Download App

पार्थ पवार यांना त्या तीन चुकांची किंमत आजही मोजावी लागतेय…

  • Written By: Last Updated:

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) हे अधुनमधुन चर्चेत असतात. पण त्यांची चर्चा ही अनेकदा नकारात्मक दृष्टीने होत असते. आपल्या वडिलांना भाजपसोबत जाण्यास भाग पाडण्यात पार्थ यांचा मोठा वाटा असल्याचे नेहमीच बोलले जाते. शरद पवार आणि अजितदादा यांच्यात जे मतभेद झाले त्यालाही एक कारण पार्थ हे होतेच. त्यांची राजकीय महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. पण ते अशी एखाद कृती करतात की त्यांची चर्चा निगेटिव्ह अॅंगलनेच होते.

ते थेटपणे अद्याप व्यक्त होत नाहीत. गाठीभेटी, संपर्क यातून आपल्या वडिलांना मदत करण्याचा त्यांचा हेतू असतो. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ते नेते, कार्यकर्त्यांना भेटत असतात. त्याची फारशी चर्चा होत नसते. पण गुंड गजा मारणे याच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतल्याचे सोशल मिडियाद्वारे जाहीर होताच त्यांच्यावर टिकेची झोड उडाली. खुद्द अजितदादांना त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. अशी भेट घेण्याची गरज नव्हती. याबद्दल मी पार्थची कानउघाडणी करणार आहे, असे अजितदादांना जाहीरपणे सांगावे लागले.

तर पार्थ पवार यांना नेहमीच अशा टिकेला का सामोरे जाव लागते, याचीही काही कारणे आहेत. ही सारी कारणे गेल्या पाच वर्षांतील आहेत. त्यातील तीन प्रमुख चुकांमुळे पार्थ हे खरोखरीच राजकारणात येण्यास सक्षम आहेत का, असा संशय अनेकांना येतो.

मावळ मतदारसंघच का निवडला, याचे भन्नाट उत्तर

पार्थ पवार हे लोकसभेवर जाण्यासाठी २०१९ मध्ये इच्छुक होते. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि त्यांचे चुलतआजोबा शरद यांचा त्यांना विरोध होता. तरीही अजितदादांनी प्रतिष्ठेचा विषय करून पार्थ यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये मिळवून दिली. ही उमेदवारी मिळविण्याआधी पार्थ यांनी होमवर्क केला नव्हता. त्यांनी मतदारसंघाची बांधणीही केली होती. स्वतःचा चेहराही मतदारसंघात पोहोचवला नव्हता. तरी पक्षाच्या ताकदीवर विसंबून राहत त्यांनी हे धाडस केले. पार्थ यांना त्या आधी मिडियाला समोर जाण्याची, प्रश्नांची उत्तर देण्याची सवय नव्हती. मावळचे उमेदवार झाल्यानंतर त्यांना एका चॅनेलच्या मुलाखतीत साधाच प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही मावळ लोकसभा मतदारसंघाची का निवड केली, असा हा प्रश्न होता. एखादा चतुर राजकारणी असता तर याला चांगले उत्तर दिले असते. पण पार्थ यांचे उत्तर भन्नाट होते. मी पुणे-मुंबई असा नेहमी प्रवास करतो. या मार्गावर हा मतदारसंघ आहे. त्यामुळे मी मावळची निवड केली, असे उत्तर त्यांनी दिले. या विधानावर ते ट्रोल झाले. त्यांना राजकीय समज आहे की नाही, अशी शंका घेण्यात आली. तेथेच त्यांना पहिला फटका बसला.

भाषणही करता आले नाही…

पार्थ यांच्यासाठी झालेली चिंचवडमधील प्रचारसभाही त्यांच्या दृष्टीने घात करणारी ठरली. पार्थ हे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या जनसमुदायासमोर भाषण करणार होते. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील अशी दिग्गज नेतेमंडळी व्यासपीठावर होती. साहजिकच त्याचे दडपण पार्थ यांच्यावर आले. तरीही त्यांनी लिखित भाषण आणले होते. पण पार्थ यांना मराठीचा गंधही नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे इंग्लिश वळणाचे मराठी उच्चार ऐकून समोरील मंडळी चाट पडली. भाषणही त्यांना नीट वाचता आले नाही. या फसलेल्या भाषणामुळे त्यांच्यावर पुन्हा टीका झाली. अजितदादांनाही राजकारणात प्रवेश केल्यानंतर सुरवातीला कोठे भाषण करता येत होते, अशी सारवासारव त्यावर अनेकांनी केली. पण पार्थ यांचे निराशाजनक भाषण त्यांना चांगलेच महागात पडले. त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. त्यानंतर त्यांनी मोठ्या जनसमुदायासमोर भाषण करण्याचे धाडस अद्याप केलेले नाही.

शरद पवार यांनीच पार्थ यांची किंमत कमी केली…

शरद पवार आणि पार्थ यांचे नक्की कसे संबंध आहेत, याचे कोडेच आहे. पवार ह आपल्या विरोधकांवर टीका करताना संयम बाळगतात. पण पार्थ यांच्याबद्दल त्यांनी एकदाच जाहीरपणे कठोर शब्दांत मत व्यक्त केले. त्याचाही फटका पार्थ यांना अद्याप बसतो आहे.

हा किस्सा आहे तो आॅगस्ट २०२० चा. तेव्हा राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. या सरकारचे मुख्य खांब हे शरद पवार होते. त्या महिन्यात अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन होते. अयोध्येत राममंदिर उभारले जात असल्याचा आनंद पार्थ यांनी सोशल मिडियातून व्यक्त केला. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या मताचे अनेकाना आश्चर्य वाटले. भारतीय जनत पक्षाच्या विचारधारेशी जुळणारीचे मते पार्थ यांनी मांडली होती. त्यांची ही मते राष्ट्रवादीच्या मूळच्या विचारधारेशी विसंगत होती.

पार्थ यांच्या या मतांवर साहजिकच शरद पवार यांची प्रतिक्रिया माध्यमांनी घेतली. `माझ्या नातवाच्या मताला मी कवडीइतकीही किंमत देत नाही. ते अपरिपक्व आहेत,` अशा शब्दांत पवारांनी पार्थ यांना झापले होते.

पवार यांचे हे वाक्य पार्थ यांच्यासाठी अजूनही सलणारे आहे. त्यानंतर आजोबा आणि नातवाची भेट झाली. पण दोघांमधील जिव्हाळा कधी सार्वजनिक व्यासपीठावर दिसला नाही.

या तीन चुकांचे ओझे पार्थ यांच्यावर असतानाच त्यांनी पुण्यात गुंड गजा मारणेची भेट घेऊन पुन्हा चौथी चूक केली. पार्थ पवार यांची राजकारणातील वाटचाल पुढे कशी होईल, याची उत्सुकता असेलच . पण या चार चुकांवर ते कशा पद्धतीने मात करणार याकडेही लक्ष राहील.

follow us