ऑफिसच्या PC वर WhatsApp Web वापरणाऱ्यांसाठी सरकारचा अलर्ट; काय भीती?
WhatsApp Web on office ऑफिसमधील कॉम्प्युटर, सायबर कॅफे किंवा सार्वजनिक ठिकाणच्या लॅपटॉपवर WhatsApp Web वापरणाऱ्यांनो सावधान
Avoid WhatsApp Web on office or public computers, govt cautions. Here’s why : ऑफिसमधील कॉम्प्युटर, सायबर कॅफे किंवा सार्वजनिक ठिकाणच्या लॅपटॉपवर WhatsApp Web वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे तुमचे खासगी मेसेज, कॉन्टॅक्ट्स आणि ग्रुप चॅट्स अनोळखी व्यक्तींच्या हातात पडू शकतात. एवढेच नाही, तर तुमच्या WhatsApp अकाउंटचा गैरवापर करून आर्थिक फसवणूकही केली जाऊ शकते. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या (I4C) सायबर सुरक्षा विभागाने याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.
अनेक जण ऑफिसमध्ये किंवा इतरांच्या कॉम्प्युटरवर WhatsApp Web लॉगिन करून वापरतात. काम झाल्यानंतर केवळ ब्राउझरची विंडो किंवा टॅब बंद करतात. मात्र, असे केल्याने WhatsApp Web मधील लॉगिन सेशन बंद होत नाही. म्हणजेच, तुम्ही कॉम्प्युटरवरून निघून गेल्यानंतरही तुमचे WhatsApp अकाउंट लॉगिन राहू शकते. त्यानंतर त्या कॉम्प्युटरचा वापर करणारी दुसरी व्यक्ती तुमचे मेसेज वाचू शकते. तुमचे कॉन्टॅक्ट्स आणि ग्रुपमधील संभाषणेही तिच्या पाहण्यात येऊ शकतात.
I4C च्या इशाऱ्यानुसार, सक्रिय WhatsApp Web सेशनचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार अनेक प्रकारचे गैरप्रकार करू शकतात. यात खासगी चॅट्स उघड होण्याचा धोका, तुमच्या अकाउंटवरून इतरांना मेसेज पाठवून तुमची ओळख वापरली जाऊ शकते. तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पैसे मागणारे बनावट मेसेज पाठवले जाऊ शकतात. तसेच तुमच्या ओळखीचा गैरवापर करून इतरांना संशयास्पद लिंक पाठवल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे, तुमच्या ओळखीवर लोकांचा विश्वास असल्याने अशा फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता वाढते.
I4C च्या महत्त्वाच्या सूचना
I4C ने स्पष्ट केले आहे की, ऑफिस, सायबर कॅफे किंवा अनेक जण वापरत असलेल्या कॉम्प्युटरवर WhatsApp Web वापरणे टाळावे. अशा ठिकाणी WhatsApp Web वापरणे अत्यावश्यक असल्यास काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
– संवेदनशील माहिती शेअर करू नका : सरकारी कामकाजाशी संबंधित माहिती, ऑफिसमधील गोपनीय तपशील किंवा वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती WhatsApp Web च्या माध्यमातून शेअर करणे टाळा.
– वापर झाल्यानंतर लॉगआउट करा : WhatsApp Web वरील काम पूर्ण झाल्यानंतर अकाउंटमधून व्यवस्थित लॉगआउट करा. केवळ ब्राउझरचा टॅब किंवा विंडो बंद करणे पुरेसे नाही.
– Incognito किंवा Private Browsing मोड वापरा : दुसऱ्या कॉम्प्युटरवर WhatsApp Web वापरणे आवश्यक असल्यास शक्यतो Incognito किंवा Private Browsing मोडचा वापर करा. मात्र, ब्राउझर बंद करण्यापूर्वी WhatsApp Web मधून लॉगआउट करायला विसरू नका.
– अनोळखी कॉम्प्युटरवर लॉगिन करणे टाळा : सायबर कॅफे, हॉटेलमधील बिझनेस सेंटर किंवा अनोळखी व्यक्तीच्या कॉम्प्युटरवर WhatsApp Web लॉगिन करणे शक्यतो टाळा.
– संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष करू नका : तुमच्या WhatsApp अकाउंटवरून तुम्ही न पाठवलेले मेसेज इतरांना जात असतील, तर सावध व्हा. तुमच्या अकाउंटचा अनधिकृत वापर होत असल्याचे हे संकेत असू शकतात. याशिवाय, कॉम्प्युटर, ब्राउझर आणि सिक्युरिटी सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा. अनोळखी फाइल्स डाउनलोड करणे आणि संशयास्पद सॉफ्टवेअरचा वापर करणे टाळा.
WhatsApp Web लॉगआउट झाले आहे की नाही, कसे तपासाल?
तुमचे WhatsApp अकाउंट कोणत्या डिव्हाइसवर लॉगिन आहे, हे मोबाईलवरूनही तपासता येते.
स्टेप 1 : WhatsApp उघडा
मोबाईलमध्ये WhatsApp ओपन करा. Android मध्ये वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
स्टेप 2 : Linked Devices निवडा
मेन्यूमधील ‘Linked Devices’ या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3 : अनोळखी डिव्हाइस तपासा
तुमचे WhatsApp कोणत्या कॉम्प्युटर किंवा ब्राउझरवर लॉगिन आहे, ते पाहा. अनोळखी डिव्हाइस दिसल्यास त्यावर क्लिक करून ‘Log Out’ करा.
WhatsApp Web वापरणे धोकादायक नाही मात्र, सार्वजनिक किंवा इतरांच्या कॉम्प्युटरवर लॉगिन करून लॉगआउट न करणे धोकादायक ठरू शकते. विशेषतः ऑफिसमधील शेअर केलेले कॉम्प्युटर, सायबर कॅफे आणि हॉटेलमधील सार्वजनिक सिस्टीम वापरताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे यापुढे दुसऱ्या कॉम्प्युटरवर WhatsApp Web वापरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ब्राउझर बंद करणे म्हणजे WhatsApp मधून लॉगआउट करणे नव्हे, तर, तुमची खासगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक सेशननंतर मॅन्युअली लॉगआउट करणे आवश्यक आहे.
National Cybercrime Threat Analytics Unit (NCTAU), of Indian Cyber Crime Coordination Centre (14C) under the Ministry of Home Affairs has issued an advisory for “Safe Use of WhatsApp Web”, pointing it has observed that an authenticated WhatsApp Web session may, under certain circumstances, be misused to gain unauthorised access to a user’s WhatsApp account.
— ANI (@ANI) November 23, 2026