Download App

उपराष्ट्रपतीपदासाठी सीपी राधाकृष्णन का?, तामिळनाडू विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचं ‘दक्षिण’ राजकारण

सप्टेंबर महिन्यात उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी एनडीएने या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे.

  • Written By: Last Updated:

C.P. Radhakrishnan Post of Vice President : उपराष्ट्रपती पदाचा जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपतीपदाची खुर्ची खाली झाली. त्यानंतर आता निवडणूक जाहीर झाली आहे. सप्टेंबर महिन्यात उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी एनडीएने या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. (Vice President) महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची एनडीएने घोषणा केली आहे. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावांबद्दल चर्चा सुरू होती. पण आता भाजपने राधाकृष्णन यांचे नाव जाहीर करून त्या सर्व अटकळींना पूर्णविराम दिला.

सीपी राधाकृष्णन का?

सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील आहेत आणि ते गौंडर म्हणजेच ओबीसी समुदायाचे आहेत. पुढील वर्षी तामिळनाडूतमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांचं नाव जाहीर करून मोठी खेळी केली आहे. अनेक राज्यात सत्ता स्थापन केलेल्या भाजपला दक्षिणेकडील राज्यांमध्ये अद्याप तरी आपले पाय रोवता आलेले नसून आता आगामी निवडणुकींमध्ये दक्षिणेत सत्ता मिळवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. आणि त्याची सुरूवात ते तामिळनाडूपासून सुरुवात करू इच्छितात कारण पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. राधाकृष्णन यांना दीर्घ राजकीय अनुभव आहे.

राधाकृष्णन कोइम्बतूरमधून दोन वेळा खासदार होते. याशिवाय ते झारखंडचे राज्यपाल होते आणि सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. संघात त्यांच अनेक दिवसांचं काम आहे. हीच गोष्ट भाजप आणि संघ यांच्यातील समन्वय मजबूत करते. अलिकडच्या काळात, भाजपने दक्षिण भारतात, विशेषतः कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आपले अस्तित्व वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. कर्नाटक हे दक्षिण भारतातील एकमेव राज्य आहे जिथे भाजप सत्तेत होती. परंतु, तामिळनाडू आणि केरळमध्ये त्यांचा प्रभाव मर्यादित राहिला आहे. कारण त्यांची हिंदुत्व विचारसरणी तमिळ ओळख आणि द्रविड भावनांशी संघर्ष करते.

मोठी बातमी! राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, नड्डा यांनी केली घोषणा

भाजपने अण्णाद्रमुक आणि लहान पक्षांशी युती करून आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांना निर्णायक यश मिळालेले नाही. अशा परिस्थितीत, उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सीपी राधाकृष्णन यांची निवड करणे हा दक्षिणेत त्यांचा (भाजप) प्रवेश वाढवण्याचा प्रयत्न आहे. 1967 पासून, तामिळनाडूमध्ये फक्त द्रमुक आणि अण्णाद्रमुकच सत्तेत येत आहेत. 2019 आणि 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये द्रमुक-काँग्रेस युतीने चांगली कामगिरी केली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत, भाजपने तामिळनाडूतील काही जागांवर चांगली कामगिरी केली. परंतु, ती द्रमुक आणि अण्णाद्रमुकपेक्षा खूपच कमी होती.

यामध्ये मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचं झालं तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 11.24 टक्के मते मिळाली, तर द्रमुकला 26.93 % आणि एडीएमकेला 20.46 टक्के मते मिळाली. द्रमुकने 22 जागा जिंकल्या. पण भाजपचे खातेही उघडले नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत द्रमुकला 33.2%, अण्णाद्रमुकला 18.7 तर भाजपला 3.7% मते मिळाली होती. एकूणच, 2024 मध्ये भाजपच्या मतांच्या टक्केवारीत सुमारे 8% वाढ झाली. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या आशा आहेत. 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत द्रमुकने काँग्रेस, डावे आणि लहान पक्षांसोबत युती करून विजय मिळवला.

अण्णाद्रमुकने भाजप आणि पीएमके सारख्या पक्षांसोबत युती केली, परंतु 2024 मध्ये युती तुटल्यानंतर त्यांची कामगिरी कमकुवत झाली. पुढील वर्षी होणारी निवडणूक तामिळनाडूच्या राजकारणासाठी महत्त्वाची आहे कारण द्रमुक सत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर अण्णाद्रमुक आणि भाजप पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. मात्र, तमिळ ओळख आणि द्रविड विचारसरणी त्यांच्यासाठी आव्हाने आहेत. दक्षिण भारतातील राजकारण हे प्रादेशिक ओळख, भाषा, जात आणि विकासाभोवती फिरते.

तामिळनाडूमध्ये, द्रमुक आणि अण्णाद्रमुक सारखे पक्ष तमिळ भाषा आणि संस्कृतीवर भर देतात. हिंदी विरोधी भावना भाजपसाठी, विशेषतः तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये,नेहमीच एक आव्हान राहिले आहे. तमिळनाडूमध्ये वन्नियार, थेवर आणि गौंडर (ओबीसी समुदाय), कर्नाटकातील लिंगायत आणि वोक्कलिगा आणि आंध्र प्रदेशातील कम्मा आणि रेड्डी समुदाय प्रभावशाली आहेत. ही जातीय समीकरणे हाताळण्यात प्रादेशिक पक्ष पटाईत आहेत. पण भाजपसारखे राष्ट्रीय पक्ष हळूहळू त्यांचा प्रभाव वाढवत आहेत.

follow us