बीडच्या आंबेजोगाईतून धक्कादायक बातमी समोर; मित्रासोबत दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा जाग्यावरच…
हा जीवघेणा आणि टोकाचा हल्ला नेमक्या कोणत्या जुन्या वादातून किंवा कोणत्या कारणावरून करण्यात आला, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातून (BEED) धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात शनिवारी रात्री एका 23 वर्षीय तरुणाला दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली आहे. या भीषण हल्ल्यात मृत तरुणाचा मित्रही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ज्ञानेश्वर वाकडे (23 वर्ष, रा. पट्टीवडगाव) असे या मृत झालेल्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. शनिवारी रात्री ज्ञानेश्वर हा आपल्या एका मित्रासोबत दुचाकीवरून घाटनांदूर येथून पट्टीवडगावच्या दिशेने चालला होता. ते घाटनांदूरमधील अण्णाभाऊ साठे चौकात पोहोचले असता, काही अज्ञात इसमांनी त्यांची दुचाकी अचानक थांबवली. काही समजण्याच्या आतच, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी ज्ञानेश्वर आणि त्याच्या मित्रावर दगड आणि विटांनी अमानुष हल्ला चढवला.
बीडमध्ये धक्कादायक प्रकार उघड; महिलेचा 22 वर्षांपूर्वी मृत्यू, पण पेन्शन सुरू
या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्यामुळं ज्ञानेश्वर वाकडे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला मित्र या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा जीवघेणा आणि टोकाचा हल्ला नेमक्या कोणत्या जुन्या वादातून किंवा कोणत्या कारणावरून करण्यात आला, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. मृत ज्ञानेश्वरच्या नातेवाईकांनी तक्रार देण्यासाठी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. मात्र, या थरारक घटनेमुळं बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.