Download App

9 Years of Modi Government : मोदींच्या मागे सावलीसाख्या उभ्या राहणाऱ्या खास नऊ व्यक्ती

9 Years of Modi Government :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकाराल 26 मे रोजी नऊ वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्ताने लेट्सअप मराठीने मोदींच्या गेल्या 9 वर्षातल्या कारकिर्दीवर खास सिरीज सुरु केली आहे.  या सिरीजमधील तिसरा विषय तुमच्यासमोर मांडत आहोत.

आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विशेष 9 सहकाऱ्यांविषयी जाणून घेणार आहोत.  यातील पहिले नाव म्हणजे अर्थातच केंद्रीय गृहमंत्री अमित अनिल चंद्र शाह होय. अमित शाह हे पहाडासारखे मोदींच्या पाठीमागे उभे राहिले आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये अमित शाह हे महत्वाच्या भूमिकेत राहिले. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमित शाह यांनी मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये काम केले. अनेक कठीण प्रसंगी शाह यांनी मोदींना साथ दिली आहे. यानंतर 2014 साली मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना त्यांच्यावर उत्तर प्रदेश राज्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत भाजपने 80 पैकी 71 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019 साली शाह यांनी लोकसभा निवडणूक लढवली व ते थेट देशाचे गृहमंत्री झाले. यानंतर अभूतपूर्व असे 370 कलम हटवण्याचे काम त्यांच्या नेतृत्वात पूर्ण झाले. त्यामुळे मोदींच्या या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम शाह यांनी केल्याचे दिसते.

यानंतर मोदींचे दुसरे प्रमुख सहकारी म्हणजे जे. पी. अर्थात जगतप्रकाश नड्डा होय. नड्डा हे सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अमित शाहांनंतर नड्डांच्या गळ्यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची माळ पडली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याआधी नड्डा हे मोदींच्या केंद्रीय मंत्रीमडळामध्ये होते. त्यांच्याकडे केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. 20 जानेवारी 2020 पासून त्यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. यापूर्वी जून 2019 ते जानेवारी 2020 या काळात ते भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष होते. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपच्या पक्षाची धुरा ही नड्डा यांच्या खांद्यावर राहणार आहे.

Letsupp Special : पंतप्रधान मोदींच्या 9 योजनांनी बदललं देशाचं चित्र

यानंतर मोदींचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे नाव म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल होय.  1999 च्या कंदहार विमान अपहरणाच्या वेळी, अजित डोभाल हे ऑपरेशन ब्लॅक थंडरमध्ये दहशतवाद्यांशी वाटाघाटी करणारे मुख्य अधिकारी होते. अजित डोभाल हे 33 वर्षे उत्तर-पूर्व, जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये गुप्तहेर होते. 2015 मध्ये मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर, म्यानमारच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशनचे ते प्रमुख नियोजक होते. जानेवारी 2016 मध्ये पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या काउंटर ऑपरेशनचे यशस्वी नेतृत्व केले. ‘संरक्षणमंत्री असोत की गृहमंत्री असोत किंवा पंतप्रधान असोत, सर्वांचा डोभाल यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना दिलेल्या कामाचे गांभीर्य त्यांना समजते. त्याचा सल्ला सर्वोत्तम आहे’, असे मत आयबीचे माजी प्रमुख अरुण भगत यांनी व्यक्त केले आहे.

यानंतर मोदींचे आणखी एक विश्वासू सहकारी म्हणून एस जयशंकर यांचे नाव घेतले जाते. जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी असून ते 31 मे 2019 पासून भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत. जयशंकर हे 2009 ते 2013 पर्यंत चीन आणि 2014 ते 2015 पर्यंत युनायटेड स्टेट्स अमेरिकामध्ये राजदूत होते. भारत-अमेरिका नागरी आण्विक कराराच्या वाटाघाटीमध्ये जयशंकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जयशंकर यांची काही विधाने ही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यांनी पाकिस्तान तसेच युरोपियन देशातील पत्रकारांना सडेतोड उत्तर दिल्याने सोशल मीडियावर त्यांचे उत्तराचे रील्स तुफान व्हायरल होत असून तरुणाईमध्ये त्यांच्या वक्तव्याची क्रेज तयार झाली आहे.

