मोदींच्या आवाहनानंतरही सोन्याचे दर का कोसळले? 30 टक्क्यांची घसरण, नेमकी कारणे काय?
PM Modi Gold Appeal : लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, या घसरणीमागे पंतप्रधान मोदींचे आवाहन कारणीभूत आहे?
PM Modi Gold Appeal : लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच सोन्याच्या (Gold) दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 20 नोव्हेंबर 2026 रोजी इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 5,947 रुपयांनी घसरून 1,23,584 रुपयांवर आला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 5,447 रुपयांनी कमी होऊन 1,13,203 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 4,460 रुपयांनी घसरून 92,688 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याच्या दरातील ही घसरण इतकी मोठी आहे की, दर जवळपास वर्षभरापूर्वीच्या पातळीवर आले आहेत. विशेष म्हणजे, विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत जवळपास 30 टक्क्यांची घसरण झाली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मे 2026 रोजी हैदराबादमधील सभेत देशवासीयांना किमान एक वर्ष नवीन सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. तसेच परदेश दौरे टाळण्याचेही त्यांनी सुचवले होते. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर दबाव निर्माण होत असल्याचे कारण त्यांनी दिले होते. भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85 टक्के कच्चे तेल आयात करतो. याशिवाय भारत हा जगातील प्रमुख सोने आयातदार देशांपैकी एक असून, तेल आणि सोन्याच्या आयातीसाठी मोठ्या प्रमाणात डॉलर खर्च करावे लागतात. त्यामुळे परकीय चलन वाचवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मोदी यांनी आर्थिक देशभक्तीचा संदर्भ देत केले होते.
मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या खरेदीच्या पद्धतीत काही प्रमाणात बदल झाल्याचे चित्र समोर आले. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीत सोन्याची मागणी वजनाच्या तुलनेत कमी झाली. ग्राहकांनी नवीन दागिने खरेदी करण्याऐवजी जुन्या सोन्याचा पुनर्वापर करण्याला प्राधान्य दिले. लग्नासारख्या महत्त्वाच्या समारंभांमध्येही अनेक कुटुंबांनी नवीन सोने खरेदी करण्याचे टाळले. मात्र, सोन्याची खरेदी कमी होऊनही त्यावरील खर्च वाढल्याचे दिसून आले. मागील वर्षाच्या तुलनेत या तिमाहीत भारतीयांनी सोन्यावर जवळपास 65,000 कोटी रुपये अधिक खर्च केले. त्यावेळी सोन्याचे दर प्रचंड वाढलेले असल्याने कमी प्रमाणात सोने खरेदी करूनही ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागले.
मात्र, सध्या सोन्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमागे केवळ पंतप्रधान मोदी यांचे आवाहन कारणीभूत असल्याचे मानणे योग्य ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने इतर देशांसाठी सोन्याची खरेदी तुलनेने महाग झाली असून, त्याचा मागणीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील महागाई वाढल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्याजदर वाढल्यास गुंतवणूकदार सोन्यासारख्या मालमत्तेऐवजी बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करण्याला पसंती देतात. याशिवाय सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी विक्री सुरू केली. या नफावसुलीचाही सोन्याच्या किमती घसरण्यामध्ये वाटा आहे.
नरेंद्र मोदींचा बारामती दौरा तूर्तास रद्द! शरद पवार 12 डिसेंबरला करणार प्रेरणास्थळाचे उद्घाटन
देशातील नागरिकांनी सोन्याची खरेदी कमी केली तर त्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होऊ शकतो, असे केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी स्पष्ट केले आहे. भारत दरवर्षी सोन्याच्या आयातीसाठी अब्जावधी डॉलर खर्च करतो. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सोन्याच्या आयातीवर 71.98 अब्ज डॉलर खर्च झाले होते. नागरिकांनी सोन्याची खरेदी कमी केल्यास मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची बचत होऊ शकते. त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्याला बळ मिळेल आणि रुपयावरील दबावही कमी होण्यास मदत होईल. सोन्याची आयात कमी झाल्यास चालू खात्यातील तूट म्हणजेच करंट अकाउंट डेफिसिट (CAD) कमी होण्याची शक्यता आहे. ही तूट 0.4 ते 0.6 टक्क्यांपर्यंत आणता येऊ शकते, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
मात्र, सोन्याच्या खरेदीत मोठी घट झाल्यास त्याचा फटका देशातील दागिने उद्योगाला बसू शकतो. भारताच्या अर्थव्यवस्थेत ज्वेलरी क्षेत्राचे योगदान जवळपास 7 टक्के असून, या उद्योगावर कोट्यवधी लोकांची उपजीविका अवलंबून आहे. सोन्याची मागणी कमी झाल्यास सराफ व्यावसायिक, दागिने तयार करणारे कारागीर आणि या व्यवसायाशी संबंधित कामगारांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. या क्षेत्राशी जवळपास 3.5 कोटी लोक जोडले गेले आहेत. त्यामुळे सोन्याची खरेदी पूर्णपणे थांबवण्याऐवजी त्यामध्ये संतुलन राखणे आवश्यक असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, सोन्याचे दर उच्च पातळीवर असताना खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांना सध्याच्या घसरणीमुळे नुकसान सहन करावे लागू शकते.
सोन्याच्या दरातील घसरणीचा ग्राहकांना मात्र लग्नसराईच्या काळात फायदा होण्याची शक्यता आहे. विशेषतः दागिने खरेदी करण्याची तयारी करणाऱ्या कुटुंबांना कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळू शकते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठीही ही घसरण खरेदीची संधी ठरू शकते. मात्र, बाजारातील अनिश्चितता कायम असल्याने भविष्यात सोन्याचे दर कोणत्या दिशेने जातील, याबाबत निश्चित अंदाज बांधणे कठीण आहे. सोन्याच्या किमतींवर जागतिक डॉलरची स्थिती, अमेरिकेचे व्याजदर, महागाई आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची भूमिका यांचा प्रभाव कायम राहणार आहे.
अजय केडिया यांच्या मते, सोन्याच्या दरातील सध्याच्या घसरणीचे थेट कारण पंतप्रधान मोदी यांचे आवाहन नाही. त्यांच्या आवाहनामुळे नागरिकांच्या खरेदीच्या विचारसरणीवर काही प्रमाणात परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी या दरघसरणीमागील प्रमुख कारणे आहेत. नागरिकांनी सोने खरेदी कमी केल्यास देशाचे परकीय चलन वाचण्यास आणि रुपयाला आधार मिळण्यास मदत होऊ शकते. दुसरीकडे, दागिने उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेल्या लाखो कारागिरांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे सोन्याची मागणी रोखण्याऐवजी देशातील जुन्या सोन्याचा पुनर्वापर वाढवणे आणि गोल्ड मॉनेटायझेशन योजनेला प्रोत्साहन देणे हा अधिक संतुलित पर्याय ठरू शकतो.