Pankaja Munde : “ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही”, मंत्री पंकजा मुंडेंचा शब्द!

Pankaja Munde on Maratha Reservation : राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट संबंधी जीआर काढला. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) मुंबईतील उपोषण मागे घेतले. या आदेशामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येणार असल्याची भावना तयार होऊ लागली आहे. ओबीसी नेत्यांनी तर आणखी एक पाऊल पुढे टाकत या जीआर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. या घडामोडी घडत असतानाच आज राज्य सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
मंत्री पंकजा मुंडे यांनी (Pankaja Munde) आज पुण्यात गणरायाचं दर्शन घेतलं. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर भाष्य केलं. आर्थिक मागासलेपणा हा वेगळा विषय आहे आणि सामाजिक मागासलेपण हा वेगळा विषय आहे. मला हे आधीही वाटत आले आहे आणि पुढेही तेच वाटत राहील त्यात बदल होणार नाही.
ओबीसींसाठीही उच्चस्तरीय समिती गठीत
मराठा समाजासाठी GR काढला तर ओबीसीवर अन्याय होऊ नये यासाठी समिती सरकारने नियुक्त केली आहे. राज्य सरकारकडून यावर सुवर्णमध्य काढला जाईल ही प्रार्थना केली आहे. सामाजिक मागासलेपण असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी भूमिका सरकार घेईल. GR मुळे ओबीसींवर अन्याय होणार असं वाटत असेल तर दोन महिने वेळ आहे. आम्ही तपासून पाहू. ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही हा शब्द आमचा ओबीसींना आहे. या समाजावर अन्याय होऊ नये यासाठी पावलेही उचलली जात आहेत असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर प्रसिद्ध केला आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. याचा फायदा मराठवाड्यातील बहुतांश मराठा समाजाला होणार असल्याचे सांगितले जात आहे. याआधी 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही. यावर उपाय म्हणून ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या नात्यातील सर्वांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाला आपचा पाठिंबा; संजय सिंह म्हणाले ‘कुणबी, मराठा समाजाच्या समस्या गंभीर