माजी खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) आणि आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan). चाळीसगाव तालुक्यातील दोघेही कसलेले राजकारणी. एकेकाळचे जिवलग मित्र आणि आताचे कट्टर विरोधक अशीही या दोघांची ओळख. पाटील आणि चव्हाण यांची मैत्री कधीकाळी एवढी जिवलग होती की 2014 मध्ये उन्मेष पाटलांच्या आमदारकीच्या विजयात मंगेश चव्हाण यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत स्मिता वाघ (Smita Wagh) यांना जाहीर झालेली जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ऐनवेळी नाट्यमयरित्या रद्द झाली. उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. निकालात पाटील प्रचंड मतांनी विजयी झाले. यातही मंगेश चव्हाण यांनी पायाला भिंगरी बांधून पाटील यांचा प्रचार केला. पण विधानसभेच्या निवडणुकीत उन्मेष पाटील यांनी त्यांच्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून भाजपकडे आग्रह धरला होता. त्याचवेळी मंगेश चव्हाण यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हापासूनच या दोन्ही मित्रांमध्ये कुरबुर सुरू झाली.
मंगेश चव्हाण विधानसभा निवडणुकीत पराभूत कसे होतील, अशी व्यूहरचना केल्याचा उन्मेष पाटील यांच्यावर आरोप झाला. परंतु मंगेश चव्हाण विजयी झाले. तेव्हापासून हे दोघे मित्र भाजपचेच असले तरी त्यांचे झेंडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला होते. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील यांनी भाजपला रामराम करुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. येत्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच हे दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मंगेश चव्हाण यांच्यावर गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त आहे. तर उन्मेष पाटील यांना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ताकद दिली आहे. त्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष चाळीसगाव तालुक्याकडे लागले आहे. (Chalisgaon Assembly Constituency, Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray)’s Unmesh Patil will fight against BJP’s Mangesh Chavan)
2009 पूर्वी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ राखीव होता. सुरुवातीच्या टप्प्यात या मतदारसंघावर काँग्रेसचे प्राबल्य होते. मोतीराम श्यामराव सुर्यवंशी हे 1962 सालच्या पहिल्या निवडणुकीतील पहिले आमदार. त्यानंतर दिनकर दिवान चव्हाण यांनी 1967, 1972 आणि 1978 असा तीनवेळा काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळवला. पण 1980 च्या निवडणुकीत काँग्रेसने वासुदेव चांगरे यांना उमेदवारी दिली. डी. डी. चव्हाण यांनी अपक्ष निवडून येत मतदारसंघावर आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. पण 1985 साली चांगरे यांनी चव्हाण यांचा पराभव केला. पण 1990 पासून या मतदारसंघावर भाजपने होल्ड तयार केला. ॲड. ईश्वर जाधव हे या मतदारसंघातील भाजपचे पहिले आमदार.
त्यानंतर 1995, 1999 आणि 2004 च्या निवडणुकीत भाजपचे साहेबराव घोडे विजयी झाले. या काळात तालुक्यात भाजपची ताकद वाढली होती. पण 2009 च्या पुनर्रचनेत मतदारसंघ खुला झाला आणि इथले राजकारणच बदलले. राष्ट्रवादीच्या राजीव देशमुख यांनी भाजपच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. देशमुख यांनी आपली ताकद वाढवली. नगरपालिकेत, जिल्हा परिषदेत, बाजार समितीमध्ये घड्याळ दिसू लागले. पण 2014 मध्ये उन्मेष पाटील यांनी देशमुख यांचा पराभव कर मतदारसंघ परत भाजपला मिळवून दिला. तेव्हापासून भाजप फॉर्मात आली. आमदार झाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींसह पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समितीवर भाजपची सत्ता आणली. जिल्हा परिषदेच्या सात गटांत भाजपचे सदस्य निवडून आणले.
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली. पण नाट्यमयरित्या ही उमेदवारी रद्द होऊन ती उन्मेष पाटील यांना देण्यात आली. ते देशातील सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या दहा खासदारांमध्ये समावेश होत निवडून आले. पण याच निवडणुकीनंतर उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण या मित्रांमध्ये बिनसले. विधानसभेसाठी चाळीसगाव मतदारसंघातून पाटील हे पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रही होते तर चव्हाण यांनी गिरीश महाजन यांच्या मदतीने स्वतःची फिल्डिंग लावली. यात मंगेश चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आणि ते राजीव देशमुख यांच्या विरोधात निवडून आले. त्यानंतर पाच वर्षे एकाच पक्षात असूनही उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यात सुंदोपसुंदी सुरू होती.
आज घडीला मंगेश चव्हाण यांची देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख मिळवली आहे. आमदारकीच्या काळात मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला आहे. विकासकामांसाठी, मतदारसंघातील जनतेची कामे करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र यंत्रणा उभी केली. त्यांचे प्रश्न सोडविण्यात आघाडी घेतली. जिल्हा दूध संघाचे चेअरमन पद स्वतःकडे घेत त्यांनी बाजी मारली. जिल्हा बँकेबद्दल बँकेत बदल घडवून आणत सत्ता आपल्या गटाकडे घेण्यात त्यांना यश आले. प्रत्येक वर्षाला पंढरपूरची मोफत वारी करविणे, गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकली वाटप आदी त्यांचे उपक्रम लक्षवेधी ठरत आहेत.
दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐनवेळी उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. त्यांनी त्यांचे मित्र, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी मिळवून देत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे विधानसभेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे उन्मेष पाटील हेच आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात रिंगणात असू शकतात. आमदार आणि खासदार असताना केलेली विकासकामे, मतदारसंघात असलेला जनसंपर्क, शेतकरी, बेरोजगार तरुण वर्ग त्यांच्यासाठी त्यांनी केलेली कामे चाळीसगाव तालुक्यातील जनता अद्याप विसरलेली नाही. तिसऱ्या बाजूला दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख यांची भूमिका काय असणर हाही महत्वाचा प्रश्न आहे.
उन्मेष पाटील यांनी मागच्या काही दिवसांपासून रखडलेल्या नार-पार योजनेसाठी आंदोलनांनी मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. याशिवाय बंद असलेली चाळीसगाव टेक्स्टाईल मिल पुन्हा सुरु करण्याचा मोठा प्रश्न प्रलंबित आहे. ‘एमआयडीसी’त आणखी मोठे उद्योग, कन्नड घाटातून ‘टनेल’ मार्ग, सिंचन प्रकल्पातून प्रत्यक्ष केंद्राची मदत मिळणे, मतदारसंघातील रस्त्यांची कामे, आदिवासींचे वन खात्याशी संबंधित जमिनीचे प्रश्न हे इथले प्रचारातील प्रमुख मुद्दे असणार आहेत. या मुद्द्यांच्या आधारे चाळीसगावची जनता कोणाला आमदार करणार? आणि कोणाला घरी बसवणार? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.