Health Insurance New Rules : आता क्लेम नाकारताच कंपन्यांना द्यावे लागणार कारण….
Health Insurance रुग्णालयातील उपचारानंतर विम्याचा क्लेमवेळी अनेकदा विमा कंपन्या संपूर्ण रक्कम देत नाहीत. काही वेळा क्लेम थेट नाकारला जातो, तर
IRDAI Health Insurance New Rules : आरोग्य विमा म्णहजेच हेल्थ इन्शुरन्स धारकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर विम्याचा क्लेम करताना अनेकदा विमा कंपन्या संपूर्ण रक्कम देत नाहीत. काही वेळा क्लेम थेट नाकारला जातो, तर काही वेळा बिलातील मोठी रक्कम कापली जाते. मात्र, आता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI महत्त्वाचे पाऊल उचललं. त्यानुसार आता क्लेम नाकारला किंवा पैसे कापले तर विमा कंपनीला द्यावे लागणार आहे. आरोग्य विमा दाव्यांच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी IRDAI ने हे विशेष पाऊल उचलले आहे.
पुणेकरांच्या ताटात पोषणाचा अभाव! 81 टक्के पुरुषांमध्ये बी-12 ची कमतरता; KEM रिपोर्ट
क्लेम नाकारला तर कारण सांगणे बंधनकारक होणार
सध्या वेगवेगळ्या विमा कंपन्या क्लेम नाकारताना किंवा बिलातील रक्कम कापताना वेगवेगळी कारणे आणि संकेत वापरतात. त्यामुळे विमाधारकांना नेमकी कोणती पॉलिसी अट लागू झाली आणि त्यांचे पैसे का कापले गेले, हे समजणे कठीण जाते. पण, IRDAI च्या प्रस्तावित व्यवस्थेनुसार विमा कंपन्यांना क्लेम नाकारण्याचे किंवा कमी रक्कम मंजूर करण्याचे स्पष्ट कारण द्यावे लागणार आहे. तसेच किती रक्कम कापली आणि ती नेमकी कोणत्या पॉलिसीच्या अटींनुसार कापली, याचीही माहिती द्यावी लागणार आहे. IRDAI Health Insurance New Rules
क्लेमची स्थितीही रिअल टाइममध्ये पाहता येणार
केवळ क्लेमच्या कपातीपुरतेच IRDAI चे प्रयत्न मर्यादित नाहीत. विमाधारकांना त्यांच्या क्लेमची सद्यस्थिती ऑनलाइन आणि रिअल टाइममध्ये पाहता यावी, यासाठीही स्वतंत्र प्रणाली विकसित करण्याची योजना आहे. सध्या क्लेम कुठे अडकला आहे, कोणती कागदपत्रे प्रलंबित आहेत किंवा रुग्णालय, विमा कंपनी आणि थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेटर (TPA) यांच्याकडे प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती मिळवण्यासाठी ग्राहकांना अनेकदा धावपळ करावी लागते. नव्या व्यवस्थेमुळे ही अडचण कमी होण्याची अपेक्षा आहे.
AIIMS Research : एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळे आजार का होतात? 200 कुटुंबांवर होणार स्टडी
विमा कंपन्यांच्या कामगिरीवरही ठेवणार लक्ष
IRDAI ने स्थापन केलेले दोन्ही गट विमा कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी समान मापदंड तयार करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश असेल.
– किती विमा क्लेम मंजूर केले जातात?
– किती क्लेम नाकारले जातात?
– किती दाव्यांमध्ये रक्कम कमी दिली जाते?
– बिलातून किती रकमेची कपात केली जाते?
– कॅशलेस उपचारांची उपलब्धता किती आहे?
– क्लेम निकाली काढण्यासाठी किती वेळ लागतो?
26 डिसेंबर 2026 पर्यंत अहवाल सादर करणार
IRDAI च्या आरोग्य विमा उपसमितीअंतर्गत या दोन गटांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये विमा कंपन्या, TPA, इन्शुरन्स इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया, आशियाई विकास बँक आणि जागतिक बँकेच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. IRDAI चे कार्यकारी संचालक अयाझ तांबोली या दोन्ही गटांचे अध्यक्ष असतील, तर आरोग्य विमा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक मनोज कुमार समन्वयाची जबाबदारी सांभाळतील. या गटांना 26 डिसेंबर 2026 पर्यंत आपला अहवाल सादर करायचा आहे.
विमाधारकांना नेमका काय फायदा होणार?
या प्रस्तावित बदलांमुळे आरोग्य विमा ग्राहकांना क्लेम प्रक्रियेत अधिक स्पष्टता मिळण्याची अपेक्षा आहे. विमा कंपन्यांकडून होणाऱ्या कपातींचे कारण समजेल, क्लेमची स्थिती जाणून घेता येईल आणि अन्यायकारक निर्णयांविरोधात दाद मागणे सोपे होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, ही व्यवस्था अद्याप प्रस्तावित टप्प्यात आहे. आरोग्य विमा घेतल्यानंतर क्लेम मिळवताना होणारी ग्राहकांची धावपळ आणि संभ्रम कमी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरू शकतो.