नंदुरबार लोकसभा मतदारसंघ. महाराष्ट्रातील क्रमांक एकचा आणि कधीकाळी काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ. पण 2014 साली तब्बल नऊ टर्मचे खासदार असलेल्या माणिकराव गावित (Manikrao Gavit) यांचा पराभव करुन हिना गावित यांनी इथे भाजपचे कमळ फुलविले. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. यंदा डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांना भाजपने (BJP) तिसऱ्यांदा संधी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसने माजी मंत्री के. सी. पाडवी (K.C. Padavi) याचे पुत्र अॅड. गोवाल पाडवी या राजकारणाविरहित चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. यंदा हा मतदारसंघ भाजपाकडून पुन्हा आपल्याकडे घ्यायचाच या इराद्याने काँग्रेस पक्ष मैदानात उतरला होता. त्यासाठी प्लॅनिंगही अगदी बारीक केले होते. तर मतदारसंघ कायम ठेवायचा यासाठी भाजप आणि गावित कुटुंबाने अटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे यंदा नंदुरबारमध्ये काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पाहुया नेमके काय चित्र आहे मतदारसंघात…
काँग्रेसचे आणि नंदुरबारचे अत्यंत खास नाते आहे. 1967 ते 2014 पर्यंत या मतदारसंघात केवळ काँग्रेसच्या उमेदवारांनी विजयी मिळावला होता. आणीबाणीमध्ये भले भले नेते पराभूत झालेले असताना महाराष्ट्रातील नंदुरबार आणि सांगली या दोनच मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा विजय झाला होता. इंदिरा गांधी यांच्यासाठी कायमच हा नंबरप्रमाणे क्रमांक एकचा मतदारसंघ राहिला. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी देखील 1998 मध्ये राजकारणात प्रवेश करताना नंदुरबारमध्ये पहिली सभा घेतली होती. डॉ. मनमोहनसिंह सरकारच्या काळात अनेक नव्या योजनेची सुरुवात नंदुरबारमधून करण्यात आली होती. 2010 मध्येही आधार कार्ड योजनेची सुरुवात नंदुरबारच्या टेंभली गावातून केली होती. राहुल गांधी यांनीही नंदुरबारमधून भारत जोडो न्याय यात्रेच्या टप्प्याला सुरवात केली. यंदा इथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सभा झाल्या आहेत.
काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला पहिल्यांदा सुरुंग लागला तो 2014 मध्ये. “आपल्या मुलीला भाजपकडून उमेदवारी मिळवून दिल्यास त्याच क्षणी मंत्रिपद काढून घेऊ”, अशी धमकी जाहीररित्या तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे तत्कालिन नेते आणि मंत्री असलेल्या डॉ. विजयकुमार गावित यांना दिली होती. पण या धमकीला झुगारून हिना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारी मिळवली. तेव्हापासून नंदुरबारवर भाजपचे वर्चस्व तयार झाले आहे. खासदार, आमदार भाजपचेच. जिल्हा परिषदही भाजपचीच असे चित्र आहे. यंदाही हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. या मतदारसंघात आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या, आमदारांच्या सभा पार पडल्या आहेत. हिना गावित यांच्यासाठी सगळ्यात मोठी ताकद लावली ती स्वतः विजयकुमार गावित यांनी. त्यामुळे गावित यांच्यासाठी नंदुरबारची लढाई प्रतिष्ठेची बनली आहे.
नंदुरबार मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील चार आणि धुळे जिल्ह्यातील दोन मतदारसंघ येतात. यात नंदुरबारमधून विद्यमान मंत्री डॉ. विजयकुमार गावित, शहादामध्ये राजेश पाडवी आणि शिरपूरमध्ये काशिराम पावरा हे भाजपचे, अक्कलकुवामध्ये के. सी. पाडवी, नवापूरमध्ये शिरीष नाईक हे काँग्रेसचे आमदार आहेत. तर साक्रीमध्ये शिवसेनेच्या सहयोगी आमदार मंजुळा गावित आहेत. त्यामुळे कागदावरती तरी महायुतीसाठी मतदारसंघ सोपा वाटतो. पण महायुतीपुढे अनेक आव्हाने आहेत. मित्रपक्षांची नाराजी, अंतगर्त गटबाजी आणि त्यातून चव्हाट्यावर आलेले वाद, दोन टर्मची कथित अॅन्टी इन्कबन्सी अशा विविध मुद्द्यांनंतर मतदारसंघ कायम राखण्याचे आव्हान आहे. तर महाविकास आघाडीपुढे मतदारसंघ पुन्हा मिळवण्याचे आव्हान आहे. त्यासाठी गोवाल पाडवी यांच्यासारख्या राजकारणविरहित चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे.
