Download App

मणिपूरमधील सद्यस्थिती नेहरु अन् काँग्रेसमुळेच! नॉर्थ ईस्ट आमच्या काळजाचा तुकडा : PM मोदींची टीका

नवी दिल्ली : जे स्वत:ला राम मनोहर लोहियांचे वारसदार ठरवतात, त्याच लोहियांनी नेहरू जाणूनबुजून ईशान्य भारताचा विकास करत नसल्याचे म्हंटले होते. त्यामुळे तो भाग सर्व प्रकारच्या विकासापासून वंचित राहिला आहे. ज्या ठिकाणी लोकसभेच्या एक-दोन जागा होत्या त्याकडे काँग्रेसने (Congress) लक्ष दिले नाही. ईशान्य भारत आणि मणिपूरमधील सध्याच्या स्थितीला काँग्रेसच कारणीभूत आहे. पण आमच्यासाठी ईशान्य म्हणजे काळजाचा तुकडा आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी आघाडीवर टीका केली. ते लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते. (The present situation in Manipur is due to pandit jawahrlal Nehru and Congress said pm narendra Modi)

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

मोदी ईशान्य भारताला देशाचा भाग मानत नाहीत, अशी टीका विरोधी पक्षांनी केली होती. त्यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी तीन घटनांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, 5 मार्च 1966 रोजी काँग्रेसने मिझोराममधील असहाय नागरिकांवर हवाई केला होता. मिझोरामचे लोक भारताचे नागरिक नव्हते का? काँग्रेसने निष्पाप नागरिकांवर हल्ले केले होते. आजही 5 मार्चला संपूर्ण मिझोरममध्ये शोक पाळला जातो. काँग्रेसने हे सत्य लपवले होते, जखम भरण्याचा प्रयत्न कधी केला नाही. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. अकाल तख्तवरील हल्ल्याची आठवण सगळ्यांना आहे, पण असे हल्ले आधीच सुरू झाले होते.

दुसरी घटना 1962 ची आहे. ते धक्कादायक प्रसारण आठवते का? चीनकडून देशावर हल्ले होत होते. लोकांना मदतीची अपेक्षा होती. अशा कठीण काळात पंडित नेहरू म्हणाले होते की, my heart goes out to the people of Assam. नेहरूंनी तिथल्या लोकांना त्यांच्या नशिबावर जगायला सोडलं होतं.

जे स्वत:ला राम मनोहर लोहियांचे वारसदार ठरवतात, त्याच लोहियांनी नेहरू जाणूनबुजून ईशान्य भारताचा विकास करत नसल्याचे म्हंटले होते. त्यामुळे तो भाग सर्व प्रकारच्या विकासापासून वंचित राहिला आहे. ज्या ठिकाणी लोकसभेच्या एक-दोन जागा होत्या त्याकडे काँग्रेसने लक्ष दिले नाही.ईशान्य, मणिपूरमधील सध्याच्या स्थितीला काँग्रेसच कारणीभूत आहे. पण आमच्यासाठी ईशान्य म्हणजे काळजाचा तुकडा आहे, असेही मोदी म्हणाले.

ज्यांच्यात विश्वास नसतो ते ऐकवतात पण ऐकण्याचं धैर्य नसतं :

यावेळी मोदी म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूर घटनेवरुन पत्राद्वारे सविस्तर चर्चा करु, असं विरोधकांना सांगितलं होतं. विरोधकांनी या चर्चेला सहमती दर्शवली असती तर अनेक गोष्टी सुचवण्याची त्यांना संधी मिळाली असते. पण विरोधकांना चर्चा करण्यास रस नव्हता. अखेर विरोधकांनी या मुद्द्यावरुन अविश्वास प्रस्ताव आणला आहे, मात्र, अमित शाह यांनी मणिपूर घटनेवरुन सविस्तर चर्चा केली आहे. ज्यांच्यात विश्वास नसतो ते ऐकवतात पण ऐकण्याचं धैर्य नसतं, असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे.

Tags

follow us