सोनं घसरणार की, पुन्हा आकाशाला भिडणार?; अमेरिकेतील तीन तारखांकडे सगळ्यांच्या नजरा
Gold Price सोन्याच्या दरातील घसरण संपली की तेजीची नवी सुरुवात झाली, हे सांगण्यासाठी अमेरिकेतील घडमोडींकडे सगळ्यांच्या नजरा...
Gold Price Hike Or Fall Decided By America 3 Important Date’s Why : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत होती. सोन्याचे भाव 14 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर आता अचानक मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. आज (दि.23) सोन्याच्या दरात एका दिवसात तब्बल 2,800 रुपयांची वाढ झाली, तर चांदीही सुमारे 4,600 रुपयांनी महागली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वाढीच्या दिशेने जाणार की, ही केवळ तात्पुरती तेजी आहे, असा प्रश्न ग्राहक आणि गुंतवणूकदारांना पडला आहे.
पण, येथून पुढील काळात सोन्याचे भाव घसणार की, पुन्हा आकाशाला भिडणार हे अमेरिकेतील तीन महत्त्वाच्या तारखा ठरवणार आहेत. त्यामुळे या तीन तारखांकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असून, या तीन दिवसांमध्ये असं काय घडणार आहे? त्याबद्दल जाणून घेऊया…
2026 मध्ये सोन्याने मोठी घसरण अनुभवली आहे. वर्षभरात सोन्याचा दर 1.76 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकावरून घसरून जवळपास 1.22 लाख रुपयांपर्यंत आला होता. म्हणजेच सोन्याच्या दरात सुमारे 31.7 टक्क्यांची घसरण झाली. मात्र, या घसरणीनंतर आता सोन्या-चांदीच्या बाजारात पुन्हा खरेदीचा जोर दिसू लागला आहे.
अमेरिकेतील तीन तारखांवर ठरणार सोन्याची दिशा
सोन्याच्या दरात आणखी तेजी येणार की, पुन्हा घसरण होणार, हे प्रामुख्याने अमेरिकेत जाहीर होणारे आर्थिक आकडे आणि फेडरल रिझर्व्हच्या निर्णयांवर अवलंबून असेल. नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील या तीन तारखा सोन्याच्या बाजारासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
25 नोव्हेंबर 2026 रोजी अमेरिकेत ऑक्टोबर 2026 चे महागाईचे (Inflation Data) आकडे जाहीर होणार आहेत. महागाई अपेक्षेपेक्षा जास्त राहिल्यास फेडरल रिझर्व्ह व्याजदरांबाबत कठोर भूमिका घेऊ शकते. त्यामुळे सोन्यावर दबाव येण्याची शक्यता आहे. मात्र, महागाई कमी झाल्याचे संकेत मिळाल्यास सोन्याच्या दराला आधार मिळू शकतो. त्यानंतर 4 डिसेंबर 2026 रोजी अमेरिकेतील नोव्हेंबर महिन्याचे रोजगारविषयक आकडे जाहीर होणार आहेत. रोजगारनिर्मिती मजबूत असल्यास अमेरिकेची अर्थव्यवस्था सक्षम असल्याचे संकेत मिळतील. त्यामुळे व्याजदर कपातीची शक्यता कमी होऊ शकते आणि सोन्यावर दबाव येऊ शकतो. याउलट रोजगाराच्या आकड्यांत कमजोरी दिसल्यास सोन्याला फायदा होण्याची शक्यता आहे.
या दोन तारखांशिवाय तिसरी आणि महत्त्वाची तारीक म्हणजे 9 डिसेंबर 2026 या दिवशी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरविषयक निर्णयाकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. यादिवशी व्याजदर कपात किंवा भविष्यात कपातीचे संकेत मिळाल्यास सोन्याच्या दराला आधार मिळू शकतो. मात्र, व्याजदरांबाबत कठोर भूमिका कायम राहिल्यास सोन्याच्या किमतीवर दबाव वाढू शकतो.
त्यामुळे सोन्याच्या दरातील घसरण संपली की, तेजीची नवी सुरुवात झाली, हे सांगण्यासाठी अजून वेळ असून, 25 नोव्हेंबर, 4 डिसेंबर आणि 9 डिसेंबर या तीन तारखांकडे आता सोने खरेदीदार आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे दर यांचाही भारतीय बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.