घरात पत्नी-मुलं असतानाही संजय गुप्ता यांच्यासोबत घडलं काय?, स्वयंपाकघरातील अपघाताचा तपशील समोर

Sanjay Gupta Death : घरात कुटुंबीय उपस्थित असतानाही संजय गुप्ता यांच्यासोबत घडलेली दुर्घटना उशिरा लक्षात आली, रात्रीचा घटनाक्रम समोर आला आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 01T141712.552

Sanjay Gupta Death : बॉलिवूडमधील दिग्दर्शक संजय गुप्ता (Gupta) यांच्या निधनामागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे. 30 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वर्सोवा येथील राहत्या घरी स्वयंपाकघरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, त्यावेळी घरात पत्नी, दोन मुलं आणि नोकर उपस्थित होते. मात्र, रात्रीच्या वेळी सर्वजण झोपलेले असल्याने ते पडल्याची घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. काही वेळानंतर कुटुंबीयांना ते खाली पडल्याचे समजले आणि त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गुप्ता स्वयंपाकघरात असताना त्यांचा पाय घसरला असावा आणि त्यामुळे ते खाली कोसळले असावेत, असा प्राथमिक तपासातील अंदाज आहे. पडताना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घरात इतर सदस्य असतानाही ही घटना कोणाच्याही लक्षात कशी आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत असला तरी रात्रीच्या वेळी सर्वजण झोपलेले असल्याने हा प्रकार उशिरा समोर आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मोठी बातमी : प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा बाथरूममध्ये पडून मृत्यू

या घटनेबाबत कुटुंबीयांनी कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. वर्सोवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपशिखा वारे यांनीही प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळली नसल्याची माहिती दिली आहे. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. डीसीपी पुरुषोत्तम कराड यांनीही या प्रकरणातील प्राथमिक माहिती दिली आहे. सध्या तरी हा अपघात असल्याचा पोलिसांचा अंदाज असून तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.

संजय गुप्ता हे बॉलिवूडमध्ये क्राइम ड्रामा, गँगस्टरपट आणि ॲक्शन थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखले जात होते. ‘कांटे’, ‘आतिश’, ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’, ‘शूटआऊट ॲट वडाळा’ आणि ‘काबिल’ यांसारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. 1994 मध्ये संजय दत्त, आदित्य पांचोली आणि रवीना टंडन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘आतिश : फील द फायर’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. वेगळ्या कथानकांची निवड आणि दमदार ॲक्शन सादरीकरण ही त्यांच्या चित्रपटांची वैशिष्ट्यं होती. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.

follow us