Nandurbar Collector Admitted Girls To Zilla Parishad School : नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींनी एक मोठा निर्णय घेतला. स्वतःच्या मुलांना त्यांनी गावातील जिल्हापरिषद शाळेत दाखल केलंय. मिताली सेठींनी आपल्या जुळ्या मुलांना जिल्हाधिकारी कचेरीपासून सुमारे दोन किलोमीटरवर असलेल्या टोकरतलाव गावातील जिल्हापरिषद शाळेत दाखल करून एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. आदिवासी बहुल जिल्ह्यात जिथे शाळा आहेत, पण शिक्षक नाहीत किंवा इमारती अपुरी आहेत. तिथे हा निर्णय स्थानिकांसाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठा संदेश देणारा ठरला आहे.
नंदुरबार जिल्हाधिकारी (Nandurbar District) डॉ. मिताली सेठी यांचा (Collector Dr Mitali Sethi) निर्णय साधा असला तरी खूप मोठा संदेश देणारा आहे. आपल्या जुळ्या मुलांना जिल्हाधिकारी कचेरीपासून सुमारे दोन किलोमीटरवर असलेल्या टोकरतलाव गावातील जिल्हापरिषद शाळेत दाखल करण्यासाठी मिताली मॅडम स्वतः आल्या. ही घटना पाहून अनेकांचे हृदय स्पर्शले. आजही अनेक आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये शाळा (Zilla Parishad School) आहेत, पण इमारत नाही, इमारत आहे तर शिक्षक नाही, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत अनेक अधिकारी-मालक आपली फॅमिली नाशिक किंवा इतर शहरात ठेवतात, सोमवारी उशिरा आणि शुक्रवारी लवकर ऑफिसला येतात. अशा वातावरणात मिताली मॅडमचा हा निर्णय अत्यंत प्रेरणादायी ठरतो.
मुलांना गावातच शाळेत दाखल करून, मराठी, आदिवासी आणि इतर स्थानिक भाषा शिकवण्याची संधी मिळणार आहे. टोकरतलावसारख्या गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हा संदेश मिताली मॅडमने आपल्या कृतीतून दिला आहे. नंदुरबारसारख्या जिल्ह्यांमध्ये पोतदार व इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा उपलब्ध आहेत, तरीही त्यांनी लोकशिक्षण आणि समानतेला प्राधान्य दिले. या छोट्या निर्णयामध्ये मोठा संदेश दडलेला आहे. ‘समान शाळा, समान शिक्षण – प्रत्येकासाठी’ मिताली मॅडमच्या या पावलावर नंदुरबारवासीयांसोबतच शिक्षण क्षेत्रातही प्रेरणा मिळाली आहे.
डॉ. मिताली सेठी या 2017 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांना पाच विविध पोस्टिंग्स मिळाल्या आहेत. जुलै 2018 ते एप्रिल 2019 या काळात त्या अमरावतीमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर जुलै 2019 ते ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी दिल्ली येथे केंद्र सरकारमध्ये असिस्टंट सेक्रेटरी पदावर काम पाहिले.
ऑक्टोबर 2019 ते जुलै 2021 या कालावधीत डॉ. सेठी धारणी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, उपाविभागीय मॅजिस्ट्रेट आणि प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत होत्या. जुलै 2021 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान त्यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर जानेवारी 2023 पासून त्या वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर येथील संचालकपदी कार्यरत होत्या.
डॉ. सेठींनी आपली कारकीर्द वैद्यकीय क्षेत्रातून सुरू केली होती. मे 2009 ते जून 2012 या काळात त्यांनी तामिळनाडूमधील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात सीनियर रेसीडेंट म्हणून सेवा केली. त्यानंतर ऑगस्ट 2012 ते फेब्रुवारी 2015 मध्ये चेन्नई येथील एसआरएम डेंटल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होत्या. फेब्रुवारी 2015 ते ऑगस्ट 2017 या काळात त्या पॉंडेचेरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदावर कार्यरत होत्या. राज्य शासनाने 26 ऑगस्ट 2024 रोजी आयएएस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात डॉ. मिताली सेठी यांची नंदुरबार जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.