अब्जावधींच्या TVS साम्राज्यात कौटुंबिक वादाची ठिणगी! मुलीच्या एका निर्णयाने खळबळ, नक्की काय घडलं?
TVS Family Property Dispute : TVS उद्योगसमूहातील संपत्तीच्या वाटणीवरून मुलगी लक्ष्मी वेणु यांनी वडिलांविरोधात न्यायालयात धाव घेतली.
TVS Family Property Dispute : TVS उद्योगसमूहातील कौटुंबिक संपत्तीचा (TVS) वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. TVS होल्डिंग्सचे अध्यक्ष वेणु श्रीनिवासन यांची मुलगी लक्ष्मी वेणु यांनी वडिलांविरोधात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कुटुंबातील संपत्तीचे कायदेशीर विभाजन करून आपल्याला योग्य वाटा मिळावा, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. 25 नोव्हेंबर रोजी ही कायदेशीर पावले उचलण्यात आली असून, या प्रकरणाची सुनावणी 27 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक पातळीवर चर्चा करून हा वाद मिटवण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही, असे लक्ष्मी वेणु यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजोबा आणि पणजोबांकडून मिळालेल्या वारशावर भावाप्रमाणेच आपलाही समान अधिकार असल्याची त्यांची भूमिका आहे. संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेतून आपल्याला योग्य हिस्सा मिळावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
या प्रकरणात केवळ मालमत्तेच्या वाटपाचाच मुद्दा नसून, संपत्तीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि आर्थिक माहिती लपवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. वारंवार मागणी करूनही आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याने न्यायालयाच्या माध्यमातून ती मिळवावी लागत असल्याचे लक्ष्मी यांनी म्हटले आहे. त्यामुळे TVS कुटुंबातील मालमत्तेच्या व्यवहारांसह अंतर्गत व्यवस्थापनाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वेणु श्रीनिवासन यांच्या कुटुंबाची शाखा TVS मोटर कंपनीवर नियंत्रण ठेवते. ही कंपनी देशातील आघाडीच्या दुचाकी उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. सध्या लक्ष्मी यांचे धाकटे बंधू सुदर्शन वेणु हे TVS मोटर कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. मात्र, कंपनीचे व्यवस्थापन सांभाळणे आणि संपूर्ण कौटुंबिक संपत्तीवर मालकी मिळवणे या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे लक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे.
या वादाच्या केंद्रस्थानी हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 मधील तरतुदी आहेत. 2005 मध्ये या कायद्यात सुधारणा करून कलम 6 समाविष्ट करण्यात आले. त्यानुसार मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीत मुलांप्रमाणेच समान हक्क देण्यात आला आहे. याच कायदेशीर तरतुदींचा आधार घेत लक्ष्मी वेणु यांनी आपल्या हक्काचा दावा केला आहे. आधुनिक भारतात पितृसत्ताक मानसिकतेला आणि महिलांच्या हक्कांवर मर्यादा घालणाऱ्या भूमिकेला स्थान नसावे, असेही त्यांनी यापूर्वी म्हटले होते.
2020 मध्ये झालेल्या TVS कुटुंबीयांच्या समझोत्याअंतर्गत वेणु श्रीनिवासन यांच्या शाखेला मिळालेल्या मालमत्तेच्या विभाजनाची मागणी लक्ष्मी यांनी केली आहे. यामध्ये TVS होल्डिंग्स, TVS मोटर कंपनी, TVS क्रेडिट सर्व्हिसेस आणि सुंदरम-क्लेटनमधील हिस्सेदारीचा समावेश आहे. एप्रिल 2025 मध्ये सुदर्शन वेणु यांना TVS मोटर कंपनीचे महत्त्वपूर्ण लाभार्थी मालक घोषित करण्यात आल्याच्या निर्णयाचाही त्यांनी उल्लेख केला आहे. मात्र, या निर्णयामुळे आपले कायदेशीर अधिकार संपुष्टात येत नाहीत, अशी त्यांची भूमिका आहे.
कौटुंबिक समझोत्याचा अर्थ वेणु श्रीनिवासन यांच्या कुटुंबातील सर्व मालमत्तेचे अंतिम विभाजन असा होत नाही, असे लक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्वतःच्या कुटुंबातील मालमत्तेच्या वाटपाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एखाद्या व्यक्तीकडे असली तरी त्यामुळे इतर कुटुंबीयांचे कायदेशीर हक्क संपत नाहीत. त्यामुळे व्यवस्थापनाच्या अधिकाराचा आधार घेऊन मालकी हक्क नाकारता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
दरम्यान, लक्ष्मी वेणु यांच्या भूमिकेला कुटुंबातील ज्येष्ठ सदस्या मल्लिका श्रीनिवासन यांनीही पाठिंबा दिला आहे. 25 नोव्हेंबर रोजी त्यांनी प्रतिक्रिया देताना लक्ष्मी यांच्या कायदेशीर अधिकारांना मान्यता न मिळणे दुर्दैवी असल्याचे म्हटले. परस्पर संमतीने तोडगा काढण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर न्यायालयात जाण्याची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले. आई म्हणून माझ्यासाठी मुलगा आणि मुलगी समान आहेत, त्यामुळे कौटुंबिक संपत्तीत लक्ष्मीचा वाटा सुदर्शनच्या वाट्याइतकाच असायला हवा, अशी स्पष्ट भूमिका मल्लिका श्रीनिवासन यांनी मांडली आहे.