नंदुरबारध्ये रस्ता नसल्याने महिलेची घरीच प्रसुती, बाळ दगावलं; बांबूच्या झोळीतून 15 किमीचा प्रवास
Nandurbar No Road for Tribals : आदिवासी बांधवांच्या मरण यातना काही संपता संपत नाहीत अस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावांत रस्ताही नाही. (Nandurbar) येथे रस्ता नसल्याने गर्भवती महिलेची घरीच प्रसूती करण्याची वेळ आली. मात्र दुर्दैवाने बाळाचा मृत्यू झाला. तर आईची प्रकृती खालावल्याने बांबूच्या झोळीतून जंगल मार्गाने 15 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास रुग्णालयात जाण्यासाठी करावा लागला. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ जवळील केलापाणी गावात ही घटना घडली.
केलापाणी गावातील पाटीलपाडा हे पाचशे तीस लोकसंख्या वस्तीच गाव असून गेल्या वर्षी 25 जानेवारी 2024 ला केलापाणी ते कालापाणी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, वर्ष उलटून देखील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. या दोन गावातील अंतर हे साधारण 15 किलोमीटर असले तरी देखील फक्त 5 किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. मात्र हाच रस्ता आता या गावातील आदिवासी बांधवांच्या जीवावर उठला आहे.
5 तासांचा पायी कालावधी
गावाला रस्ता नसल्याने एका आदिवासी महिलेची घरीच प्रसूती करण्यात वेळ आली. मात्र प्रसूतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला. तर आईची तब्येत जास्त खराब झाल्याने रुग्णालय गाठण्यासाठी बांबूच्या झोळीतून जंगल मार्गाने एक दोन नव्हे तर तब्बल 15 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करावा लागला. 5 तासांचा जीवघेणा प्रवास करून या महिलेला तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या मरण यातना काही संपता संपेना, असेच चित्र दिसून येत आहे.
मागील वर्षीही अशीच घटना
सप्टेंबर 2024 मध्येदेखील नंदुरबार जिल्ह्यात असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्याच्या खुटवडा गावातील गर्भवती महिलेच्या प्रसूतीसाठी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ नातेवाईकांवर आली होती. बांबूची झोळी बनवून आठ किलोमीटरची पायपीट या गर्भवती महिलेच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांनी केली होती. तर वेळेत रूग्णालयात न पोहोचल्याने नदीपात्राजवळ गर्भवती महिलेची प्रसूती झाली होती. यानंतर नवजात बालकासोबत गर्भवती महिलेला मालवाहतूक वाहनातून रुग्णालयात पोहोचवण्यात आले होते.