Download App

Letsupp Special शिवतारेंनी स्वतःच आग लावली…. मग ती विझली कशी? जाणून घ्या इनसाईड स्टोरी!

  • Written By: Last Updated:

Vijay Shivtare मी बारा एप्रिल रोजी बरोबर बारा वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार म्हणजे करणारच अशी वल्गना माजी राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी पाच दिवसांपूर्वी केली होती. बारामतीचा बिहार झालाय. पवाररुपी नावाची झुंडशाही आणि हुकूमशाही संपवण्यासाठी मी धर्मयुद्ध सुरू केले आहे. मी निवडणूक लढविणारच.  कोणीही मनात शंका ठेवू नका, असे छातीठोकपणे बोलणारे शिवतारे हे २७ मार्चच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हजर झाले. त्याचवेळी तेथे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते. या तिघांशी शिवतारे हसतखेळत बोलत होते. शेजारी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले पण डोकावत होते. शिवतारेंचे अजित पवारांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिवतारेंनी त्यांच्या हातातील कागदांचा गठ्ठा मुख्यमंत्र्यांकडे देतानाचा फोटो ही काढला. हे सारे व्हिडीओ मग सत्ताधाऱ्यांच्या गटातून व्हायरल झाले. तेथेच शिवतारे बापू यांचे कथित बंड हे थंड झाल्याचे लक्षात आले. या कागदांमध्ये असे काय होते की ज्यामुळे शिवतारेंनी आपले बंड मागे घेतले?

जिवाचा आटापिटा करत, पवारांना शिव्या घालण्याचा कार्यक्रम शिवतारेंनी सलग १५ दिवस राबवला. पवार विरोधक म्हणून ओळख असलेल्या थोपटे कुटुंबियांना भेटले. इंदापूरात दौरा केला. वातावरणनिर्मिती अशी केली की शिवतारे हे अजित पवारांच्या विरोधात लढणार म्हणजे लढणारच. त्यांनी मिडियावर बोलताना रोज अजितदादांवर टीका केली. तेच शिवतारे अजित पवारांशी हसतखेळत गप्पा मारत असल्याचे दिसले. मग प्रश्न उरतो की कोणते शिवतारे खरे? अजित पवारांवर टीका करणारे की त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ स्वीकारणारे? बारामतीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे नाटक त्यांनी का केले? असे सारे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याची उत्तरे  शोधू.

विजय शिवतारे यांचे बंड शमले : अजितदादा यांच्या शेजारी उभे राहून खळखळून हसले

शिवतारे हे मूळचे व्यावसायिक आहेत, हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. अतिशय कष्टातून त्यांनी आपला व्यवसाय उभारला आहे. आधी व्यवसायात यश मिळवले आणि त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरवातीला छगन भुजबळ यांच्यामार्फत त्यांनी राष्ट्रवादीशी सलगी केली. त्यानंतर आपल्या मूळ तालुका असलेल्या पुरंदरमध्ये येऊन राजकारणात येण्यासाठीची पूर्वतयारी केली. राजकारणात झटपट यश कसे मिळवायचे, याचे कौशल्य व्यवसायामुळे त्यांना आत्मसात झाले होते. त्यासाठी योग्य संधी शोधणे हे शिवतारेंना चांगले जमले आहे. शरद पवार, अजित पवार यांच्याशी संपर्कात राहून पुरंदरची आमदारकी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. पण राष्ट्रवादीतून तिकिट मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्ये आमदार झाले. उद्धव ठाकरे यांच्या इतके जवळ गेले की त्यांनी राज्यमंत्रीपदही फडणवीस सरकारमध्ये मिळवले. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या विरोधात बंड करताच शिवतारे हे शिंदे यांच्या मदतीला धावून गेले. तेथे बस्तान बसवले. त्यामुळे योग्य संधी साधण्याची कला त्यांना अवगत आहे.

