लोकतंत्र बचाव’ यात्रेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी काँग्रेसच्या आंदोलनांवर, राहुल गांधी यांच्या भूमिकेवर आणि विरोधकांच्या संविधानविषयक मुद्द्यांवर जोरदार टीका केली. त्यांच्या या विधानांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.