Download App

Shirur Lok Sabha 2024 : लोकसभेला नाव आढळराव पाटलांचे, पण डाव वळसे पाटलांचा

शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil). दोघेही एकेकाळचे एकमेकांचे जिवलग मित्र होते. या दोस्तीमुळेच संगणक क्षेत्रात अग्रगण्य उद्योजक असलेल्या आढळरावांचा राजकारणात सहज प्रवेश झाला. वळसे पाटील यांचे वर्चस्व असलेल्या भीमाशंकर कारखान्याच्या सुरुवातीच्या काळात आढळराव पाटील यांनी कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पहिले. वळसे पाटील 2000 मध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांचा जनता दरबार लांडेवाडीमध्ये आढळराव पाटील यांच्या बंगल्यावरच भरायचा. वळसे पाटलांच्या अनुपस्थितीत आढळरावच अनेक विकासकामांची उद्‌घाटने करायचे. (Shivajirao Adharao Patil and Dilip Valse Patil are now going to do politics together.)

उद्योग आणि राजकारण अशा दोन्ही क्षेत्रात सहज ऊठबस असलेले आढळराव पाटील आपसुक शरद पवार (Sharad Pawar) यांच्याही नजरेत बसले. दुसऱ्या बाजूला राजकीय पटलावर प्रवेश झालेल्या आढळरावांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. 2004 ची लोकसभा निवडणूक ‘राष्ट्रवादी’कडून लढण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. आढळरावांना तिकीट देण्यास शरद पवारांना अडचण वाटत नव्हती. पण वळसे पाटलांचा विरोध झाला. त्यांनी त्यावेळचे सिटिंग खासदार अशोकमामा मोहोळ यांनाच पुन्हा कौल दिला. वळसे पाटील आणि आढळरावांमधली मैत्री संपून कटुता सुरू होण्यास हे निमित्त झाले.

ECI चा मोठा निर्णय; मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यासह 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवलं

त्यानंतर इर्षेला पेटलेल्या आढळरावांनीही ‘भीमाशंकर’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत थेट ‘मातोश्री’ गाठली. बाळासाहेब ठाकरे यांनी खेड मतदारसंघातून आढळरावांना शिवसेनेचे तिकीट दिले. 2004 ची निवडणूक आढळराव अत्यंत त्वेषाने लढवले आणि त्यांच्या रूपाने शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात पहिला खासदार मिळाला. ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून पहिलीच निवडणूक त्यांनी 20 हजार मतांनी जिंकली. त्यानंतर 2009 आणि 2014 मध्येही वळसे पाटील यांना जेरीस आणून त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. यात 2009 च्या निवडणुकीत एक लाख 78 हजार आणि 2014 मध्ये तब्बल तीन लाखांचे मताधिक्य मिळाले.

आता मात्र याच शिवाजीराव आढळराव पाटील आणि वळसे पाटील या दोघांमध्येही मनोमिलन झाले आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये आढळराव पाटील राष्ट्रवादीत परतणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. वळसे पाटील यांनीही आढळरावांच्या लोकसभा उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे 2004 मध्ये सुरु झालेला संघर्ष तब्बल 20 वर्षांनी संपण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, आढळराव पाटील यांचे नाव लोकसभेसाठी पुढे करुन वळसे पाटीलही आपला विधानसभेचा डाव सोडवून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

कसे ते पाहुया सविस्तर :

“शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच खासदार होणार, अमोल कोल्हे पुन्हा खासदार होणार नाहीत,” असे म्हणत अजितदादांनी दिलेले हे आव्हान महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर अमोल कोल्हे यांनीही त्वेषाने कामाला लागत अजितदादांविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली. थोडक्यात अजितदादांनी ही लढाई अस्मितेची केली. हीच अस्मितेची लढाई जिंकण्यासाठी अजितदादा आणि वळसे पाटील यांच्यात आढळराव पाटील यांच्या नावावार एकमत झाले आहे.

त्यामुळे शिरुरमध्ये यंदा आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या तिकीटावर उमेदवार असणार आहेत. यात आढळराव यांची स्वतःची, शिवसेनेची, राष्ट्रवादीची आणि भाजपची ताकद अशी समीकरणे मांडली जात आहेत. विरोधात अमोल कोल्हे असणार असल्याने त्यांच्याच तोडीचा उमेदवार असणे गरजेचे आहे. ही गरज आढळरावांच्या रुपाने पूर्ण होऊ शकते. दुसऱ्या बाजूला आढळराव पाटील यांना लोकसभेवर पाठवून वळसे पाटील आपलाही डाव साधताना दिसत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना धडा शिकविण्याचा चंग शरद पवार यांनी बांधला आहे. त्यासाठी त्यांनी स्वतः आंबेगावमध्ये लक्ष घातले आहे. वळसे पाटील यांचेच एकेकाळचे अत्यंत विश्वासू म्हटले जाणारे देवदत्त निकम हे पवारांचे उमेदवार असू शकतात. निकम हे वळसे पाटील यांची सावली म्हणून ओळखले जायचे. 2014 मध्ये वळसे पाटलांनीच निकम यांना लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली होती. बाजार समिती, जिल्हा परिषद, कारखाना अशा सर्वच ठिकाणी वळसे पाटील यांचे राजकारण निकम यांच्याच रुपाने चालत होते.

‘उद्धव ठाकरेंना पत पाहूनच संधी’; एकनाथ शिंदेंनी भाषणाच्या वेळेवरुनही डिवचलं

आता हेच निकम शरद पवार यांच्यासोबत आहेत. निकम सोबत नसल्याने वळले पाटील यांना विधानसभेला आढळराव पाटील यांची मदत होऊ शकते. आढळराव पाटील यांची आंबेगावमध्येही ताकद आहे. ते स्वतः याच तालुक्यातील आहेत. त्यांना या तालुक्याने लोकसभेला भक्कम मताधिक्य दिले होते. त्यामुळे त्यांच्या गटाचा उपयोग आपल्या विधानसभेसाठी करुन घेता येऊ शकतो असे समीकरण वळसे पाटील यांच्याकडून मांडले जात आहे. त्यामुळे इतर इच्छुक यात मग विलास लांडे यांच्यापासून ते प्रदीप कंद यांच्यापर्यंत सगळ्यांमध्ये आढळराव पाटील वळसे पाटील यांच्यासाठी उजवे ठरतात.

राहिला प्रश्न दोघांच्या मनोमिलनाचा. तर त्याची सुरुवात मागच्या तीन वर्षांपूर्वीच झाली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच आंबेगाव तालुक्यात मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष सुरूच होता. पण दोघांमध्ये पहिल्यांदाच मनोमिलन झाले तेर भीमाशंकर साखर कारखान्याच्या निवडणुकीत. त्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. मात्र, महाविकास आघाडीचा धर्म पाळत तसेच चांगल्या चाललेल्या संस्थेत राजकारण नको म्हणून आढळराव पाटील यांनी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना माघार घेण्यास सांगितले.

अर्ज माघारीच्या मुदतीत जवळपास 80 जणांनी माघार घेतली आणि वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 18 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यानंतर अनेकदा आढळराव पाटील आणि वळसे पाटील एकत्र मंचावर आले होते. दोघांनी एकमेकांचे जाहीर गुणगाण गायले होते. दोघांनी एकत्र प्रवास करुन कार्यकर्त्यांनाही एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच लोकसभेला नाव आढळरावांचे असले तरी डाव वळसे पाटलांचा असणार हे नक्की.

follow us