नाशिक म्हंटलं की काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर अगदी हमखास येतातच. यात मंदिरांची नगरी, कुंभमेळा, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पंचवटी ही पहिली ओळख. दुसरी ओळख म्हणजे उद्योग नगरी आणि तिसरी इथली खाद्य संस्कृती. अशा या ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्वाचे असलेले नाशिक (Nashik) शहरही राजकीय दृष्ट्याही तेवढेच महत्वाचे आहे. विधानसभेचे तीन मतदारसंघ या शहरात आहे. विस्तीर्ण पसरलेले हे शहर कधी काळी काँग्रेसच्या ताब्यात होते. नंतर शिवसेना, मनसे असे करत करत आता भाजपने (BJP) या शहरावर आपली मजबूत पकड तयार केली आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातील चार हजारांचे किरकोळ लीड वगळता शहरात शिवसेना-भाजपचेच वर्चस्व दिसून आले. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) खासदार झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता नाशिककरांना आहे.
मगाशी नाशिकची ओळख सांगताना ज्या पंचवटी परिसराचा उल्लेख केला तो पंचवटी, गोदावरी काठाचा परिसर ज्या भागात मोडतो तो हा नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघ. पंचवटी, नाशिकरोड आणि आजूबाजूची खेडी असा शहरी आणि ग्रामीण टच असणारा हा मतदारसंघ. इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस ही केंद्रसरकारची महत्वाच्या आस्थापने याच मतदारसंघात असल्याने कामगार वस्तीलाही सामवून घेणारा मतदारसंघ आहे. एकूण धार्मिक, कामगार आणि खेड्यातील शेती असे तिन्ही प्रकारचे नागरिक या मतदारसंघात आढळून येतात.
शहरातील तीन मतदारसंघापैकी तुलनेने हा मतदारसंघ मोठा आहे. 2009 मध्ये पुनर्रचनेत निर्मिती झालेल्या या मतदारसंघात सर्वात पहिले मनसेने आपला झेंडा फडकावला. बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखत सहकार क्षेत्राची जाण असणारे उत्तमराव ढिकले काँग्रेस, शिवसेना या मार्गाने मनसेत आले. नगरसेवक, महापौर आणि खासदार असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करत त्यांनी विधान सभा निवडणूक लढविली. तब्बल 47 हजार 924 मते मिळवत विजय संपादित केला.
2014 मध्ये मोदी लाट उसळली. ढिकले यांनी पुन्हा एकदा वाऱ्याची दिशा ओळखली. ते विधानसभा निवडणुकीपासून लांबच राहिले. त्यामुळे भाजपच्या बाळासाहेब सानप यांची वाट सोपी झाली. सानप यांनी स्थानिक स्वराज्य संस्थापासून राजकारणाची सुरुवात केली. नाशिक महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे ते पहिले महापौर होते. सानप तब्बल 78 हजार 554 मते मिळवून विजयी झाले. 2014 च्या विधानसभा निकालानंतर पक्षाने त्यांची शहराध्यक्षपदी नेमणूक केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महापालिका निवडणूक सानप यांच्या नेतृत्वाखाली लढविली गेली. भाजपने कधी नव्हे ती ऐतिहासिक कामगिरी करत स्वबळावर तब्बल 66 नगरसेवक जिंकून आणले. तिकीट वाटपापासून ते सत्ता स्थापन करण्यापर्यंत सगळ्यात सानप यांनी महत्वाची भूमिका बजावली.
पुढे महापौर ते स्थायी समिती सभापती अशी सर्वच महत्वाची पदेही सानप यांनी आपल्या मतदारसंघात खेचून आणली. मात्र, या राजकीय खेळीने पक्षांतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर वाढली. पक्षात सानप विरोधी गट सक्रिय झाला. गिरीश महाजनांसोबतही त्यांचे खटके उडू लागले. याचाच परिणाम झाला. 2019 मध्ये त्यांचे तिकीट कापले. उत्तमराव ढिकले यांचे पुत्र राहुल ढिकले भाजपमध्ये आले. तर सानप राष्ट्रवादीकडून लढले. सानप यांच्याबद्दलची नाराजी, ढिकलेंचा नवा चेहरा, वडिलांचे नाव यामुळे ते आमदार झाले.
आताही पुन्हा ढिकलेंनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. पण भाजपकडून माजी आमदार सानपही हेही पुन्हा तयारी करत आहेत. त्यांनी तीन वर्षांपूर्वीच पक्षात पुन्हा प्रवेशही केला आहे. शिवाय या मतदारसंघातील जातीय समीकरणाकडेही विशेष लक्ष दिले जाते. ढिकले मराठा असल्याने त्यांना दुखवून चालणार का? हा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूले महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जगदीश गोडसे प्रमुख दावेदार आहेत. इथे लोकसभेला राजाभाऊ वाजे यांनाही चांगले मतदान झाले आहे. भाजपचा आमदार असतानाही महाविकास आघाडीने या मतदारसंघातून लीड घेतले होते.
या मतदारसंघातील जातीय समीकरणाकडेही विशेष लक्ष दिले जाते. ढिकले मराठा असल्याने त्यांना दुखवून चालणार का? हा प्रश्न आहे. मतदारसंघातील ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. इथे भाजीपाला, ऊस, द्राक्ष अशी विविध पिक घेतली जातात. शेतीचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, बेरोजगारी हे कळीचे मुद्दे आहेत. तीर्थक्षेत्राचा विकास, गोदावरीचे प्रदूषण, कुंभमेळ्याची तयारी हे यंदाच्या निवडणुकीत गाजणारे मुद्दे ठरु शकतात.
