पावसाच्या खंडामुळं रब्बी हंगामाचं नियोजन रखडलं; 3 जिल्ह्यांत पेरणीचं आव्हान

पावसाची मोठी तूट आणि जमिनीतील कमी ओलाव्यामुळे मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांच्या रब्बी हंगामावर यंदा अनिश्चिततेचं सावट

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 31T165111.756

Rabi Sowing in Marathwada : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत यंदा रब्बी हंगामाचे नियोजन प्रत्यक्षात उतरणे कठीण दिसत आहे. पावसातील खंड आणि दुष्काळी परिस्थितीमुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणीचे उद्दिष्ट गाठण्यावर मर्यादा आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विभागीय संशोधन सल्लागार समितीच्या बैठकीत आतापर्यंत झालेल्या पेरणीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार आता पाऊस झाला तरी तिन्ही जिल्ह्यांतील 20 टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पेरणी होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील रब्बीचे सरासरी क्षेत्र 7 लाख 28 हजार हेक्टर आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 लाख 39 हजार हेक्टर, जालना जिल्ह्यातील 2 लाख 12 हजार हेक्टर आणि बीड जिल्ह्यातील 2 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मात्र, यंदाच्या पावसातील खंडामुळे या सरासरी क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता कमी झाली आहे.

मागील 5 वर्षांत या तिन्ही जिल्ह्यांत सरासरी 9 लाख 49 हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. तर 2025-26 च्या रब्बी हंगामात सुमारे 10 लाख 94 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 लाख 12 हजार हेक्टर, जालना जिल्ह्यातील 3 लाख 14 हजार हेक्टर आणि बीड जिल्ह्यातील 4 लाख 68 हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश होता. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा मात्र पेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटण्याची चिन्हे आहेत.

दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 1,835 कोटी जमा

यंदा एल निनोचे संकट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून कृषी विभागाने केवळ 2 लाख 70 हजार हेक्टरवर रब्बीचे नियोजन केले आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 83 हजार हेक्टर, जालना जिल्ह्यातील 91 हजार हेक्टर आणि बीड जिल्ह्यातील 96 हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता या नियोजित क्षेत्रावरही पेरणी होणे अवघड दिसत आहे. जमिनीत पुरेशी ओल नसणे आणि सिंचनासाठी जलस्रोत उपलब्ध नसणे, या अडचणी शेतकऱ्यांसमोर कायम आहेत.

रब्बी पिकांच्या नियोजनात ज्वारीसाठी 1 लाख 20 हजार हेक्टर, गव्हासाठी 20 हजार हेक्टर, मक्यासाठी 30 हजार हेक्टर आणि हरभऱ्यासाठी 90 हजार हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय इतर तृणधान्यांसाठी 6 हजार हेक्टर, इतर कडधान्यांसाठी 3 हजार हेक्टर आणि इतर गळीतधान्यांसाठी केवळ 1 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने हे उद्दिष्ट गाठणेही कठीण ठरण्याची शक्यता आहे.

पावसातील खंडाचा पिकांना फटका

यंदाच्या पावसाळ्यात तिन्ही जिल्ह्यांत सरासरी 583.63 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात 412.57 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच सरासरीच्या सुमारे 70 टक्के पाऊस झाला आहे. मात्र, केवळ एकूण पावसाची आकडेवारी समाधानकारक दिसत असली तरी त्याचे वितरण योग्य पद्धतीने झालेले नाही. 2.5 मिलिमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाल्यास तो पावसाचा दिवस म्हणून मोजला जातो. त्यामुळे पावसाचे दिवस आणि दोन सरींमधील अंतर यांचाही पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.

अल्प ते अत्यल्प पाऊस आणि त्यातही मोठ्या प्रमाणात पडलेल्या खंडामुळे झालेला पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत सरासरीच्या 74 टक्के, तर बीड जिल्ह्यात त्याहून कमी म्हणजे सरासरीच्या 63 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पावसातील या तुटीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्याचा परिणाम आता रब्बी हंगामाच्या नियोजनावरही दिसत आहे.

एकूणच, मागील वर्षी 10 लाख 94 हजार हेक्टरवर झालेली रब्बीची पेरणी यंदा मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन 2 लाख 70 हजार हेक्टरचे नियोजन केले असले तरी प्रत्यक्ष पेरणीचे क्षेत्र यापेक्षाही कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जमिनीत ओलावा नसणे, सिंचनासाठी पाण्याची अनुपलब्धता आणि पावसातील खंड यामुळे शेतकऱ्यांसमोर रब्बी हंगाम सावरण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

follow us