मौन अनेकदा संभ्रम निर्माण करते; फडणवीसांना घेरताच लाड यांचं पवारांना पत्र…

Prasad Lad Letter मुख्यमंत्र्यांसारख्या उच्च पदावरील व्यक्तीला विनाकारण संशयाच्या भोवऱ्यात उभे करणे योग्य आहे का?

  • Ninad K
  • Written By: Published:
Prasad Lad Letter to Sharad Pawar

Prasad Lad Letter to Sharad Pawar : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातावरून राजकारण तापले असून, आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घेतलेल्या आक्षेपांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. याच पार्श्वभूमीवर, आमदार प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांना उघड पत्र लिहून, रोहित पवार यांच्या आरोपांवर पक्षाने आपली अधिकृत भूमिका तातडीने स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांसारख्या उच्च पदावरील व्यक्तीला विनाकारण संशयाच्या भोवऱ्यात उभे करणे योग्य आहे का?, असा सवाल करत पक्षाच्या ‘मौन’वरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लाड यांच्या पत्रात नेमकं काय?

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी दिनांक 16 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही गंभीर आरोप केले. विशेषतः, कथित ‘मफलर मॅन’ संदर्भात छायाचित्र दाखवून राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांच्याबाबत संशय व्यक्त करणारी भूमिका त्यांनी मांडली.

लोकशाहीमध्ये कोणत्याही दुर्घटनांची निष्पक्ष चौकशी व्हावी, प्रश्न विचारले जावेत आणि सत्य जनतेसमोर यावे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, अशा संवेदनशील प्रकरणात सार्वजनिक जीवनातील घटनांचा संदर्भ देऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेबाबत संशय निर्माण करणारे आरोप केले जात असतील, तर त्यामागील तथ्ये आणि पक्षाची भूमिका स्पष्ट होणे तितकेच महत्त्वाचे आहे.

देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांच्या सार्वजनिक आणि राजकीय प्रतिमेबद्दल अनेक वर्षापासून जनतेमध्ये एक विशिष्ट विश्वास आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याबाबत करण्यात आलेल्या कथित आरोपांची सत्यता सिद्ध होण्यापूर्वीच त्यांना संशयाच्या भोवऱ्यात उभे करणे योग्य आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो.  या पार्श्वभूमीवर मला आपणास काही महत्त्वाचे प्रश्न विचारावेसे वाटतात.

1. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरदचंद्र पवार गट) अधिकृत भूमिका आहे काय?

2. मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याबाबत त्यांनी केलेल्या आरोपांशी आपल्या पक्षाचे नेतृत्व सहमत आहे काय?

3. आपण स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार सौ. सुप्रियाताई सुळे या पक्षाच्या कार्याध्यक्ष असल्यामुळे, या प्रकरणात पक्षाची अधिकृत भूमिका जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी आपली नाही काय?

4. जर रोहित पवार यांनी मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका असेल, तर पक्षातर्फे त्याबाबत स्पष्ट खुलासा करावा. आणि जर पक्षाचा त्यांना पाठिंबा असेल, तर तोही जाहीरपणे व्यक्त करावा.

साहेब, राजकारणामध्ये मतभेद असू शकतात, आरोप-प्रत्यारोप होत असतात. परंतु सार्वजनिक जीवनात व्यक्तींची प्रतिष्ठा, राजकीय सभ्यता आणि जबाबदार वक्तव्ये यांनाही तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे आपण आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकार परिषद, अधिकृत निवेदन, पत्र किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करावी, ही माझी नम्र अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबाबत करण्यात आलेले आरोप आपल्या पक्षाला मान्य नसतील, तर त्यांचे स्पष्ट खंडन करावे. अन्यथा रोहित पवार यांनी मांडलेल्या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा असल्याचे स्पष्टपणे सांगावे. मौन हे अनेकदा संभ्रम निर्माण करते. त्यामुळे या संवेदनशील विषयावर पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने मौन न बाळगता जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे. आपण या पात्राचा गांभीर्याने विचार करून योग्य ती भूमिका जाहीर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे लाड यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

rohit-pawar-alligation-on-cm-devendra-fadnavis-ajit-pawar-plane-accident-

follow us