हा विकास आम्हाला मान्य नाही! कर्जतमधील वृक्षतोडीवरुन रोहित पवार आक्रमक, सरकारला केला थेट प्रश्न

कर्जतमधील जंगलतोडीचा मुद्दा आता चांगलाच तापला असून, रोहित पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत एका गंभीर आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 24T214944.237

Rohit Pawar : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात 32 हजारांहून (Raigad) अधिक झाडांची कत्तल झाल्याचा दावा समोर आल्यानंतर टोरंट पॉवर कंपनीचा पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी दिला जात असल्याचा आरोप करत त्यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या वनक्षेत्रातील वृक्षतोड आणि त्याचे भविष्यात होणारे परिणाम याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

कर्जत तालुक्यातील सायडोंगर वनक्षेत्र हे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यालगत असून या भागात 233 हेक्टरवरील जंगल प्रकल्पासाठी तोडले जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. या परिसरातील 32 हजारांहून अधिक झाडे तोडली जात असल्याने वनसंपदेचे मोठे नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. झाडांवर असलेली पक्षांची घरटी, अंडी आणि लहान पिल्लेही या वृक्षतोडीमुळे नष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विकासाच्या घाईत निसर्गातील जीवसृष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

या जंगलात महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरु, बिबटे, भेकर, उदमांजर यांसह अनेक वन्यजीव आणि दुर्मिळ पक्ष्यांचा अधिवास आहे. तसेच औषधी वनस्पती, कीटक आणि विविध प्रकारच्या जैवविविधतेने हा परिसर समृद्ध आहे. मोठ्या प्रमाणावर झाडे तोडल्यास या प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होऊन त्यांना दुसरीकडे स्थलांतर करावे लागेल, अशी चिंता रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. प्रकल्पासाठी डोंगरांमध्ये होणाऱ्या सुरुंगांच्या स्फोटांमुळे भूभाग कमकुवत होण्याची शक्यता असून भविष्यात माळीण किंवा इर्शाळवाडीसारख्या दुर्घटनेचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

तुकाराम मुंढेंच्या FDA ची केंद्राविरोधात हायकोर्टात धाव; अधिकार हिरावल्याचा गंभीर आरोप

कर्जत परिसरातील जंगल मुंबई आणि पुणे या शहरांच्या हवामानाचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे या भागातील वनसंपदा नष्ट झाल्यास पर्यावरणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. याचा फटका स्थानिक आदिवासींच्या उपजीविकेलाही बसण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या परिस्थितीला त्यांनी भाजप सरकारला जबाबदार धरले असून भांडवलदारांच्या फायद्यासाठी निसर्गाचा ऱ्हास केला जात असल्याचा आरोप केला आहे. येत्या 3 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याचा उल्लेख करत, त्यापूर्वी जंगल नष्ट करण्याची घाई का केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रकल्पाला किंवा संबंधित कंपनीला विरोध नसून त्यासाठी निवडण्यात आलेल्या जागेवर आक्षेप असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, अशा पर्यायी ठिकाणी प्रकल्प उभारल्यास त्याला विरोध करण्याचे कारण राहणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, सध्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. विकासाच्या नावाखाली जंगलांचा विनाश करणे योग्य नसून सरकारने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या प्रकरणात जनतेने एकत्र येऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी आवाज उठवण्याचे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे. वृक्षतोडीचे वास्तव समोर आणणाऱ्या माध्यमांचे आणि स्थानिक पत्रकारांचे त्यांनी कौतुक केले असून, त्यांच्यावर दबाव आणला जाण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या संस्थाही सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे जनतेचा दबाव निर्माण झाल्याशिवाय हा प्रकार थांबणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आज पर्यावरणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम पुढील पिढीला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

follow us