बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Beed) शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या 72 वर्षीय छबू देवकर यांचा रविवारी अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी छबू देवकर यांच्या तीन पुतण्यांसह तीन सुना अशा एकूण सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.
लोणी सय्यदमीर येथील देवकर कुटुंबात शेतातील बांध व पाइपलाइनच्या वादावरून गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरू होता. शनिवारी सायंकाळी घरासमोर लहान मुले चेंडू खेळत असताना किरकोळ भांडण झालं आणि त्याचे रुपांतर भीषण हाणामारीत झाले. त्यात तीन पुतण्यांनी व त्यांच्या सुनांनी मिळून कोयता आणि लोखंडी पाइपने छबू देवकर (वय 72) यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत त्यांचा मुलगा मिठू देवकर देखील जखमी झाला. गंभीर अवस्थेत छबू देवकर यांना अहिल्यानगर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बीडमध्ये खळबळ! सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर अज्ञात टोळक्याचा हल्ला, 4 महिला गंभीर
या घटनेनंतर गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे. छबू देवकर यांचा अंत्यसंस्कार पोलिस बंदोबस्तात लोणी सय्यदमीर गावात पार पडला. अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. त्यांनी दोन पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रविवारी पहाटे कारवाई केली आणि पुतणे रामदास, राहुल, संतोष देवकर तसेच सुना कविता, मनीषा व लता देवकर या सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.
गेल्या काही महिन्यांत बीड जिल्ह्यात गुन्हेगारीने टोक गाठल आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा ढवळून निघाला. बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे? पोलिसांच्या खाकीचा धाक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवरती आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अशातच बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा गावच्या शेजारील लोणीमध्ये शेत जमिनीच्या वादातून खून झाल्याची ही घटना समोर आली आहे.