पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करणाऱ्या महिला स्वतःच जगतात जास्त : UNFPA

Women Live Longer Than Men महिलांचं सरासरी आयुर्मान 76 वर्षे, तर पुरुषांचं 71 वर्षे म्हणजेच महिला पुरुषांपेक्षा सरासरी पाच वर्षे जास्त जगतात.

  • Ninad K
  • Written By: Published:
Women Live Longer Than Men But Why

Women Live Longer Than Men But Why : ज्या पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठी महिला व्रत करतात, त्याच महिला सरासरी पुरुषांपेक्षा जास्त वर्षे जगतात असं ऐकलं तर आश्चर्य वाटलं ना? पण, हा केवळ विनोदाचा विषय नाही, तर आकडेवारीतून समोर आलेलं वास्तव आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी अर्थात UNFPA ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलाय. ज्यात जगभरात महिलांचं सरासरी आयुर्मान 76 वर्षे, तर पुरुषांचं 71 वर्षे असल्याचे नमुद केलयं. म्हणजेच महिला पुरुषांपेक्षा सरासरी पाच वर्षे जास्त जगतात. भारतातही हेच चित्र दिसतं. भारतात महिलांचं सरासरी आयुर्मान 74 वर्षे, तर पुरुषांचं 71 वर्षे आहे. म्हणजे भारतीय महिलाही पुरुषांपेक्षा तीन वर्षे जास्त जगतात. पण प्रश्न असा आहे की, महिलांच्या दीर्घायुष्याचं नेमकं रहस्य काय? जाणून घेऊया…

तर, महिला दिर्घायुषी होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे महिलांची जैविक रचना होय. महिलांच्या शरीरात असणारं इस्ट्रोजेन हे हार्मोन हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्याला काही प्रमाणात संरक्षण देतं. शरीरातील सूज आणि हृदयविकारांचा धोका कमी ठेवण्यातही त्याची भूमिका असू शकते. अर्थात, वयानुसार हार्मोन्समध्ये बदल होत असल्याने हा फायदा कायम एकसारखा राहत नाही.

दुसरं कारण म्हणजे महिलांची जनुकीय रचना…महिलांमध्ये दोन X क्रोमोसोम असतात, तर पुरुषांमध्ये एक X आणि एक Y क्रोमोसोम असतो. दोन X क्रोमोसोम असल्यामुळे काही हानिकारक जनुकीय बदलांचा परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते, असं संशोधनातून सूचित होतं.

तिसरं कारण म्हणजे रोगप्रतिकारशक्ती.. काही संसर्गांविरोधात महिलांची रोगप्रतिकारक यंत्रणा अधिक सक्रिय प्रतिक्रिया देते. त्यामुळे विशिष्ट आजारांशी लढताना त्यांना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. मात्र, याच अधिक सक्रिय रोगप्रतिकारक प्रतिक्रियेमुळे महिलांमध्ये काही ऑटोइम्यून आजारांचा धोका वाढू शकतो.

आता चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जीवनशैली…अनेक देशांमध्ये पुरुषांमध्ये धूम्रपान, मद्यपान, वेगाने वाहन चालवणं आणि धोकादायक कामं करण्याचं प्रमाण तुलनेने जास्त आढळतं. त्यात अनेक पुरुष आजाराची लक्षणं दिसूनही डॉक्टरांकडे जाणं टाळतात किंवा उपचार घेण्यास उशीर करतात. याचाही त्यांच्या आयुर्मानावर परिणाम होतो.

12 देशांमधील 1 लाख 79 हजारांहून अधिक लोकांवर झालेल्या एका अभ्यासात पुरुषांमध्ये मृत्यूचा धोका महिलांच्या तुलनेत सुमारे 60 टक्के अधिक आढळला. धूम्रपान आणि हृदयविकारांचा विचार केल्यानंतर हा फरक काही प्रमाणात कमी झाल्याचंही संशोधनात दिसून आलं.

पण, महिला जास्त जगतात, याचा अर्थ त्या पुरुषांपेक्षा अधिक निरोगी आयुष्य जगतात असं नाही. महिलांमध्ये संधिवात आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आरोग्यविषयक समस्या अधिक प्रमाणात दिसू शकतात. म्हणजेच जास्त वर्षे जगणं आणि निरोगी जगणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

एकूणच काय तर, महिलांच्या दीर्घायुष्यामागे कोणतंही जादुई रहस्य नाही. तर, हार्मोन्स, जनुकीय रचना, रोगप्रतिकारशक्ती, जीवनशैली आणि सामाजिक परिस्थिती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम मानता येईलआणि म्हणूनच पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करणाऱ्या महिलांनी स्वतःच्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे. कारण दीर्घायुष्याचं खरं रहस्य केवळ व्रतामध्ये नाही, तर योग्य आहार, व्यायाम, नियमित आरोग्य तपासणी आणि वेळेवर उपचार घेण्यातही आहे.

 

(डिस्क्लेमर : बातमीत व्रत आणि उपवासाचा उल्लेख केवळ उदाहरण देण्याच्या उद्देशाने घेतला आहे. व्रत आणि उपवास करणाऱ्यांना दुखवणे हा लेट्सअपचा उद्देश नाही.)

follow us