अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम भारतासाठी लकी की अनलकी? आतापर्यंतचे आकडे काय सांगतात?
अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम टीम इंडियासाठी खरोखरच 'अनलकी' आहे का? या दाव्यात तथ्य किती आणि आकडे काय सांगतात?
Is Narendra Modi Stadium lucky or unlucky for India? : रविवार, 8 मार्च 2026. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे ते अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’कडे. निमित्त आहे ICC टी-20 वर्ल्ड कप 2026 चा महाअंतिम सोहळा! एका बाजूला डिफेंडिंग चॅम्पियन भारत आणि दुसऱ्या बाजूला पहिल्या जेतेपदाच्या शोधात असलेला न्यूझीलंड. भारताने सेमीफायनलमध्ये इंग्लंडला धुळ चारून फायनलचे तिकीट मिळवले, तर किवींनी दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखला. मात्र, या ऐतिहासिक सामन्याआधी क्रिकेट चाहत्यांच्या मनात एका वेगळ्याच गोष्टीची भीती सतावतेय, ती म्हणजे अहमदाबादचे मैदान टीम इंडियासाठी खरोखरच ‘अनलकी’ आहे का? या दाव्यात तथ्य किती आणि आकडे काय सांगतात? हे पाहणे रंजक ठरेल.
नरेंद्र मोदी स्टेडियमला ‘अनलकी’ म्हणण्यामागे सर्वात मोठे कारण आहे 19 नोव्हेंबर 2023 चा तो दिवस. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने सलग 10 सामने जिंकूनही याच मैदानात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारला. करोडो भारतीयांचे हृदय त्या दिवशी तुटले आणि तिथूनच या मैदानाच्या ‘बॅड लक’ची चर्चा सुरू झाली. त्यानंतर 2024 चा टी-20 वर्ल्ड कप आणि 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने अपराजित राहून जिंकली. मात्र, यंदाच्या 2026 टी-20 वर्ल्ड कपमध्ये जेव्हा भारतीय संघ पुन्हा अहमदाबादला पोहोचला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना 76 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. याच पराभवामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी ‘या मैदानात मोठे सामने नकोत’ अशी मागणी करण्यास सुरुवात केली.
चला, तर आकडेवारीचं वास्तव काय आहे, ते पाहूयात… जेव्हा आपण ठोस आकडेवारी पाहतो, तेव्हा चित्र पूर्णपणे वेगळे दिसते. या स्टेडियमचे पुनर्निर्माण झाल्यापासून टीम इंडियाने येथे तिन्ही फॉरमॅटमध्ये वर्चस्व गाजवले आहे. येथे खेळलेल्या 4 कसोटी सामन्यांपैकी भारताने 3 जिंकले आहेत आणि 1 सामना ड्रॉ राहिला आहे. म्हणजेच येथे भारत कसोटीत अपराजित आहे. 6 सामन्यांपैकी भारताने 5 सामने एकदिवसीय सामने जिंकले आहेत. केवळ 2023 ची ती एकमेव फायनल भारताने गमावली आहे.
इराण मीडल ईस्टचा लूजर, आज होऊ शकतो सर्वात मोठा हमला… डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
फेब्रुवारी 2021 पासून भारताने येथे 9 टी-20 सामने खेळले असून त्यापैकी 6 सामन्यांत दणदणीत विजय मिळवला आहे, तर केवळ 3 सामन्यांत पराभव झाला आहे. एकूणच सर्व फॉरमॅटचा विचार केला, तर भारताचा या मैदानावरील विजयाचा टक्का 75 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मग प्रश्न उरतो की केवळ दोन ICC इव्हेंटमधील पराभवामुळे मैदानाला ‘अनलकी’ म्हणणे योग्य आहे का? टीम इंडियाचा ही चौथा टी-20 वर्ल्ड कप फायनल आहे. 2007 आणि 2024 चे यश पाठीशी असलेला सूर्यकुमार यादवचा संघ आता विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी सज्ज आहे.
न्यूझीलंडचा संघ जरी धोकादायक असला, तरी भारतीय खेळाडू सध्या ज्या लयीत आहेत, ते पाहता इतिहास बदलण्याची हीच मोठी संधी आहे. अहमदाबादची खेळपट्टी फलंदाज आणि फिरकीपटूंना साथ देते, जिथे कुलदीप यादव आणि अक्षर पटेल सारखे गोलंदाज गेम चेंजर ठरू शकतात. क्रिकेट हा आकड्यांचा आणि मैदानावर त्या दिवशी तुम्ही कसा खेळता, याचा खेळ आहे. एखादे मैदान ‘अनलकी’ नसते, तर त्या दिवसाची परिस्थिती आणि दडपण खेळावर परिणाम करत असते.
2023 च्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी आणि चाहत्यांच्या मनातील नको ती भीती कायमची काढून टाकण्यासाठी 8 मार्चची फायनल ही सुवर्णसंधी आहे. जर भारताने येथे न्यूझीलंडला पराभूत करून ट्रॉफी उंचावली, तर नरेंद्र मोदी स्टेडियम हे भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात ‘लकी’ मैदान म्हणून ओळखले जाईल. रविवारी रात्री जेव्हा तिरंगा अभिमानाने फडकले, तेव्हा कदाचित चाहत्यांच्या सर्व तक्रारी दूर झालेल्या असतील!
