Download App

नागपूरमध्ये 24 तासांत 25 मृत्यू! महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमधील मृत्यूचे सत्र सुरुच

नागपूर : नांदेड, छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ आता नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्येही मृत्यूचे सत्र पाहायला मिळत आहे. नागपूरच्या मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये 24 तासांत 25 रुग्ण दगावले आहेत. यात मेडिकलमधील 16 आणि मेयोमधील 9 रुग्ण दगावले आहेत. विविध वयोगटातील हे रुग्ण असून त्यातील काहीजण परराज्यातील असल्याचीही माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यातील काही रुग्ण मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामधील होते. यापूर्वी 2ऑक्टोबरलाही 24 तासांत 16 रुग्ण दगावले होते.  (25 patients died in both Nagpur’s Medical and Mayo hospitals in 24 hours)

नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर मंगळवारी पुन्हा 11 रुग्ण दगावले. त्यामुळे दोन दिवसांत मृत रुग्णांचा आकडा तब्बल 35 पर्यंत गेला. तर छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही 24 तासांत मृत 18 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तर निघाली होती. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयातील 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा नागपूरमध्ये 24 तासांत 25 रुग्ण दगावले आहेत.

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षी होण्याची शक्यता मावळली

हसन मुश्रीफ, गिरीश महाजन यांची रुग्णायलयाला भेट :

दरम्यान, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणानंतर राज्याचे वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी रुग्णालयाला भेट दिली. ‘‘या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन डॉक्टरांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल’’, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. तसंच वर्ग-3 व वर्ग-4ची पदे ऑक्टोबरअखेर भरली जातील, पायाभूत सुविधांसह अन्य सुविधा देण्यासाठीही शासन प्रयत्न करणार आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

500 रुग्णांची क्षमता असताना या रुग्णालयात 700 ते 800 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांचा जास्त समावेश आहे. हाफकीन संस्थेने वेळेवर औषधी पुरवठा केला नाही, ही बाब सत्य आहे. पण कोणत्याही औषधींचा तुटवडा नाही. जर औषधे बाहेरून आणायला लावली जात असतील, तर त्याही बाबींची चौकशी केली जाईल, असे मुश्रीफ म्हणाले.

भीषण अपघात! पर्यटकांना घेऊन जाणारी बस उलटली; 21 मृत्यूमुखी

सरकारी दवाखान्यात औषधांची प्रचंड टंचाई

राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांची प्रचंड टंचाई आहे. हाफकीनकडून औषधांची खरेदी बंद केली आहे. काही काळात हाफकीनकडून औषधांची खरेदी होणार होती, ती झालेली नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषध पुरवठा होत नाही. औषध खरेदीसाठी पैशांची जितकी तरतूद आहे ती कमी पडते अशी प्रतिक्रिया नांदेड रुग्णालयाचे अधिष्ठाता एस. आर. वाकोडे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.

Tags

follow us