Download App

‘पिपाणी’ने राज्यात घेतली 4 लाख मते : साताऱ्यात शिंदेंना फटका… लंके, मोहिते, सोनवणे वाचले…

पिपाणी या चिन्हाचा शरद पवार गटाच्या चार उमेदवारांचे मते कमी केले आहेत. त्यामुळे मताधिक्य कमी झाले आहेत. तर साताऱ्यात पराभव झालाय.

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

LokSabha Election Result : लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) विरोधी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी अनेक क्लुप्ता वापरल्या जातात. अनेक नाम साध्यर्म असलेले, मिळते जुळते चिन्ह घेऊन उमेदवारांना रिंगणात उतरविले जाते. राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांना नवीन पक्ष व नवीन चिन्ह मिळाले आहे. तुतारी फुंकणारा माणूस असे चिन्ह मिळाले होते. हे चिन्ह पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आले.

परंतु निवडणूक आयोगाकडून पिपाणी हे चिन्ह अपक्ष उमेदवारांना दिले. शरद पवार यांनी दहा जागा लढविल्या होत्या. त्यात अनेक ठिकाणी पिपाणी चिन्ह असलेले उमेदवार उभे होते. त्याचा थेट फटका तुतारी चिन्हावरील उमेदवारांना बसल्याचे मतांच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. शरद पवार पक्षाच्या चार उमेदवारांविरुद्ध असलेल्या पिपाणीच्या उमेदवाराला चाळीस ते पन्नास हजारापर्यंत मतदान झाले आहे. दोन ठिकाणी पिपाणी चिन्हामुळे तुतारीचे मते कमी झाले आहेत. तर एका ठिकाणी शरद पवारांच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे. जर सर्व मतांची बेरीज केली तर पिपाणी या चिन्हाने 4 लाख 31 हजार 186 इतकी मते घेतली आहेत.

आम्हाला मान्य नाही, सरकारमध्ये राहुनही काम करता येतं; बावनकुळेंची फडणवीसांना साद

बीडमध्ये पिपाणी 50 हजारांच्या पुढे :

बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा धक्कादायक पराभव केला आहे. या मतदारसंघात सोनवणे हे 6 हजार 553 मतांनी विजयी झाले आहेत. या मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत काँटे की टक्कर होती. पण या मतदारसंघात इतर दोन उमेदवारांनी घेतलेली मतेही आश्चर्यचकित करत आहेत. येथे पिपाणी चिन्हावर अपक्ष म्हणून लढत असलेले अशोक भागोजी थोरात यांनी 54 हजार 850 मते घेतली आहे.

तुतारी हे चिन्ह पहिल्यांदा असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे पिपाणीला मते मिळाल्याचे बोलले जाते. पिपाणीने घेतलेल्या मतांमुळे सोनवणे यांचे मताधिक्य कमी झाले. तर याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अशोक सुखदेव हिंगे यांनीही 50 हजार 867 मते घेतली आहेत. हे दोन्ही उमेदवारा तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेले आहेत. याचा अर्थ सोनवणे यांचे मते फुटली आहेत.

उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; राज्यातील पराभवाची जबाबदारी फडणवीसांनी घेतली !

लंकेंचे मताधिक्य घटले !

पिपाणीचा तुतारीला फटका बसणारे दुसरा मतदारसंघ आहे तो अहमदनगरचा. अहमदनगर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात टफ फाइट झाली. त्यात नीलेश लंके हे 28 हजार 929 मतांनी विजयी झाले. लंकेंना 6 लाख 24 हजार 797 मते मिळाली. तर सुजय राधाकृष्ण विखे यांना 5 लाख 95 हजार 868 मते मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर पिपाणी चिन्ह असलेले गोरख दशरथ अलेकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले असून, त्यांनी 44 हजार 597 मते घेतली आहेत. लंकेंच्या लीडपेक्षा जास्त मतं पिपाणी चिन्हाने घेतले आहेत.

माढ्यात सर्वाधिक 58 हजार मते :

माढा लोकसभा मतदारसंघाची लढतही अटीतटीची होती. परंतु येथून धैर्यशील मोहिते हे 1 लाख 20 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. येथे रणजितसिंह निंबाळकर यांना 5 लाख 1 हजार 376 मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे रामचंद्र घुटुकडे राहिले आहेत. ते पिपाणी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांना तब्बल 58 हजार 421 मते मिळाली आहेत.

साताऱ्यात पिपाणीचा मोठा झटका :

साताऱ्यात पिपाणीचा मोठा फटका शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना बसला आहे. भाजपचे उदयनराजे भोसले यांना 5 लाख 71 हजार 134 मते पडली. तर शशिकांत शिंदे यांचा 32 हजार 771 मतांनी पराभव झाला. येथे पिपाणी चिन्ह घेऊन अपक्ष रिंगणात उतरलेले संजय गाडे यांना 37 हजार 62 मते मिळाली होती. त्यामुळे येथे पिपाणीचा तुतारीला फटका बसलायच हे स्पष्ट आहे.

एका भगरेने एक लाख मते घेतली :

दिंडोरीत शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे निवडून आले आहेत. त्यांना 5 लाख 77 हजार 339 मते मिळाली. तर आरोग्यमंत्री भारती पवार यांना 4 लाख 64 हजार 140 मते मिळाली होती. तर अपक्ष बाबू भगरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. त्यांना तब्बल 1 लाख 3 हजार 632 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे त्यांचे चिन्हही पिपाणी होते आणि भगरे हे आडनावही सारखे होते.

बारामती, शिरुर, भिवंडी, रावेर अन् वर्ध्यातही दिसला ‘पिपाणी’ इफेक्ट :

रावेर या जागेवर पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणारे एकनाथ साळूंखे यांना 43 हजार 957 मते पडली आहेत.

बारामती मतदारसंघात साेयलशहा शेख 14 हजार 917 मते घेऊन चाैथ्या क्रमांकावर राहीले.

शिरूरमध्ये अपक्ष उमेदवार मनाेहर वाडेकर यांनी 28 हजार 330 मते घेतली. ते मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

भिवंडीत न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या कांचन वखारे यांनी 24 हजार 625 मते घेतली. त्या चाैथ्या क्रमाकांवर राहिल्या.

वर्ध्यात माेहन रायकवर 20 हजार 795 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

शरद पवारांना आला होता अंदाज :

तुतारी हे चिन्ह नवे होते. पहिल्यांदा मतदान झाले आहे. परंतु तुतारी आणि पिपाणी हे चिन्हामध्ये मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे हे मते मिळाली आहेत, असा आपल्याला अंदाज लावता येईल. खरंतर ‘ट्रम्पेट’ हे ब्रिटिश वाद्य आहे. आपल्याकडचे वाजंत्री त्याला ‘पिपाणी’ असे म्हणतात. निवडणूक आयाेगाने या चिन्हाला ‘तुतारी’ नाव दिले हाेते. त्याचाच फटका बसल्याचे दिसून येत आहे. या पिपाणीचा आपला फटका बसेल याचा अंदाज शरद पवार गटाला होता. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. परंतु आयोगाने याची दखल घेतली नाही. परंतु आता मतदानातून फटका दिसून आला आहे.

follow us

वेब स्टोरीज