भाजपचे नेते डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या कार्यपद्धतीवर पक्षांतर्गत आणि महायुतीच्या घटक पक्षात नाराजी आहे. सर्वांना बरोबर न घेणे, शिवसेना कार्यकर्त्यांशी आदिवासी विकास विभागाच्या योजनांमध्ये दुजाभाव करणे, मित्र पक्षांच्या विकास कामांना नेहमी कात्री लावणे असा आरोप त्यांच्या कार्यपद्धतीवर होत आहे. हाच आरोप करत निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावित यांच्याविरोधात उघडपणे दंड थोपटले होते. रघुवंशी यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी टोलमुक्त असणारा खासदार द्यावा अशी मागणी केली होती.
आपला विरोध भाजपला नसून डॉ. गावित कुटुंबियाला आहे, असा सूरही शिवसेनेच्या नेत्यांनी आळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही पालकमंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी समन्वय समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले होते. नंदुरबारमधील बेबनाव वाढतच चालल्याने संकटमोचक अशी ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनीही नंदुरबारचा आढावा घेतला. परंतु, त्यानंतरही वाद कायम राहिला. त्यामुळे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते गावितांच्या प्रचारापासून मतदानापर्यंत लांबच राहिल्याचे चित्र दिसत होते.
हिना गावित यांना 2014 आणि 2019 मध्ये नंदुरबार आणि शिरपूर या दोन मतदारसंघांनी भरघोस लीड दिले होते. 2014 मध्ये नंदुरबारमधून 50 हजारांचे आणि 2019 मध्ये 60 हजारांचे लीड मिळाले होते. तर 2014 मध्ये शिरपूरमधून 50 हजार आणि 2019 मध्ये 40 हजारांचे लीड दिले होते. इतर ठिकाणी म्हणजेच अक्कलकुवा, शहादा, नवापूर आणि साक्री या मतदारसंघांमध्ये अगदीच हजार-दोन हजार ते पाच हजार इतका काठावरच्या फरकाचा सामना होता. निकाल लागला तेव्हा 2014 मध्ये गावित यांचा एक लाख सहा हजार मतांनी आणि 2019 मध्ये 95 हजार मतांनी विजय झाला होता.
म्हणजेच नंदुरबार आणि शिरपूर इथले लीड भरुन काढताना काँग्रेसची दमछाक झाली होती. यंदाही हेच चित्र कायम राहण्याची शक्यता आहे. नंदुरबार हा विजयकुमार गावित यांचाच बालेकिल्ला. तेच इथले मागच्या सहा टर्मचे आमदार आहेत. त्यामुळे गावित यंदाही इथून भरघोस लीड घेऊ शकतात. याशिवाय शिरपूरमधून आमदार काशीराम पावरा आणि आमदार अंबरीश पटेल यांच्यामुळे हिना गावित यांना भरघोस लीड मिळू शकते. शिरपूरमध्ये तर अंबरीश पटेल म्हणतील ती पूर्वदिशा असे चित्र आहे.
गावित यांना मिळणारे इथले लीड गृहीत धरुन ते भरुन काढण्यासाठी काँग्रेसने कष्ट घेतल्याचे दिसून आले. यंदा नंदूरबारमध्ये 70.68 टक्के मतदान झाले आहे. यात नवापूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 80.18 टक्के मतदान झाले आहे. याशिवाय के.सी. पाडवी आमदार असलेल्या अक्कलकुवा मतदारसंघातूनही 75 टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ शहादामध्ये 74.49 टक्के, नंदुरबारमध्ये 66.67 टक्के, साक्रीमध्ये 67.60 टक्के आणि शिरपूरमध्ये सर्वात कमी म्हणजे 65.05 टक्के मतदान झाले आहे. आता हे मतदान काँग्रेसच्या पारड्यात झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचीही धाकधूक वाढली आहे. मात्र हे वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात गेले आणि कोण दिल्लीला जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.