दिल्ली : अमेठी आणि रायबरेली या दोन पारंपारिक मतदारसंघांसाठी काँग्रेसने स्पेशल प्लॅन आखला आहे. याअंतर्गत काँग्रेसने सोमवारी (6 मे) रायबरेलीसाठी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) आणि अमेठीसाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दोन सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ शिलेदारांच्या जोडीला प्रियांका गांधी याही या दोन्ही मतदारसंघांमध्ये मुक्काम करणार आहेत. (Congress has appointed former Chief Minister of Chhattisgarh Bhupesh Baghel for Rae Bareli and former Chief Minister of Rajasthan Ashok Gehlot for Amethi.)
काँग्रेसने शुक्रवारी (तीन मे) राहुल गांधी यांना रायबरेलीतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्याचवेळी काँग्रेसने गांधी घराण्याचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. रायबरेली हा सोनिया गांधी यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. 2004 ते 2024 या काळात सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, आता त्या राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. गतवेळी अमेठीमधून झालेल्या पराभवानंतर रायबरेली मतदारसंघातून निवडून येणे हे राहुल गांधी यांच्यासमोरचे मोठे आव्हान असणार आहे.
रायबरेली आणि अमेठी या दोन्ही पारंपारिक जागांवर पक्षाचा विजय निश्चित करण्यासाठी प्रियंका गांधी या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. सोमवारपासून मतदान संपेपर्यंत या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मुक्कामी असणार आहेत. या काळात त्या शेकडो कोपरा सभा, जाहीर सभा आणि घरोघरी प्रचार करणार आहेत. याशिवाय बूथ व्यवस्थापनापासून ते प्रचार कार्यक्रमांपर्यंत सर्व गोष्टींचा स्वतः आढावा घेणार आहेत. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांपर्यंत , माजी सैनिक, व्यापारी, शेतकरी आणि गांधी कुटुंबाशी अनेक दशकांपासून कौटुंबिक संबंध असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
दोन्ही मतदारसंघातील डिजिटल आणि सोशल मीडिया प्रचारावरही प्रियंका गांधी स्वतः लक्ष ठेवणार आहेत. काँग्रेसचे प्रमुख खर्गे, भूपेश बघेल आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट या प्रमुख नेत्यांच्या प्रचार नियोजन आणि कार्यक्रमही प्रियंका गांधीच ठरवणार आहेत. जवळपास रायबरेलीमधील 250-300 आणि अमेठीमधील 250-300 गावांमध्ये पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहेत. थोडक्यात दोन्ही मतदारसंघांना त्या समान वेळ देणार आहेत.
रायबरेलीत फिरोज गांधींनी घातलेला भक्कम पाया नंतर त्यांच्या पत्नी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जोपासला आणि मजबूत केला. इंदिरा गांधींनी 1967, 1971 आणि 1980 मध्ये इथून विजय मिळविला होता. त्यांच्यानंतर अरुण नेहरु, शैला कौल, कॅप्टन सतीश शर्मा यांच्यासारख्या गांधी घराण्याच्या जवळच्या लोकांनी या जागेचे प्रतिनिधित्व केले. तर 2004 पासून या मतदारसंघातून सोनिया गांधी यांनी या मतदारसंघातून एकहाती विजय मिळविला.2019 मध्येही त्यांनी भाजपच्या दिनेश प्रताप सिंह यांचा 1,67,000 मतांनी पराभव केला होता.
अमेठी हाही काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आधी राजीव गांधी यांनी या मतदारसंघातून विजय मिळविला. तर 1991, 1996 मध्ये सतीश शर्मा, 1999 मध्ये सोनिया गांधी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2004 पासून अगदी 2014 पर्यंत इथून राहुल गांधी यांनी विजय मिळविला. 2019 मध्ये मात्र स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये राहुल गांधींचा 55,000 हून अधिक मतांनी पराभव केला. आता यंदा राहुल गांधींना रायबरेलीमधून तर अमेठीमधून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी मिळाली आहे.