पुणे जिल्हा परिषदेचा ‘ज्ञान सेतू’ उपक्रम; 51 विद्यार्थी आणि 9 शिक्षक जम्मू-काश्मीर, आसाम-अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर

Pune ZP Gyan Setu Student Exchange Program; पुणे जिल्हा परिषदेचा ग्रामीण विद्यार्थ्यांना देशदर्शन घडवणारा विशेष उपक्रम.

Pune ZP Gyan Setu Student Exchange Program; पुणे जिल्हा परिषदेचा ग्रामीण विद्यार्थ्यांना देशदर्शन घडवणारा विशेष उपक्रम.

Pune ZP Gyan Setu Student Exchange Program: पुणे: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशाची विविधता, संस्कृती आणि परंपरा जवळून अनुभवता यावी, यासाठी पुणे जिल्हा परिषदेने ‘माझे गाव ते माझा देश’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. ‘ज्ञान सेतू’ या विद्यार्थी आदान-प्रदान उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील 51 गुणवंत विद्यार्थी आणि 9 शिक्षक जम्मू-काश्मीर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या शैक्षणिक दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 17 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा दौरा 27 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

ब्रेकिंग : एका अविस्मरणीय पर्वाची सांगता; कॅप्टन कुल धोनीची आयपीएलमधून निवृत्ती

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भारताची भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधता प्रत्यक्ष अनुभवता यावी, हा आहे. वेगवेगळ्या राज्यांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पाच दिवस शाळांमध्ये सहअध्ययन, दोन दिवस प्रादेशिक दौरा

या उपक्रमासाठी परीक्षेद्वारे 51 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांचे नऊ गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटासाठी संबंधित राज्यातील एक यजमान शाळा निश्चित करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील भद्रवा आणि पुंछ, आसाममधील दिराक, काकोपठार आणि डिब्रूगड, तसेच अरुणाचल प्रदेशातील रोइंग आणि तेजू येथील शाळांमध्ये विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

दौऱ्यादरम्यान पाच दिवस विद्यार्थी स्थानिक शाळांमध्ये वर्गात सहभागी होतील. विविध शालेय उपक्रमांमध्ये भाग घेतील आणि तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर दोन दिवसांचा प्रादेशिक अभ्यासदौराही आयोजित करण्यात येणार आहे. यातून संबंधित भागाचा इतिहास, भूगोल, संस्कृती आणि जीवनशैली जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.

IPL 2027 मधून ट्रेविस हेडची अचानक माघार ; सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का

रेल्वे प्रवासातूनही भारत दर्शन

विद्यार्थ्यांसाठी रेल्वे प्रवासाचेही विशेष नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून देशाच्या विविध भागांत जाताना बदलते भौगोलिक स्वरूप, निसर्ग, लोकजीवन, खाद्यसंस्कृती आणि प्रादेशिक परंपरा अनुभवता येणार आहेत. दौऱ्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसांचे पूर्वतयारी शिबिरही घेण्यात आले. यामध्ये संवाद कौशल्ये, सांस्कृतिक संवेदनशीलता आणि संबंधित राज्यांची माहिती देण्यात आली.

इतर राज्यांतील विद्यार्थ्यांनाही पुणे भेटीचे निमंत्रण

या उपक्रमात केवळ पुण्यातील विद्यार्थी इतर राज्यांत जाणार नाहीत, तर जम्मू-काश्मीर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांनाही पुणे भेटीसाठी आमंत्रित केले जाणार आहे. या भेटीत त्यांना पुण्यातील शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक जीवनशैली अनुभवता येईल. तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांशी संवाद साधता येणार आहे.

ज्ञान प्रबोधिनी, पुणे ही या उपक्रमाची अंमलबजावणी भागीदार संस्था आहे. विद्यार्थ्यांचे पूर्वतयारी मार्गदर्शन, यजमान शाळांशी समन्वय आणि शैक्षणिक दौऱ्याचे नियोजन संस्थेकडून केले जात आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी सांगितले की, शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तके आणि वर्गखोलीपुरते मर्यादित नसते. ‘ज्ञान सेतू’ उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशातील विविध संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली जवळून अनुभवता येणार आहे. तसेच, इतर राज्यांतील विद्यार्थ्यांशी संवाद आणि मैत्रीमुळे त्यांचे विचारविश्व व्यापक होण्यास मदत होईल.

मणिपूर पुन्हा धुमसले! नागा हत्याकांडाच्या निषेधार्थ कडकडीत बंद, इम्फाळमध्ये पोलिसांचा अश्रुधुराचा मारा

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी या उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. भारताची खरी ताकद विविधतेत असून, वेगवेगळ्या राज्यांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने मुलांना देशातील विविध परंपरा आणि जीवनशैली समजून घेता येतील, असे ते म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेचा ‘मॉडेल स्कूल’ उपक्रम ग्रामीण भागातील शाळांमध्ये दर्जेदार सुविधा आणि चांगल्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर देतो. ‘ज्ञान सेतू’च्या माध्यमातून शिक्षण वर्गखोलीच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न आहे. या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना देशाची भौगोलिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विविधता प्रत्यक्ष अनुभवता येईल. त्यातून त्यांच्यात आत्मविश्वास, जिज्ञासा, नेतृत्वगुण आणि व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल.

राज्य मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय; सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात सुधारणा होणार

ज्ञान प्रबोधिनीचे विभागप्रमुख अमर परांजपे यांनी सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजवण्यासाठी ‘ज्ञानसेतू’ उपक्रम राबवला जात आहे. आता पुणे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. या दौऱ्यात विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळेत दररोज घेतल्या जाणाऱ्या ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ या प्रतिज्ञेचा अर्थ प्रत्यक्ष अनुभवता येईल. राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि सुरक्षिततेचे महत्त्व या अनुभवातून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजेल, असेही त्यांनी नमूद केले.

follow us