धक्कादायक! बीडच्या माजलगावमध्ये 2 सख्ख्या बहिणींच्या अपहरणाचा प्रयत्न, काय घडलं?

ही कार महाविद्यालय परिसरातून २०० मिटर पुढे आंबेडकर चौकात आली असता लहान बहिणीने धाडस दाखवत मोठ्याने आरडाओरड केली.

  • Written By: Published:
Majlgaon

बीडच्या माजलगाव शहरात दोन बहिणींच्या अपहरणाचा (Beed) प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालय ते आंबेडकर चौक परिसरात घडली. लहान बहिणीने प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

याप्रकरणी भाग्यश्री हजारे यांच्या फिर्यादीवरून दिनेश पुरुषोत्तम देवकते (रा. येल्डा), मजहर सिकंदर सय्यद (रा. अंबाजोगाई), रवी बिभीषण निळे (रा. चौथाईवाडी, अंबाजोगाई) यांच्याविरोधात माजलगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई येथील रहिवासी असलेल्या दोघी बहिणी परळी तालुक्यातील पोहनेर येथून माजलगावला आल्या होत्या.

बीडच्या आष्टी तालुक्यात सरपंच पतीची आत्महत्या, पोलिसांकडून घटनेचा तपास

एक बहीण ही बीड येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती आजारी असल्यामुळे उपचारासाठी या दोन्ही बहिणी आपल्या मावसभावासोबत स्कुटीवरून माजलगाव येथील एका खासगी रुग्णालयात आल्या होत्या. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर, बायपास परिसरात एका हूंह्याई औरा (एमएच १२ डब्ल्यूएक्स ४१६७) या चारचाकी वाहनाने त्यांना अडवले. या गाडीतील व्यक्तींनी दोन्ही बहिणींना जबरदस्तीने गाडीत ओढले आणि गाडी लॉक करून शहराच्या दिशेने वेगाने पळ काढला.

ही कार महाविद्यालय परिसरातून २०० मिटर पुढे आंबेडकर चौकात आली असता लहान बहिणीने धाडस दाखवत मोठ्याने आरडाओरड केली. याचवेळी परिसरातील काही नागरिक तत्काळ घटनास्थळी जमा झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा डाव फसला आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महाविद्यालय परिसरात आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

follow us