त्यांचा हा थोडक्यात इतिहास सांगण्याचे महत्वाचे कारण म्हणजे योग्य वेळी घाव घालण्याची त्यांची कला. अजित पवार यांनी जाहीर आव्हान देऊन २०१९ मध्ये शिवतारेंचा पराभव केला. त्याचे उट्टे काढण्याची संधी शिवतारेंना लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार असल्याने शिवतारेंनी मग आपली अस्त्रे बाहेर काढली. अजित पवारांवर इतकी जहरी टीका केली की त्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली. पण आपली अजितदादांना गरज आहे, हे शिवतारेंना माहिती होते. त्यामुळेच त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचेही आव्हान देऊन टाकले. एरवी आक्रमक असलेल्या अजितदादांनी शिवतारेंना जाहीर प्रत्युत्तर देण्याचे टाळले. शिवतारेंचे खरे दुखणे काय हे त्यांना माहीत होते.

लोकसभेसाठी अजितदादांचे स्टार प्रचारक ठरले; मंत्री, माजी मंत्र्यांची भलीमोठी यादी पाहाच

शिवतारेंनी ही सारी आग लावली होती ती पुरंदरच्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी. हा मतदारसंघ शिवसेनेलाच सोडला जावा, यासाठी ते आग्रही होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही शिवतारे यांना त्यासाठी पाठिंबा होता. २०१९ च्या निवडणुकीत ज्या अजितदादांनी पराभव केला त्यांच्याकडूनच विधानसभेची जागा सोडवून घेण्यासाठी शिवतारे यांनी हे सारे नाट्य रचले होते, असे त्यामुळेच बोलले जाऊ लागले आहे. ही जागा शिवतारे यांच्यासाठी सोडणार, असा अजितदादांकडून शब्द घेतल्यानंतरच शिवतारे यांनी आपली बंडखोरीची तलवार म्यान केल्याचे उघड आहे.

शिवतारे हे राजकीयदृष्ट्या चतुर आहेत. आपल्या आमदारकीच्या मागणीसोबत इतरही महत्वाच्या काही मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. किंवा याच मागण्यांसाठी माझा आग्रह होता, असे मतदारांना सांगण्याचा मार्ग त्यामुळे खुला झाला आहे. मुख्यमंत्र्याशी भेटताना शिवतारे यांच्या हातात जो कागदांचा गठ्ठा  दिसतो आहे, त्यात असलेल्या काही बाबी पुढीलप्रमाणे.

१)पुरंदर विमानतळाचा प्रकल्प अनेक वर्षे रखडला आहे. तो तातडीने मार्गी लावणे

२)बारामतीतील जो सुपे परगणा हा जो दुष्काळी भाग आहे त्या भागाला नीरा नदीतून एक्स्प्रेस वाहिनीद्वारे पाणीपुरवठा करणे

३)गुंजवणी धरणातून पुरंदर तालुक्यासाठीची पाणीयोजना रखडली आहे. ती तातडीने मार्गी लावणे

४)भोर तालुक्यातील उत्रोली औद्योगिक वसाहतीचा मुद्दा मार्गी लावणे

५)पुरंदरमधील दिवे भागात राष्ट्रीय  शेती बाजार स्थापन करणे

अशा पाच मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या. या वेळी दोन्ही उपमुख्यमंत्री हजर असल्याने त्या मान्य केल्याचेही त्यांना सांगण्यात आले. एवढेच नाही तर या साऱ्या मागण्यांची दखल घेतल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सासवड येथील पालखी तळावर येऊन करावी, अशीही अट शिवतारे यांनी ठेवली होती. ही अटदेखील मान्य झाली आहे. पालखी तळ हा शिवतारे यांच्यासाठी महत्वाचा आहे. कारण याच तळावर अजित पवार यांनी शिवतारेंना आव्हान दिले होते. शिवतारे कसा निवडून येतो, हे वाक्य अजित पवार यांनी याच तळावरील सभेत केले होते.

तर शिवतारेंच्या कथित बंडाने त्यांचे २०२४ चे राजकीय इप्सित साध्य तर झाले आहेच. पण सोबत काही मागण्यासाठी हा आपला संघर्ष होता, हे दाखवून देण्याचीही संधी साधली आहे. अशा प्रकारे शिवतारेंनी स्वतःच आग लावली आणि ती मुख्यतः आगामी विधानसभेच्या तिकिटाच्या आश्वासनावर विझली.

follow us