‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेविरोधात गुन्हा दाखल; 5 लाखांसाठी डॉक्टरला मारहाण
Bigg Boss Marathi Fame Divya Shinde; दिव्या शिंदेंविरोधात डॉक्टरला मारहाण आणि 5 लाखांची मागणी केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल.
Bigg Boss Marathi Fame Divya Shinde Booked in Doctor Assault Case: पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘कला आविष्कार महोत्सवा’च्या प्रसिद्धीसाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप ‘बिग बॉस मराठी’ फेम रीलस्टार दिव्या शिंदे (Divya Shinde) आणि तिच्या साथीदारांवर करण्यात आला आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड (Dr. Vidyadhar Gaikwad) यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. गायकवाड हे 2021 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावरून निवृत्त झाले असून ते करुणादीप फाउंडेशनचे सदस्य आहेत. या संस्थेने 1 ते 3 सप्टेंबरदरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित केला होता.
तक्रारीनुसार, या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी दिव्या शिंदे हिला कोणतेही अधिकृत आमंत्रण किंवा करार देण्यात आला नव्हता. मात्र, तिने कार्यक्रमाची प्रसिद्धी केल्याचा दावा करत ऑगस्ट महिन्यापासून गायकवाड यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अंतरवालीतील व्यासपीठ का हटवलं? दुष्काळाच्या GR वरून मुंबई आंदोलनापर्यंत; जरांगे स्पष्टच बोलले
17 सप्टेंबरला दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे आणि काही जण डॉ. गायकवाड यांच्या घरी पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यानंतर 23 सप्टेंबरला ढमढेरे याने त्यांना एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास घरी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
यानंतर 24 सप्टेंबरच्या रात्री दिव्या शिंदेसह आठ ते दहा जण गायकवाड यांच्या घरी घुसल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांनी डॉ. गायकवाडांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घरातील साहित्याची तोडफोड करून त्यांची कारही घेऊन गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सुवर्णसंधी! 29 सप्टेंबरला राज्यभर रोजगार महाकुंभ, संपर्क कसा करणार? जाणून घ्या
या घटनेत जखमी झालेल्या डॉ. गायकवाड यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी दिव्या शिंदे हिला कोणतीही परवानगी किंवा अधिकृत जबाबदारी देण्यात आली नव्हती, असा दावा गायकवाड यांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.