लंडनमधून परतली, कुटुंबीयांपासून संपर्क तुटला; पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅटमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह

Mugdha Deshmukh : लंडनमध्ये उच्चशिक्षणासाठी गेलेल्या तरुणीचा अचानक संपर्क तुटला आणि कुटुंबीयांनी शोध सुरू केला. पण, धक्कादायक प्रकार उघड.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 30T214129.556

Mugdha Deshmukh Death Case : लंडनमध्ये एमबीएच्या शिक्षणासाठी गेलेल्या (Pune) छत्रपती संभाजीनगर येथील 34 वर्षीय मुग्धा अविनाश देशमुख यांचा मृतदेह पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे येथील लोढा बेलमोंडो या आलिशान सोसायटीतील बंद फ्लॅटमध्ये आढळून आला आहे. अनेक दिवसांपासून संपर्काबाहेर असलेल्या मुग्धा यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे निवृत्त मुख्य अभियंता अविनाश देशमुख यांच्या कन्या होत्या.

मुग्धा जुलै 2025 मध्ये एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला गेल्या होत्या. तिथे असतानाही त्यांचा कुटुंबीयांशी नियमित संपर्क होता. मात्र, 23 ऑक्टोबर 2026 रोजी आईशी शेवटचं बोलणं झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कुटुंबीयांनी लंडनमधील त्यांच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता, मुग्धा यांनी ऑगस्ट 2026 च्या अखेरीसच लंडन सोडल्याची माहिती मिळाली. भारतात परतल्यानंतरही त्यांनी घरी याबाबत काहीच कळवलं नव्हतं.

मुग्धा यांच्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने पालकांनी भारतीय उच्चायुक्तांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा ठरवत त्यांच्या बँक खात्यांमधील व्यवहार आणि डिजिटल माहिती तपासण्यास सुरुवात केली. या तपासात भारतातील झोमॅटो, ब्लिंकिट आणि स्विगी या ऑनलाइन सेवांवर त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर होत असल्याचं आढळलं.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या ध्वजारोहण, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचं वेळापत्रक जाहीर

या व्यवहारांमुळे मुग्धा भारतातच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस पथक गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीत पोहोचलं. संबंधित फ्लॅट आतून बंद असल्याने पोलिसांनी बनावट चावीच्या मदतीने दरवाजा उघडला. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममध्ये मुग्धा यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता त्यांचा मृत्यू होऊन काही दिवस उलटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुग्धा ऑगस्ट 2026 पासून या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. विशेष म्हणजे, 21 ऑक्टोबर रोजी त्यांनी घरी काम करणाऱ्या मोलकरणीलाही कामावर येणं बंद करण्यास सांगितलं होतं. या घटनेशी संबंधित सर्व बाबींचा तपास पोलीस करत असून, त्यांच्या भारतात परतण्यापासून ते मृत्यू होण्यापर्यंतच्या कालावधीतील घडामोडींची माहिती घेतली जात आहे.

दरम्यान, मुग्धा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं असून, पुढील तपासणीसाठी व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वैद्यकीय अहवाल आणि मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीतून महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. या अहवालांनंतरच मृत्यूमागील परिस्थिती स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

follow us