मुंबई : इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत आज (दि.31) आणि उद्या (दि.1) पार पडत आहे. यासाठी देशभरातील 26 हून अधिक पक्षांचे 80 प्रमुख नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीत लोगो अनावरण, संयोजकपद, जागावाटप आणि पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यातील पंतप्रधानपद आणि जागावाटप हे दोन कळीचे मुद्दे सोडविताना सर्वाधिक खल होण्याची चिन्हे आहेत. (Allotment of seats in opposition alliance will be done on the basis of runner up formula)
इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? यासाठी राजकीय पक्षांमध्ये आपापल्या नेत्यांची नावे पुढे करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसून येत आहे. कालपर्यंत पंतप्रधानपदासाठी पाच जणांची नावं चर्चेत आली आहेत. यात सर्वात पहिले नाव आले ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे. दुसरे नाव आले तेर ममता बॅनर्जी यांचे.आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्यांनी पंतप्रधानपदासाठी अरविंद केजरीवाल यांचेही नाव पुढे केले. सपाच्या प्रवक्त्या जुही सिंग यांनी अखिलेश यांनचे नाव सुचविले आहे. तर शिवसेनेच्या (UBT) नेत्यांनी उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांच्या चेहऱ्याचा प्रश्न सोडवणे हे विरोधी आघाडीसमोर मोठे आव्हान असणार आहे.
विरोधी आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल? याबाबत अद्याप कोणीही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र रनर अप फॉर्म्युल्याच्या आधारे जागा वाटपावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
रनर अप फॉर्म्युला काय?
ज्या पक्षाचे विद्यमान खासदार आहेत ती जागा त्याच पक्षाला मिळेल. तर अन्य जागांवरील दावेदार ठरविण्यासाठी 2014 आणि 2019 मधील मतांचा विचार केला जाईल. या दोन्ही निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षांना त्या जागेवर प्राधान्य देण्यात येईल.
तर ज्या राज्यांमध्ये काँग्रेस खूपच कमकुवत आहे, तेथे प्रादेशिक पक्ष जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवतील. पंजाब-दिल्लीमध्ये 50-50 फॉर्म्युला लागू होऊ शकतो. जागावाटपाबाबत छोट्या पक्षांची मागणी जास्त आहे. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची भाजपशी थेट स्पर्धा नाही, त्या राज्यांमध्ये पक्षाने लहान भावाची भूमिका बजावली पाहिजे, असे प्रादेशिक पक्षांचे म्हणणे आहे.
आसाम, तेलंगणा, कर्नाटकसह 9 राज्यांमध्ये नेतृत्व काँग्रेसकडे असेल. म्हणजेच या 9 राज्यांमधील जागावाटपाचा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे.
जागावाटपाच्या रनरअप फॉर्म्युल्याचा अधिक फायदा कोणाला होणार, काँग्रेस की प्रादेशिक पक्ष, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. हे समजून घेण्यासाठी 2019 च्या निवडणुकीची आकडेवारी पाहणे आवश्यक आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 422 जागांवर उमेदवार उभे केले होते. यापैकी 19.7 टक्के मतांसह काँग्रेसने 52 जागा जिंकल्या होत्या. 209 जागांवर काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या तर 99 जागांवर तिसऱ्या क्रमांकावर होते. यानुसार आता जागावाटपाचा रनरअप फॉर्म्युला ठरला तर काँग्रेसला 261 जागा मिळतील. मात्र यात पंजाब आणि दिल्लीमध्ये 50-50 फॉर्म्युला लागू झाल्यास काँग्रेसच्या जागा घटू शकतात.
तृणमूल काँग्रेसबद्दल बोलायचे झाल्यास तृणमूलने 63 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि 22 जागा जिंकल्या होत्या. तर 19 जागांवर उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. यानुसार इंडियात तृणमूलच्या वाट्याला 41 जागा येऊ शकतील. समाजवादी पक्षाने पाच जागा जिंकल्या आहेत आणि 31 जागांवर दुसऱ्या स्थानावर होते. या फॉर्म्युल्यानुसार सपाला 36 जागा मिळतील.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (यु) या पक्षाने 25 जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी 16 जागा जिंकण्यात यश आले. तर जेडीयू एका जागेवर दुसऱ्या क्रमांकावर होती. त्याचवेळी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल अर्थात राजदचे 19 उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. जर या फॉर्म्युल्यानुसार जागावाटपाचा विचार केला तर 16 खासदार असलेल्या जेडीयूला 17 जागा मिळतील आणि शून्य खासदार असलेल्या राजदला 19 जागा मिळतील.
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 उमेदवार विजयी झाले होते. तर तीन जागांवर उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. मात्र आता पक्ष फुटला आहे. त्यानंतरही जर शिवसेनेच्या जुन्या मतांनुसार जागा वाटप झाल्यास रनर अप फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 21 जागा सुटू शकतात. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागा मिळाल्या होत्या आणि 15 जागांवर उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. यानुसार राष्ट्रवादी 20 जागांवर दावा करू शकते. डीएमके 23, सीपीआय(एम) 16, कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ला 16, कम्युनिस्ट पक्षाला 6, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय लोक दल, इंडियन युनियन मुस्लिम लिग, नॅशनल कॉन्फरन्सला प्रत्येकी तीन, कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी)ला एक जागा मिळेल. तर मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही.
अनेक राजकीय जाणकार जागा वाटपाचा प्रश्न सोडवण्यासाठी रनर अप फॉर्म्युला हा सर्वोत्तम पर्याय मानत आहेत. पण आकडेवारी पाहिली तर यामुळे अनेकांचा घोळ होऊ शकतो. त्यामुळे यावर एकमत होणे कठीण मानले जात आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसने 200 जागा लढवाव्यात असे म्हटले होते. मात्र रनर अप फॉर्म्यूल्यानुसार, काँग्रेसला 261 जागा मिळू शकतात. पण दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सरकारे आहेत, पण त्यांना फक्त तीन जागा मिळतील. पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांना एकही जागा मिळणार नाही, त्यामुळे आम आदमी पक्ष आणि डाव्यांना हा फॉर्म्यूला मंजूर होऊ शकणार नाही. बिहारमध्ये शून्य खासदार असलेल्या आरजेडीला जेडी (यु) 19 जागा सोडणार का? महाराष्ट्रातीलही बहुतांश जागा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात विभागल्या जातील. त्यामुळे काँग्रेस या सूत्रावर सहमत होणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.