लग्न समारंभात पाहुणे किती, जेवण काय? A To Z माहिती द्या…तुकाराम मुंढेंचा नवा नियम!

घरात लग्नसमारंभ असेल आणि पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली असेल, तर आता FDA विभागाला आधीच माहिती देणे बंधनकारक असणार आहे.

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe : तुमच्या घरात लग्न असल्यास लग्नाला येणारे पाहुणे, जेवणाची व्यवस्था, जेवणात कोणते पदार्थ बनवण्यात येणार? याची इंत्यंभूत माहिती आता अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात येणार असल्याचं आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी स्पष्ट केलंय. मागील काही महिन्यांपासून अन्न औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरात धाडीचे सत्र सुरु आहे. अशातच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि लग्न समारंभातील जेवणाच्या व्यवस्थेबाबत तुकाराम मुंढे यांन नवा नियम जारी केला आहे.

लग्नात किती लोक जेवणार आहेत, काय पदार्थ असणार आहेत, आणि कोण केटरर्स असणार आहे, याचा सर्व प्रकारचा तपशील तुम्हाला FDA विभागाला देणं बंधनकारक असणार आहे. एफडीएच्या या मोठ्या निर्णयामागचं कारण म्हणजे, लग्नसमारंभात जेवणामुळे होणाऱ्या विषबाधांच्या घटनांवर अंकुश मिळवणं आहे. त्यामुळे आता हा निर्णय सध्या राज्यभर चर्चेमध्ये आला आहे.

पुढे बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, सणासुदीच्या दिवसांत मिठाईला मोठी मागणी असते. त्यामुळे अनेकदा भेसळयुक्त किंवा शिळी मिठाई बाजारात येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी नागरिकांनी केवळ २ दिवसांसाठी पुरेल इतकीच मिठाई खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. घरची मिठाई संपल्यानंतर गरजेनुसार बाजारातून पुन्हा ताजी मिठाई खरेदी करावी तसेच अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि ताजेपणा तपासणे ही काळाची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला. नागरिकांनी खबरदारी बाळगून सुरक्षित आणि आनंदी वातावरणात दिवाळी साजरी करावी, असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.

नामांकित आणि लेबल असलेली मिठाई आणि खवाच खरेदी करा, असं सांगतनाच जर काही संशयित किंवा भेसळ संदर्भात तक्रार असेल तर एफडीएला कळवा, आम्ही योग्य ती कारवाई करू, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. तसेच मिठाई आणि इतर मिठाई दुकान आस्थापनांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील तब्बल 9, 666 आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली असून यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 4,603 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच 954 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 25 परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिलीयं.

follow us