महाराष्ट्रात FDA ची धडक कारवाई! पुणे, नाशिकसह लोणावळ्यातील नामांकित हॉटेल्सना दणका; अनेकांचे परवाने निलंबित

FDA Action on Hotels in Maharashtra : पुणे, नाशिक आणि लोणावळ्यातील नामांकित हॉटेल्समध्ये FDA ने मोठी कारवाई केली.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 21T193559.959

FDA Action on Hotels in Maharashtra : राज्यभरात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत पुणे, नाशिक आणि लोणावळा या भागांमध्ये अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीत नामांकित हॉटेल्समधील अस्वच्छता, मुदतबाह्य खाद्यपदार्थ, झुरळांचा प्रादुर्भाव आणि अन्न साठवणुकीतील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत.

नाशिकमध्ये जगप्रसिद्ध मिसळ आणि खाद्यसंस्कृतीसाठी ओळखल्या जाणार्‍या शहरातील हॉटेल्सवरही प्रशासनाने कारवाई केली आहे. खवय्यांची मोठी पसंती असलेल्या नाशिकच्या मिसळ केंद्रांमध्येच स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्याचे तपासणीतून समोर आले. कॉलेज रोडवरील हॉटेल तुषार मिसळसह शहरातील एकूण चार हॉटेल्सचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

नाशिकमधील हॉटेल तुषार मिसळमध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थ, अस्वच्छता आणि अन्नपदार्थ साठवण्यासाठी अपुरी जागा असल्याचे आढळले. जुना गंगापूर नाका परिसरातील हॉटेल विहारमध्ये स्वयंपाकाच्या ठिकाणी कीटकांचा प्रादुर्भाव दिसून आला. सातपूर एमआयडीसीतील हॉटेल श्यामसुंदरमध्ये कच्चा अन्नमाल अस्वच्छ पद्धतीने साठवला जात असल्याचे निदर्शनास आले. तर पंचवटीतील महाराजा काठियावाडी हॉटेलच्या स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा आणि मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळले.

नाशिकमधील कृषीनगर परिसरातील दुर्गा कॅफेवरही प्रशासनाने कारवाई केली आहे. या कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले. बिलांवर FSSAI क्रमांक नसणे, मेन्यू कार्डवर स्वयंपाकासाठी वापरण्यात येणार्‍या माध्यमाचा उल्लेख नसणे आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन अशा त्रुटी आढळल्या. अन्न सुरक्षा अधिकारी आणि प्रशासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीनंतर संबंधित आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली.

लोणावळ्यातही अन्न व औषध प्रशासनाने पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील नामांकित हॉटेल्सना मोठा दणका दिला आहे. अचानक केलेल्या तपासणीत चार मोठ्या हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. द ऑर्किड हॉटेल, रिदम लोणावळा, बेसिलिका हॉटेल आणि द फर्न हॉटेल या चार आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले.

जिममध्ये जाणाऱ्या तरुणांनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्सच्या विक्रीवर FDA ची करडी नजर; तुकाराम मुंढेंचा कडक इशारा

लोणावळ्यातील द ऑर्किड हॉटेलच्या स्वयंपाकघरात आणि कोल्ड स्टोरेजमध्ये दुधाची मुदतबाह्य पाकिटे आढळली. कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, अस्वच्छ फ्रीज, चॉपिंग बोर्ड आणि शेगडी तसेच साचलेले पाणी अशा गंभीर त्रुटी तपासणीत उघड झाल्या. रिदम लोणावळा हॉटेलच्या स्वयंपाकघरात आणि बेकरी विभागात झुरळांचा वावर आढळला. शाकाहारी-मांसाहारी पदार्थांसह कच्चे आणि शिजवलेले अन्न एकाच ठिकाणी साठवले जात असल्याचेही समोर आले.

बेसिलिका हॉटेलच्या कोल्ड स्टोरेजमध्ये मुदतबाह्य चीज आणि ब्रेड आढळल्याने ते जागेवरच नष्ट करण्यात आले. कच्च्या चिकनमधून रक्तमिश्रित पाणी गळत असल्याचे आणि शाकाहारी-मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र साठवण व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले. याशिवाय मेन्यू कार्डवर उल्लेख नसतानाही खाद्य रंग आणि अजिनोमोटोचा वापर केला जात असल्याचे तपासणीत उघड झाले. द फर्न हॉटेलमध्ये बेकरी उत्पादनांसाठी मुदतबाह्य खाद्य रंग वापरले जात होते. फ्रीजजवळ मृत आणि फ्रायिंग मशिनजवळ जिवंत झुरळे आढळल्याने प्रशासनाने संबंधित रंग नष्ट केले.

पुण्यातही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या हॉटेल्सविरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली आहे. विशेषतः कॅम्प आणि एम. जी. रोड परिसरातील हॉटेल्स प्रशासनाच्या रडारवर होती. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत एकूण 20 हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची पाहणी करण्यात आली. यापैकी आठ आस्थापनांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

पुण्यातील या कारवाईत मेट्रो रेस्टॉरंट, शिवाय कॉर्नर, सहाना व्हेज रेस्टॉरंट, ग्रँड दिल्ली दरबार, राजे चायनीज फास्ट फूड अँड ज्यूस बार, द बर्गर बार्न कॅफे, महादेव फूड्स आणि फिरोज केटरर्स या आस्थापनांचा समावेश आहे. संबंधित हॉटेल्सच्या स्वयंपाकघरांमध्ये अस्वच्छता आणि मोठ्या प्रमाणात कीटकांचा प्रादुर्भाव आढळला. विशेष म्हणजे, सात हॉटेल्समध्ये कृत्रिम रंगांचा वापर होत असल्याचे समोर आले. मेट्रो रेस्टॉरंटमध्ये कृत्रिम रंगांसोबतच अतिरिक्त प्रमाणात MSG वापरले जात असल्याचेही निदर्शनास आले.

या संपूर्ण कारवाईत अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्न तयार करण्याची जागा स्वच्छ ठेवणे, कच्चे आणि शिजवलेले पदार्थ स्वतंत्र ठेवणे, मुदतबाह्य साहित्याचा वापर टाळणे आणि खाद्यपदार्थ योग्य तापमानात साठवणे या मूलभूत नियमांकडे अनेक आस्थापनांनी दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केवळ परवाने निलंबित करण्यापुरतीच कारवाई न राहता संबंधित हॉटेल्सच्या अन्न व्यवसायावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, सह आयुक्त मंगेश माने, विनोद धवड, ज्ञानेश्वर महाले आणि सह आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी ही तपासणी मोहीम राबवली. अन्न सुरक्षा अधिकारी आणि सहायक आयुक्तांच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि अन्न साठवणुकीची पाहणी केली. नियमांचे उल्लंघन करणार्‍या आस्थापनांवर तातडीने कारवाई करण्यात आली.

दरम्यान, ग्राहकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा परवान्याच्या अटींसह स्वच्छता आणि साठवणुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, अन्यथा परवाने निलंबित किंवा रद्द केले जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा स्वच्छतेबाबत संशय असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

follow us