Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना मोठा राजकीय धक्का; माजी जिल्हा परिषद अध्यक्षाचा राजीनामा; कारण काय?
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पुण्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पुण्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर देवराम लांडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या व्हिडिओत देवराम लांडे एका कंपनीकडे दहा कोटी रुपयांची मागणी करताना दिसत आहे. तसेच व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ते अनेकांना अपशब्द वापरत आहे.
तर दुसरीकडे लांड (Devram Lande Resigns) यांनी व्हायरल होत असलेली क्लिप बनावट असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्राथिकम सदस्यत्वाचा स्वेच्छेने राजीनामा देत आहे असं लांडे यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे. माझ्या संदर्भात काही वादग्रस्त व आक्षेपार्ह ऑडिओ व व्हिडिओ क्लिप्स समाजमाध्यमांवर तसेच प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आल्या आहेत. सदर क्लिप्स या खोट्या बनवण्यात आल्या आहेत. तरी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी व सत्य जनतेसमोर यावे, यासाठी मी स्वत:जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन सखोल चौकशीची मागणी केलेली आहे असं त्यांनी राजीनामापत्रात नमूद केले आहे.
पुढे राजीनामापत्रात त्यांनी म्हटलं आहे की, माझ्या बाबतीत घडवून आणण्यात आलेल्या या प्रकारामागे काही राजकीय विरोधकांचे षड्यंत्र असण्याची शक्यता असून या माध्यमातून माझी वैयक्तिक व राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकरणाची सत्यता अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे माझ्या वैयक्तिक प्रतिमेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमादेखील विनाकारण मलिन होऊ नये, तसेच पक्षाला कोणत्याही प्रकारची राजकीय अडचण किंवा गैरसोय निर्माण होऊ नये, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची पोलीस चौकशी पूर्ण होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा स्वेच्छेने राजीनामा देत आहे.