प्रेमसंबंधातून वाद पेटला; आईच्या प्रियकरावर मुलानं झाडली गोळी
Beed Crime : बीडच्या गेवराईत प्रेमसंबंधातून झालेल्या वादानं टोक गाठलं असून मुलानं आईसोबत राहणाऱ्या व्यक्तीवर गोळीबार केला.
बीडच्या गेवराई शहरातील संजय नगर भागात (Beed) जुन्या प्रेमसंबंधातून झालेल्या वादानं गंभीर स्वरूप घेतलं असून शेख मुसा यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून मुसा हे शंकुतला शिंदे हिच्यासोबत राहत होते. काही दिवसांपूर्वी शंकुतला पुन्हा तिच्या पहिल्या पती आणि मुलांकडे राहण्यासाठी गेल्यानंतर मुसा आणि तिच्यात वाद सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. याच वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी रात्री मुसा हे घराबाहेर बसले असताना शंकुतला, तिचा मुलगा मंगेश, मुलगी हिना आणि करण राठोड हे कारमधून तिथं पोहोचले. शंकुतला आणि मुसा यांच्यात सुरुवातीला बोलणं झालं, मात्र त्यानंतर वाद वाढला. यावेळी करण राठोड यानं मुसा यांच्या खांद्यावर कत्तीने वार केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर मंगेश यानं गावठी कट्ट्यातून मुसा यांच्यावर गोळी झाडली.
करपलेली पिकं पाहून पंकजा मुंडेंची धाव; बीडच्या बांधावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलं पाणी
गोळी मुसा यांच्या उजव्या मांडीला लागल्यानं ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर संजय नगर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी मुसा यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून घटनेमुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात एकुण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं असून घटनेतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. मुसा यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून गोळीबार करण्यात आला, हल्ल्यामागे आणखी काही कारण होतं का आणि या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास गेवराई पोलीस करत आहेत.