पुण्यात प्रेमसंबंधाचा भयानक शेवट! संशयातून प्रियकराची आयटी अभियंता तरुणीला बेदम मारहाण, मृत्यूने खळबळ
Hinjewadi IT Engineer Murder Case : हिंजवडीत प्रेमसंबंधातील संशयातून प्रियकराने केलेल्या मारहाणीत 27 वर्षीय आयटी अभियंता तरुणीचा मृत्यू.
Hinjewadi IT Engineer Murder Case : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात (Pune) प्रेमसंबंधातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. एका खासगी आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 27 वर्षीय कोमल राजेंद्र डहाके हिचा संशयातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. तिच्याच प्रियकराने केलेल्या मारहाणीत हा मृत्यू झाल्याचा आरोप असून, याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी शुभम ज्ञानेश्वर काळबांडे याला अटक केली आहे. उच्चशिक्षित तरुणीच्या मृत्यूमुळे आयटी क्षेत्रातही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
कोमल मूळची वर्धा जिल्ह्यातील, तर शुभम परभणीचा रहिवासी होता. दोघांची ओळख सुमारे 4 वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. नोकरीनिमित्त दोघेही हिंजवडी परिसरात राहत होते. एका खासगी पीजीमध्ये त्यांनी स्वतंत्र खोल्या घेतल्या होत्या. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. शुभमचे अन्य तरुणीशी संबंध असल्याचा संशय कोमलला होता. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.
रविवार, 22 नोव्हेंबर रोजी रात्री शुभम कोमलच्या खोलीत गेला होता. यावेळी पुन्हा दोघांमध्ये संशयाच्या कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर शुभमने कोमलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जोरात धक्काबुक्की केली. या झटापटीत कोमल गंभीर जखमी झाली. मारहाणीनंतर दोघेही खोलीत झोपले; मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी कोमलचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. मारहाणीमुळेच तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, कोमलचा फोन बंद येत असल्याने तिच्या आईला चिंता वाटू लागली. त्यांनी पुण्यात राहणाऱ्या आपल्या भाच्याला पीजीमध्ये जाऊन चौकशी करण्यास सांगितले. सोमवारी, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी तो कोमलच्या खोलीवर पोहोचला आणि दरवाजा ठोठावला. त्यावेळी शुभमने दरवाजा उघडला. आत जाऊन कोमलला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि शुभम काळबांडे याला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.