नाशिक पूर्वनंतर शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघाकडे जाऊ. राज्यातल्या विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेत नाशिक मध्य विधानससभा मतदारसंघाची निर्मिती झाली. या मतदारसंघात दलित, मुस्लिम आणि ओबीसी मतांची संख्या मोठी आहे. जुने नाशिक, अशोक स्तंभ, मुंबई नाका, इंदिरानगर परिसर हा भाग मतदारसंघात येतो. संमिश्र घटकांचे लोक हे या मतदारसंघाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. जुने नाशिक भागामध्ये दलित आणि मुस्लिम मतदान जास्त आहे तर इंदिरानगर भागामध्ये मध्यमवर्गीय मतदान जास्त आहे आणि उर्वरित ठिकाणी उच्चभ्रु मतदार जास्त असल्याने संमिश्र मतदारसंघ अशी ओळख आहे. विशेषतः मुस्लिम आणि दलित मतांचा प्रभाव या मतदारसंघवर जास्त आहे.
2009 मध्ये मनसेच्या लाटेत इथून वसंत गिते आमदार झाले. पण 2014 मध्ये मात्र इथले गणितच बदलून गेले. सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. यात मोदी लाटेचा फायदा उचलत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी मोठा विजय मिळवला. वसंत गिते तब्बल 28 हजार मतांनी पराभूत झाले. 2019 मध्येही फरांदे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला.
यंदा लोकसभा निवडणुकीनंतर मात्र फरांदे यांच्यासाठी इथले गणितच बदलून गेले आहे. लोकसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना नाशिक मध्यमधून 88 हजार मते मिळाली. तर महायुतीच्या हेमंत गोडसे यांना 84 हजार 906 मते मिळाली. वाजे यांना गोडसेंपेक्षा तीन हजार मते अधिक मिळाली आहेत. अल्पसंख्यांक, दलित, मागासवर्गीयांची एक ते सव्वा लाख मते असलेल्या या मतदारसंघात मविआला मिळालेली आघाडी भाजपसाठी नक्कीच चिंताजनक आहे. या मतपेढीने मविआला साथ दिल्याने फरांदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
मविआत मात्र हा मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाईल, हे अनिश्चित आहे. पूर्वाश्रमीचे मनसैनिक आणि सध्याचे ठाकरेंचे शिवसैनिक वसंत गिते रिंगणात आहेत. अल्पसंख्यांक, दलित आणि मागासवर्गीय ही त्यांची मतपेढी आहे. या मतपेढीच्या जोरावर आणि राज्यातील बदललेल्या परिस्थितीत गिते हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गजानन शेलार हेही इच्छुक आहेत. पण सध्याच्या परिस्थितीत तरी गितेंचेच पारडे जड आहे.
शहरातील तिसरा मतदारसंघ म्हणजे नाशिक पश्चिम. या विधानसभा मतदारसंघांत सिडको, सातपूर, इंदिरानगर, गंगापूर रोड, अंबड, पाथर्डी, गोविंदनगर, चुंचाळे या भागांचा समावेश आहे. अंबड आणि सातपूर या दोन्ही एमआयडीसीही याच मतदारसंघात येत असल्याने कामगार वर्गाचा मतदारसंघ म्हणून ओळख आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, कळवण, सटाणा, मालेगाव इथले नागरिक या भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश येथील नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतो.
2009 मध्ये नितीन भोसले यांना इथून आमदारकीची लॉटरी लागली. 2014 ला मात्र मोदी लाटेत सीमा हिरे निवडून गेल्या. तेव्हापासून त्याच या मतदारसंघातील आमदार आहेत. गत दोन्हीवेळी दुरंगी, तिरंगी लढतीचा फायदा घेत हिरे सहजपणे आमदार झाल्या. यंदा मात्र त्यांच्यासाठी विजयाचा रस्ता निर्धोक नाही. याचे कारण या मतदारसंघात मविआच्या वाजे यांना 93 हजार तर महायुतीच्या गोडसे यांना एक लाख 24 हजार मते मिळाली. वरवर इथे महायुतीला 31 हजारांचे मताधिक्य दिसत असले तरीही मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे मताधिक्य 72 हजारांनी घटले आहे.
गत निवडणुकीत गोडसे यांना एक लाख चार हजार मतांची आघाडी होती. यंदा महायुतीचे २५ नगरसेवक असतानाही अशी स्थिती झाल्याने हिरे यांना विजयासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यातच दहा वर्षे आमदार असताना, दोन एमआयडीसी असताना आजही मतदारसंघातील स्थानिक युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. घर, रस्ते, पाणी, गार्डन, मैदान, भूमिगत तारा, सिडकोची घरे फ्री टू लिज होम, सेंट्रल पार्क आदी समस्यांच्या जैसे थे आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात तीव्र नाराजी जाणवून येते. याशिवाय लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेले दिनकर पाटीलही याच मतदारसंघातून उमेदवारीच्या तयारीत आहेत.
मविआकडून ठाकरे गट या जागेवर हक्क सांगण्याची अधिक शक्यता आहे. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्यासाठी राऊत ही जागा मागून घेतील, असे दिसते. पण नाशिक पश्चिमची जागा ठाकरे गटाला सोडल्यास नाशिक मध्यच्या जागेवर मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दावा करु शकतील. त्यामुळे नाशिक मध्य मतदारसंघातून ठाकरेंकडून तयारी करणारे वसंत गिते अडचणीत येऊ शकतात हे नक्की. तुम्हाला काय वाटतं नाशिककर? तुमचा पुढचा आमदार कोण असू शकतो? कोण हवा आहे तुम्हाला आमदार हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा…