खरातच्या माध्यमातून तेजस्वी सातपुतेंच्या बदल्या; रुपाली चाकणकरांबाबत रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर आणि एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्यावर रुपाली ठोंबरेंचे गंभीर आरोप.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 17T164702.820

Ashok Kharat Case : नाशिकमधील अशोक खरात (Pune) प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नव्या आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह या प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनाही राष्ट्रवादीच्या नेत्या ॲड. रुपाली ठोंबरे-पाटील यांनी लक्ष्य केले आहे. खरातच्या माध्यमातून तेजस्वी सातपुते यांच्या बदल्या होत असल्याचा दावा चाकणकर करायच्या, असा आरोप ठोंबरे यांनी केला आहे. तसेच चाकणकर यांच्या सांगण्यावरून सातपुते यांनी पुण्यात असताना खोटे गुन्हे दाखल केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

खरात प्रकरणात चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे केली होती, असे ठोंबरे यांनी सांगितले. मात्र, वारंवार मागणी करूनही चाकणकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली नाही. उलट चाकणकर यांच्यावर टीका करणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे तपास यंत्रणेच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तेजस्वी सातपुते यांची पुण्यात बदली झाल्यानंतर सात महिन्यांनी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार चाकणकर यांच्या सांगण्यावरून दाखल केल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला. तसेच सातपुते यांच्या आतापर्यंतच्या बदल्या अशोक खरातच्या माध्यमातून आपणच करून घेतल्याचे चाकणकर सांगत असल्याचा दावाही त्यांनी केला. या आरोपांमुळे खरात प्रकरणात तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत नवा वाद निर्माण झाला आहे.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

चाकणकर यांचे खरातसोबत छायाचित्र असल्यामुळे आपण आरोप करत नसून, त्या खरातच्या ट्रस्टवर पदाधिकारी होत्या, हा आरोपामागचा मुख्य आधार असल्याचे ठोंबरे यांनी स्पष्ट केले. याशिवाय चाकणकर, त्यांच्या बहिणी आणि कुटुंबीयांच्या नावावर पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. खरातशी संबंधित अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये चाकणकर यांच्या बहिणीचे नामनिर्देशन असल्याचा दावा करत, तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अशोक खरातकडे अनेक महिला आणि राजकीय नेत्यांना घेऊन जाण्यात चाकणकर यांची भूमिका असल्याचा आरोपही ठोंबरे यांनी केला. खरातसोबत गेलेल्या काही राजकीय व्यक्तींना आता धमकावले जात असल्याचा दावा त्यांनी केला. मला वाचवा, अन्यथा तुमचे फोटो व्हायरल करेन, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या माध्यमातून पोलिसांवर प्रभाव टाकून संबंधितांविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे ठोंबरे यांनी म्हटले आहे.

पत्रकार खेमनार यांना चाकणकर यांनी माफी मागण्यास भाग पाडल्याचा आरोप करत ठोंबरे यांनी पदाचा गैरवापर झाल्याचा मुद्दाही उपस्थित केला. चाकणकर यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी अनेक खोटे गुन्हे दाखल केल्याचा त्यांचा दावा आहे. अशोक खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहार, ट्रस्टमधील पदाधिकारी आणि तपास यंत्रणेच्या भूमिकेवरून ठोंबरे यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या सर्व आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक असून, संबंधितांकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

follow us