यानंतर मोदींची निकटवर्तीय म्हणून अश्विनी वैष्णव यांचे नाव घेतले जाते. अश्विनी वैष्णव हे राजस्थानमधील जोधपूर येथील रहिवासी आहेत. ते 1994 च्या बॅचचे आयएएस अधिकारी राहिले आहेत. त्यांनी जयनारायण व्यास विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि नंतर आयआयटी कानपूरमधून एमटेक केले. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून त्यांनी फायनान्समध्ये एमबीए केले. 8 जुलै 2021 पासून भारताचे रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून ते काम पाहत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या महत्वकांक्षी मानल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे डिझाईनपासून ते पुढील सर्व काम करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

9 Years of Modi Government : ऐतिहासिक कार्यकाळातील 9 वादळी निर्णयांचा आढावा

यूपी केडरचे IAS अधिकारी नृपेंद्र मिश्रा, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव होते. सध्या श्री राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष आहेत. 2014 मध्ये जेव्हा भाजपने बहुमताने सरकार स्थापन केले तेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच नरेंद्र मोदी आपल्या टीमसाठी ‘नवरत्न’ शोधू लागले. पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदासाठी त्यांना असा कर्तबगार अधिकारी हवा होता, ज्याला केंद्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव तर आहेच पण छातीवर डागही नाही. यासोबतच त्या अधिकाऱ्याला उत्तर प्रदेशची पूर्ण माहिती असावी. त्यामुळे त्यांनी नुपेंद्र शर्मा यांची नियुक्ती केली. त्यांनी त्यांच्या कामाने पंतप्रधान मोदींचा विश्वास जिंकला आणि 2019 मध्ये त्यांची पुन्हा पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती झाली.

यानंतर मोदींचे आणखी एक जवळचे नाव म्हणजे पी के अर्थात प्रमोद कुमार मिश्रा होय. प्रमोद कुमार मिश्रा हे मोदींच्या जवळच्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांची 11 सप्टेंबर 2019 रोजी प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रधान सचिव म्हणून नियुक्त झालेले मिश्रा आणि पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमध्ये एकत्र काम केले आहे. मिश्रा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींसोबतही काम केले होते. प्रशासकीय अधिकारी म्हणून मिश्रा हे काम विहित वेळेत कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी ओळखले जातात.

यानंतर मोदींचे आणखी एक जवळचे सहकारी म्हणजे अमिताभ कांत होय. अमिताभ कांत हे निती आयोगाचे दुसरे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सत्तेत आल्यानंतर नियोजन आयोग बरखास्त करुन त्याच्याजागी निती आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाचे अध्यक्ष म्हणून अमिताभ कांत यांनी काम पाहिले. यासह जी-20 परिषदेच्या पूर्णकालीन शेरपासाठी अमिताभ कांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक प्रकारे, या कार्यक्रमासंदर्भात देशातील सर्व एजन्सी आणि परदेशी एजन्सी यांच्यात समन्वय साधण्याचे मुख्य काम शेर्पा करतात.

या यादीतील शेवटचे व महत्वाचे नाव म्हणजे ए. के. शर्मा होय. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना एके शर्मा यांनी 2001 ते 2013 या काळात त्यांच्यासोबत काम केले. शर्मा यांची मोदींच्या सर्वात विश्वासू अधिकाऱ्यांमध्ये गणना होते. मोदी मुख्यमंत्री असताना ते सचिवालयात राहिले आणि तेथे विशेष सचिव ते प्रधान सचिवांपर्यंत त्यांनी काम केले. टाटा नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये आणण्यात एके शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यातही त्यांचे महत्त्वाचे योगदान मानले जाते. मोदी पंतप्रधान झाल्यावर एके शर्माही गुजरातमधून प्रतिनियुक्तीवर पीएमओमध्ये आले होते. त्यांना सहसचिव करण्यात आले. 2017 मध्ये त्यांना अतिरिक्त सचिव बनवण्यात आले. सध्या ते भारतीय जनता पक्षामध्ये असून उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये ते मंत्री आहेत.

 

follow us