पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीची शेतात आत्महत्या
Beed Wife Murder Case : अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या रागातून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीने स्वतःच्या शेतात आत्महत्या केली.
Beed Wife Murder Case : शिरूर कासार तालुक्यातील आनंदवाडी येथे पत्नीची हत्या करून फरार झालेल्या पतीने स्वतःच्या शेतात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. विष्णू गणपत कदम (वय 60) असे मृत पतीचे नाव आहे. कापसाच्या वाळलेल्या ढिगाला आग लावून त्यात उडी घेत त्याने जीवन संपवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
विष्णू कदम याने सोमवारी (ता. 16) पहाटे पत्नी भिवसाबाई कदम (वय 55) यांची हत्या केली होती. घरातील स्वयंपाकघरात झोपलेल्या भिवसाबाई यांच्या डोक्यात दगड घालून त्याने हा हल्ला केला. त्यानंतर घरातून पसार होत तो बेपत्ता झाला होता.
हल्ल्याचा आवाज ऐकून घरातील मुलगा आणि सून जागे झाले. त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन पाहिले असता भिवसाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
विष्णू कदम याचे अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. याच कारणावरून पती-पत्नीत वारंवार वाद होत असल्याचेही समोर आले होते. या वादातूनच त्याने पत्नीची हत्या केल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष होता.
पत्नीच्या हत्येनंतर विष्णू कदम घटनास्थळावरून फरार झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. विविध ठिकाणी त्याचा तपास सुरू असतानाच मंगळवारी रात्री त्याने स्वतःच्या शेतात टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली.
शेतातील कापसाच्या वाळलेल्या ढिगाला आग लावल्यानंतर विष्णू कदम याने त्यात उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांकडून शोध सुरू असतानाच आरोपीचाही मृत्यू झाल्याने आनंदवाडी परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.