अहिल्यानगर – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly elections) राज्यात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) अक्षरशः सुपडासाफ झाला आहे. नगर जिल्ह्यात देखील महायुतीने एकहाती बाजी मारली आहे. विधानसभेतील निकालानंतर नगर शहरात आता आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे. एकनिष्ठ पद्धतीने काम करून देखील टीकेचे धनी बनत असल्याने नाराज झालेल्या ठाकरेंचे शिवसैनिक आता वेगळा निर्णय घेण्याच्या दिशेने पाऊल टाकत असल्याची चर्चा सध्या नगर शहरात सुरु आहे.
जाणत्या राजाने जनाधार गमावला, आता राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी बसावं; विखेंचा पवारांना टोला
नाराज शिवसैनिकांची नुकतीच एक गुप्त बैठक पार पडली असून येणाऱ्या काळात नगर शहरातून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडणार असल्याचे देखील समजते आहे. ठाकर गटाचे नाराज झालेले बहुतांश पदाधिकारी व शिवसैनिक येत्या काही दिवसात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत किंवा भाजपात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे कोठेतरी नगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा हादरा बसणार हे मात्र नक्की
शिवसैनिकांच्या नाराजीच ‘हे’ आहे कारण
नगर शहरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले निलेश लंके यांनी विजयाचा गुलाल उधळवला होता. लंकेच्या विजयात नगरच्या शिवसैनिकांचा देखील मोठा वाटा हा होता. यामुळे लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी लंके यांनी शिवसैनिकांना पाठबळ द्यावे, अशी मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र जेव्हा विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, त्यांनतर आघाडीमध्ये उमेवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. नगरची जागा शिवसेनेला सोडण्यात यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र शिवसैनिकांमध्ये नावाविषयी एक वाक्यता न आल्याने ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली.
नगर शहरात शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक असताना तसेच शिवसेनेने हक्काचे मतदारसंघ जागावाटपात मित्र पक्षाला दिल्याने येथील पदाधिकारी नाराज झाले होते. याचा परिणाम निकालात देखील दिसून आला. नगर शहरातील शिवसेनेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्याने अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले. यातील काही जणांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत आपली राजकीय भूमिका अप्रत्यक्षपणे जाहीर केली. तर उर्वरित बहुतांश पदाधिकारी आता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत नुकतेच ठाकरे गटाच्या सध्या पदाधिकारी असलेल्या काहींमध्ये बैठक पार पडली. यामध्ये नाराज झालेले पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत तसेच भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे.
“मी तसं म्हणालोच नव्हतो”, मविआबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर दानवेंनी स्पष्टच सांगितलं
शपथविधीनंतर पदाधिकारी भूमिका जाहीर करणार…
राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून आता सत्तास्थापन कधी होणार? तसेच मुख्यमंत्री कोण होणार? याकडे राज्याच्या जनतेचे लक्ष लागलेले आहे. सध्या महायुतीला असलेले पूरक वातावरण पाहता सत्तेत कोणाला कशा पद्धतीने स्थान दिले जाणार यावर काही गणित अवलंबून असणार आहे. कारण विधानसभेनंतर महापालिकेच्या निवडणुका असणार आहे. मात्र त्याआधीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये नाराज ठाकरे गटातील पदाधिकारी शिवसेनेला सोडणार आहेत. राज्यात वरचढ ठरलेला भाजपाची ताकद विचारात घेता देवेंद्र फडणवीस यांना भेटून भाजपात प्रवेश करण्याचा एक मतप्रवाह या बैठकीत समोर आला आहे.
शिवसैनिकांसमोर ‘हे’ ठरू शकतात पर्याय
भाजपाबरोबरच विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे देखील जादू चालली. यामुळे नाराज सैनिकांकडे शिवसेनेचा पर्याय देखील उभा आहे. राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे यांच्याकडे काय जबाबदारी दिली जाणार? हे पाहून पुढच्या काही दिवसात नाराज शिवसैनिकांची दुसरी बैठक होणार आहे. ही बैठक ज्या दिवशी होईल, त्याच दिवशी हे सारे पदाधिकारी मुंबईकडे रवाना होतील आणि ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करतील, अशी व्युहरचना अंतिम झाली आहे. अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.
आघाडीची गळती रोखण्यात लंके अपयशी
नगर जिल्हयातून बारा आमदार निवडून आणू, अशी गवाही देणारे खासदार निलेश लंके यांना स्वतःच्या मतदार संघात बंडखोरी रोखण्यात अपयश आले. घराणेशाही करत लंके यांनी स्वतःच्या घरात तिकीट आणले असल्याने संदेश कार्ले हे नाराज झाले व अपक्ष उमेदवारी केली. याचा फटका राणी लंके यांना बसला व त्यांचा पराभव झाला. तर दुसरीकडे लंकेच्या विजयासाठी झटणारे शिवसैनिकांसाठी लंके यांनी नगर शहराच्या जागेसाठी वरिष्ठांना गळ घातली नसल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज झाले. निकाल विरोधात लागल्याने आता नाराज झालेले शिवसैनिक वेगळी भूमिका घेत आहे. त्यांनी असे पाऊल उचलू नये यासाठी त्यांना साद घातली जात आहे. मात्र शिवसैनिकांनी घेतलेली ठोस भूमिका पाहता आघाडीला लागलेली गळती रोखण्यात कोठेतरी खासदार निलेश लंके हे अपयशी ठरत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.