Video : जमाव आमच्यावर हल्ला करेल या भीतीने आम्ही घाबरलो होतो : कंगना रणौत
Delhi Protest Kangana ranaut कंगना रणौत यांनी सोमवारी झालेल्या आंदोलनानंतर संसद परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाल्याचा दावा केला आहे.
We thought mob would attack us too we were scared Kangana describes the atmosphere in Parliament : लोकसभा खासदार आणि भाजप नेत्या कंगना रणौत यांनी सोमवारी झालेल्या आंदोलनानंतर संसद परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाल्याचा दावा केला आहे. आंदोलकांकडून संसदेवर हल्ला होण्याची भीती अनेक खासदारांना वाटत होती, असे त्यांनी सांगितले.
कंगना रणौत म्हणाल्या, “त्या दिवशी संसदेत उपस्थित असलेले सर्व खासदार घाबरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव संसदेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. त्यामुळे आम्ही सर्वजण आतच अडकलो होतो आणि कुठेही जाऊ शकत नव्हतो. आंदोलकांचा जमाव ज्या पद्धतीने पुढे सरकत होता, त्यामुळे आमच्यावर हल्ला होईल की काय, अशी भीती निर्माण झाली होती.” यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करताना सांगितले की, आंदोलक आणि संसद यांच्यामध्ये ढाल बनून उभे राहत पोलिसांनी स्वतःवर दगडफेक आणि हल्ले सहन केले, तसेच अनेक जवान जखमीही झाले.
‘संसद चलो’ आंदोलनादरम्यान गोंधळ
सोमवारी सीजेपी या संघटनेच्या नेतृत्वाखाली ‘संसद चलो’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कडक सुरक्षा व्यवस्था, बहुपदरी बॅरिकेड्स आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अंतर्गत जमावबंदी लागू असतानाही हजारो आंदोलक जंतर-मंतर येथे जमा झाले. आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि इतर बळाचा वापर केला. या हिंसक घटनांसाठी आंदोलक आणि पोलिसांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.
दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप
सीजेपीने आरोप केला आहे की, ‘संसद चलो’ आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर अत्याधिक बळाचा वापर केला. या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो यांच्याशीही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
जंतर-मंतरवरील आंदोलनाचे व्यासपीठ हटवल्यानंतर आंदोलकांनी केरळ हाऊसजवळ आपले आंदोलन सुरूच ठेवले. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आरोप केला की, पोलिसांनी आंदोलकांवर अत्यंत कठोर कारवाई केली. अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापती झाल्या. तसेच एका १५ वर्षीय मुलीला पुरुष पोलिस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा आणि गीतांजली अंगमो यांच्या केसांना धरून त्यांना वाहनातून ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा त्यांनी केला.
#WATCH | Delhi | On the CJP protest outside Parliament yesterday, BJP MP Kangana Ranaut says, “All parliamentarians were inside the Parliament. We all were scared, thinking that the mob might attack us. I appreciate Delhi Police for playing the role of a shield, not letting… pic.twitter.com/Oop3B29PKw
— ANI (@ANI) July 21, 2026
दिल्ली पोलिसांचा आरोप फेटाळला
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, गीतांजली अंगमो यांच्याशी मारहाण किंवा केस ओढल्याचा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कारवाईदरम्यान कोणत्याही व्यक्तीला जाणूनबुजून मारहाण करण्यात आलेली नाही. तसेच दुर्भावनेतून बळाचा वापर किंवा कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य केल्याचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.