‘विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता कोयता नगरी बनत आहे’; सुषमा अंधारेंचा पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून घणाघात
Sushma Andhare: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सुषमा अंधारे यांचा राज्य सरकार आणि पोलिसांवर निशाणा.
Sushma Andhare criticizes Pune’s deteriorating law and order situation: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार आणि पुणे पोलिसांवर टीका केली आहे. ‘विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता कोयता नगरी बनत आहे. पुणेकरांचे शहर आता क्राइम सिटी बनत चालले आहे,’ अशा शब्दांत त्यांनी पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. गर्दीच्या आणि वर्दळीच्या ठिकाणीही गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचं त्या म्हणाल्या.
‘मी कोणाची लेक आहे, हे विसरू नका’; संजय राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच आज संविधान दिनही आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सुषमा अंधारे यांनी शहीद उबाळे यांच्या स्मारकाचा मुद्दाही उपस्थित केला. स्मारकासाठी 9 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र, स्मारकाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही आणि या निधीतील कथित घोळही कायम असल्याचा आरोप त्यांनी केला. शहीद उबाळे यांची मुलगी राज्य शासनात काम करत असून, त्यांनाही याबाबत बोलताना भीती वाटत असल्याचं अंधारे म्हणाल्या.
काल पुण्यात घडलेल्या थरारक घटनेचा उल्लेख करत त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कोयत्याने वार केले जात असताना 108 क्रमांकावर फोन लागत नाही, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं त्या म्हणाल्या. या घटनेवेळी अनेक नागरिक हात जोडून मदतीची विनंती करत होते, असंही त्यांनी सांगितलं.
पुण्याचे पोलीस आयुक्त गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असतानाही शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण का मिळत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंजवडीतील घटना, कल्याणीनगर अपघात प्रकरण, आंदेकर-कोमकर हत्याकांड, स्वारगेटमधील सामूहिक बलात्काराची घटना आणि बीपीओमध्ये झालेला खून अशा अनेक गंभीर घटनांचा दाखला त्यांनी दिला.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलीस आणि न्यायालयाने काय भूमिका घेतली, हे सर्वांना माहीत असल्याचं त्या म्हणाल्या. गेल्या तीन वर्षांतील पुण्यातील गुन्हेगारांची यादीच त्यांनी वाचून दाखवली. पुण्यासारख्या सुसंस्कृत आणि शैक्षणिक शहरात वारंवार अशा घटना घडत असतील, तर शहराच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.