Download App

MPSC : जाचक अटीमुळे विद्यार्थी मुख्य परीक्षेला मुकणार ?

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) या जाहिराती अनुसार एका पदास १२ उमेदवार या गुणोत्तराणे मुख्यसाठी पात्र केल्यास आमच्या अंदाजानुसार जास्तीत-जास्त १५-२० हजार उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र होतील. केंद्रातील स्टाफ सीलेक्शन कमिशन द्वारे घेण्यात आलेल्या (CHSL) लिपिक पदांचा टायपिंग स्किल टेस्टचा निकाल २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. या निकालाबद्दल काही तथ्य आम्ही आपल्याला निदर्शनास आणून देत आहोत, असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी सांगितले.

घरबुडे म्हणाले की, एकूण २८,५०८ उमेदवारांनी टायपिंग स्किल टेस्ट दिली होती. त्यापैकी फक्त १३,०८८ उमेदवार स्किल टेस्ट उत्तीर्ण करू शकले. म्हणजे प्रत्येक दोनपैकी एक विद्यार्थी टायपिंग टेस्टमध्ये अनुत्तीर्ण झाला. आताच्या नियमानुसार जर अंदाजे फक्त १५,००० उमेदवार मुख्यसाठी पात्र झाले आणि टायपिंग स्किल टेस्ट उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांचे गुणोत्तर (SSC) प्रमाणे काउन्ट केल्यास, स्किल टेस्ट उत्तीर्ण करणारे किमान ७,०३४ पात्र उमेदवार तरी मिळतील का? याबद्दल शास्वती देता येणार नाही, यामुळे पदे रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

राज्यसेवा परीक्षेत आयोगास तहसीलदार, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी असे वेगवेगळ्या विभागातील पदांची मागणीपत्रे येत असतात पण तेव्हा आयोग पूर्व परीक्षेनंतर विभाग/पदांनुसार कट ऑफ लावत नाही, राज्यभर एकच कॉमन कट ऑफ लावला जातो तर उमेदवारांकडून पदांसाठी घेण्यात आलेले  विभागाचे विकल्प फक्त अंतिम निवड यादी लावताना विचारात घेतले जातात. संयुक्त जाहिराती मध्ये देण्यात आलेली प्राधिकरणनिहाय कट ऑफची अट जाचक आहे, देशातील नोकर भरती करणाऱ्या संस्थांची उदाहरणे आम्ही आपल्याला दिली आहेत तसेच आयोगाचे स्वतःचे राज्यसेवा परीक्षेबद्दलचे धोरण या अटीबाबत विरोधाभासी आहे.

राज्यातील लाखो उमेदवार या परीक्षेसाठी तयारी करत असून, आजवरची आयोगामार्फत निघालेली ही सर्वात मोठी जाहिरात आहे. त्यामुळे विभाग/प्राधिकरण निहाय निकाल न लावता पूर्व परीक्षेनंतर राज्यस्तरीय एकच कट ऑफ लावण्यात यावा. राज्यसेवा जाहिराती प्रमाणे एकच कट ऑफ लावत अंतिम निवड यादी बनविताना फक्त उमेदवारांनी विकल्पात दिलेल्या विभागांचा/प्राधिकरणाचा विचार करत त्यांनी दिलेल्या प्रेफरेंस अनुसार नियुक्त्या देण्यात याव्यात. आता असलेली प्राधिकरणाची अट बदलताना मा.आयोगाने पाहिजे असल्यास राज्य सरकार, सामान्य प्रशासन विभाग किंवा मदत हव्या असलेल्या प्रत्येक यंत्रणेशी चर्चा करून तरतूद बदलावी ही विनंती. आजवर आयोगाच्या प्रत्येक निर्णयाचा आम्ही सन्मान करत आलो आहोत पण आता राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी लिपिक टंकलेखक पदभरती जीवन-मरणाचा प्रश्न आहे, त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आमची नम्र विनंती आहे की आम्ही सुचविला बदल तत्काळ अंमलात आणावा, असे महेश घरबुडे यांनी सांगितले.

पूर्व परीक्षेनंतर, मुख्यसाठी लिपिक-टंकलेखक पदांकरिता राज्यस्तरावर एकच कॉमन कट ऑफ लावण्यात यावा. प्राधिकरणनिहाय कट ऑफची अट रद्द करण्यात यावी. ७,०३४ पदे उपलब्ध असल्यास उदा. किमान १२ च्या गुणोत्तरात ७,०३४ × १२ = ८४,४०८ इतक्या उमेदवारांना मुख्य परिक्षा देण्याची संधी मिळावी, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.

Tags

follow us