वंजारी समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं यासाठी (Munde) अहिल्यानगरच्या पाथर्डी-शेवगाव इथं युवकांचं उपोषण सुरू होतं. या उपोषणाला धनंजय मुंडे यांनी फोनवरून संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी उपोषणस्थळावरून माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना फोन लावला. आमदार मुंडे यांनी फोनवरून आंदोलनकर्त्यांनी संवाद साधताना, मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता एका वाक्यात इशारा देणारी टीका केली.
मुंडे यांनी, ‘आमचे दोन टक्के काढून घेणारे म्हणणाऱ्यांना टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही,’ असा सूचक इशारा दिला. वंजारी समाजाला ‘एसटी’मधून आरक्षण मिळावं, याकसाठी पाथर्डी-शेवगावमधील वंजारी समाजाचे युवक काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी भेट देत चर्चा केली. तत्पूर्वी (BJP) भाजप अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी 15दिवसांत बैठक लागून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं.
मंत्री पंकजा मुंडेंवर टीकेची झोड; वैद्यनाथ साखर कारखाना बेकायदेशीर विकल्याचा आरोप
मंत्री विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर देखील युवकांचं आंदोलन सुरू होतं. उपोषण स्थळावरील अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी थेट माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना मोबाईलवरून संपर्क साधला. युवकांच्या आंदोलनाची माहिती दिली. तसंच पालकमंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची कल्पना दिली. यानंतर आंदोलकांना तु्म्ही समजवा, असं सांगून मोबाईल माईकसमोर धरला. यावेळी आमदार मुंडे यांनी आंदोलकांशी मोबाईलवरच संपर्क साधला.
मुंडे म्हणाले, “हैदराबाद गॅझेट निघाले नसते, तर आपण म्हणजेच वंजारी समाज, पाथर्डीमध्येच नाही, बऱ्याच ठिकाणी, इतर राज्यांमध्ये, आपण एसटीमध्ये आहोत हेच कळालं नसतं. आम्हाला अगोदरच माहित होतं की आपण एसटीमध्ये आहोत. कारण तेलंगणाच्या बॉर्डरजवळ परळी येते. लोकनेते गोपीनाथ मुंडे असल्यापासून सर्वांना माहिती आहे की, अनेक पाहुणे तिकडे एसटीमध्ये आहेत. आपण इकडं व्हीजे-एनटी मध्ये आहोत.
आता हैदराबादच्या गॅझेटनुसार चर्चा निघाली आहे. हैदराबादच्या गॅझेटनुसार इतर कुणाला फायदा मिळत असेल, तर त्या हैदराबादच्या गॅझेटनुसार आम्हाला एसटीचा फायदा मिळाला पाहिजे. गॅझेटमधील एका-एका शब्दाचा फायदा इतर कुणाला होत असेल, तर तो देखील आम्हाला झाला पाहिजे. कारण, आपलं दोन टक्क्यांमध्ये बरं चाललं होतं,’ असंही मुंडे म्हणाले आहेत.