अजितदादांच्या अपघाताचे CCTV फुटेज देण्यास नकार; मुंबई पोलीस अन् विमान सुरक्षा ब्युरोला नेमकं काय भीती?

Ajit Pawar CCTV Footage : अजितदादांच्या अपघाताबाबतच्या सीसीटीव्हींची मागणी, ॲड. नितीन यादव यांना का मिलाळी नाही माहिती?

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 17T154726.733

Ajit Pawar CCTV Footage : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी माहिती अधिकारांतर्गत अर्ज करणारे ॲड. नितीन संजय यादव यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांकडून निराशा आली आहे. (CCTV) मुंबईतील देवगिरी शासकीय निवासस्थानापासून मुंबई विमानतळापर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही चित्रण देण्यास मुंबई पोलिसांनी नकार दिला आहे. त्याचवेळी मुंबई विमानतळावरील फुटेज मिळवण्यासाठी नागरी विमान सुरक्षा ब्युरोकडे दाखल केलेले पहिले अपीलही फेटाळण्यात आले आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी नेमक्या काय घडामोडी झाल्या, याबाबत जनतेच्या मनातील शंका दूर व्हाव्यात, या उद्देशाने ॲड. यादव यांनी माहिती अधिकाराचा वापर केला होता. २८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सहा ते सकाळी नऊ या वेळेतील मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज त्यांनी केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागाकडे मागितले होते. याशिवाय अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानापासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही चित्रणाची मागणीही मुंबई पोलिसांकडे करण्यात आली होती.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

मात्र, मुंबई पोलिसांनी संबंधित माहिती सार्वजनिक कामकाजाशी किंवा जनहिताशी संबंधित नसल्याचे सांगत फुटेज देण्यास नकार दिला. ही माहिती दिल्यास व्यक्तीच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप होऊ शकतो, असे कारणही देण्यात आले. दुसरीकडे, नागरी विमान सुरक्षा ब्युरोने प्रथम अपील फेटाळताना सीसीटीव्ही फुटेज सर्वसामान्य नागरिकांना देता येत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच संबंधित चित्रण पोलिसांना दिल्याचे उत्तर दिल्याचा दावा ॲड. यादव यांनी केला आहे. त्यामुळे फुटेज उपलब्ध असूनही ते जनतेसाठी खुले केले जात नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या घटनात्मक पदावर कार्यरत असलेले लोकप्रतिनिधी होते. त्यामुळे त्यांच्या अपघाताशी संबंधित माहिती खासगी स्वरूपाची असल्याचे कारण देऊन नाकारणे चुकीचे असल्याची भूमिका ॲड. नितीन संजय यादव यांनी मांडली आहे. अपघाताबाबत जनतेच्या आणि अजितदादांच्या समर्थकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संबंधित दिवसाचे मुंबईतील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पारदर्शकतेच्या दृष्टीने सरकारने या प्रकरणातील माहिती जनतेसमोर आणावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

follow us