पुण्यात डॉक्टरांच्या भरतीचा मोठा घोटाळा! 11 डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तीन डॉक्टरांवर गंभीर आरोप
कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 11 कंत्राटी डॉक्टरांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Major recruitment scam involving doctors in Pune : रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातच भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 11 कंत्राटी डॉक्टरांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्येक डॉक्टरकडून 10 लाख रुपये याप्रमाणे एकूण 1 कोटी 10 लाख रुपये उकळल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, डॉक्टरांकडून पैसे गोळा करण्यासाठी तीन डॉक्टरांनीच मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. डॉ. नानासाहेब भांगरे, डॉ. इरफान मुल्ला आणि डॉ. हेमंत वैद्य यांच्याविरोधात यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. पुणे महापालिकेने सुमारे चार वर्षांपूर्वी हे मेडिकल कॉलेज सुरू केले होते. सुरुवातीला येथे डॉक्टरांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात आली. त्यानंतर कायमस्वरूपी प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या भरतीमध्ये एमडी आणि एमएस पदवीधारक डॉक्टरांसाठी 28 जागा उपलब्ध होत्या.
याच भरतीचा आधार घेत कंत्राटी डॉक्टरांना कायमस्वरूपी नियुक्तीचे आमिष दाखवण्यात आले आणि त्यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये मागण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित डॉक्टरांनी पैसे देऊनही वर्षभराचा कालावधी उलटला, तरी त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळाली नाही. वारंवार पैशांची मागणी करूनही रक्कम परत मिळत नसल्याने अखेर या डॉक्टरांनी तक्रारीचा मार्ग स्वीकारला.
तीन वर्षे शेतजमीन पडीक ठेवल्यास सरकारच्या ताब्यात जाणार? महसूलमंत्री बावनकुळेंचे महत्त्वाचे विधान!
सुरुवातीला त्यांनी मेडिकल कॉलेजच्या ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या महापौरांकडे आपली कैफियत मांडली. मात्र, तिथून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारदारांच्या आरोपानुसार, संबंधित डॉक्टरांकडून पैसे जमा करून ते पुढे पोहोचवण्याची जबाबदारी डॉ. नानासाहेब भांगरे, डॉ. इरफान मुल्ला आणि डॉ. हेमंत वैद्य यांनी पार पाडली. त्यामुळे या तिघांच्या भूमिकेची चौकशी होण्याची शक्यता आहे. मात्र, या आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गंभीर दखल घेतली आहे. एसीबीचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत तक्रारदार 11 डॉक्टरांचे सविस्तर जबाब नोंदवण्यात येणार आहेत. त्यानंतर या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पुणे महापालिका आयुक्तांकडे अधिकृत परवानगी मागितली जाणार आहे.
आता या कथित भरती घोटाळ्यामागे नेमके कोण आहे? डॉक्टरांकडून जमा करण्यात आलेली रक्कम कोणापर्यंत पोहोचली? आणि या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे? या प्रश्नांची उत्तरे एसीबीच्या तपासातून समोर येण्याची अपेक्षा आहे.