डॉक्टरच्या घरात घुसून मारहाण; 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप, ‘बिग बॉस’ फेम दिव्या शिंदेविरोधात गुन्हा

Shinde : बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेविरोधात पुण्यातील 65 वर्षीय निवृत्त डॉक्टरच्या घरात घुसून मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 27T180431.654

पुण्यात ‘बिग बॉस मराठी’ फेम आणि सोशल मीडिया (Shinde) इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे हिच्यासह तिच्या साथीदारांविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. 65 वर्षीय निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केल्याचा तसेच 5 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. डॉ. गायकवाड यांच्या तक्रारीनंतर काळेपडळ पोलिसांनी दिव्या शिंदे, अण्णा ढमढेरे यांच्यासह इतर आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी ‘कला आविष्कार महोत्सवा’शी संबंधित असल्याचं पोलिसांच्या माहितीतून समोर आलं आहे. डॉ. गायकवाड हे 2021 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट रुग्णालयातून मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले असून ते करुणादीप फाउंडेशनशी संबंधित आहेत. या संस्थेच्या वतीने 1 ते 3 सप्टेंबरदरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. तक्रारीनुसार, या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीच्या मोबदल्यावरून 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. डॉ. गायकवाड यांनी यापूर्वी काही रक्कम दिल्याचा दावाही करण्यात आला आहे.

‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेविरोधात गुन्हा दाखल; 5 लाखांसाठी डॉक्टरला मारहाण

तक्रारीनुसार, पैशांच्या मागणीवरून वाद वाढल्यानंतर आरोपी डॉ. गायकवाड यांच्या महंमदवाडी येथील निवासस्थानी पोहोचले. घरात घुसून मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून या घटनेत डॉ. गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, दिव्या शिंदेच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले असून संबंधित प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पोलिस तपासात नेमका प्रकार काय घडला, पैशांच्या मागणीमागील कारण काय होतं आणि घटनेत कोणाची नेमकी भूमिका होती, हे स्पष्ट होणार आहे. सध्या काळेपडळ पोलिसांकडून तक्रारीतील आरोपांची चौकशी सुरू असून या प्रकरणातील आरोप अद्याप न्यायालयीनरीत्या सिद्ध झालेले नाहीत.

follow us