Download App

हरियाणाची लढाई ‘आप’ला टफ, केजरीवालांना 5 चॅलेंज; ‘त्या’ घोषणेने केली वाट बिकट?

पाच गॅरंटीच्या मदतीने हरियाणाची लढाई जिंकू असे पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. पण आधीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर वाटचाल सोपी नाही.

 Haryana Assembly Elections 2024 : दिल्ली आणि पंजाबमध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणाऱ्या आम आदमी पक्षाची नजर आता हरियानावर (Haryana Assembly Elections 2024) आहे. राज्यात स्वबळावर लढण्याची घोषणा पक्षाच्या नेत्यांनी केली होती. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी हरियाणातील नागरिकांसाठी (Haryana Politics) केजरीवाल यांच्या पाच गॅरंटी लॉन्च केल्या. यावेळी खासदार संजय सिंह, संदीप पाठक, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

या पाच गॅरंटीमध्ये राज्यातील नागरिकांना मोफत वीजपुरवठा, सर्वांना चांगल्या दर्जाच्या मोफत आरोग्य सुविधा, सर्व महिलांना दरमहा एक हजार रुपये तसेच प्रत्येक युवकाला रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा पक्षाने केली आहे. आता या पाच गॅरंटीच्या मदतीने हरियाणाची लढाई जिंकू असे पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. पण आधीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर वाटचाल सोपी नाही.

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यातील दहा पैकी एकही जागा आपला जिंकता आलेली नाही. या दहापैकी एकच जागेवर उमेदवार दिला होता मात्र येथेही विजय मिळवता आला नाही. तसेच मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या (AAP) सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे हा इतिहास पाहता यंदाही आपसाठी निवडणूक सोपी नाही.

वयाच्या १४ व्या वर्षांपासून व्हिलचेअरवर; ४ वेळा ‘UPSC’पास पण नोकरी नाकारली, कार्तिक यांची व्यथा

ऑक्टोबर 2012 मध्ये पक्षाची स्थापना झाल्यानंतर अतिशय कमी वेळात आम आदमी पार्टीने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला. राजधानी दिल्लीत (New Delhi) तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. पंजाबमध्येही काँग्रेसचा (Congress Party) पराभव करत सत्ता काबीज केली. त्यामुळे हरियाणातही विजय मिळेल असा दावा पक्षाचे नेते करत आहेत. मात्र पक्षासमोर आव्हाने जास्त आहेत. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो याची माहिती थोडक्यात घेऊ या..

पक्षाकडे बळकट चेहरा नाही

पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल स्वतः हरियाणाचे आहेत. 2022 मध्ये पंजाब निवडणुकीच्या (Punjab Elections) निकालनंतर त्यांनी हरियाणाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. परंतु दिल्लीत दारू घोटाळा (Delhi Liquor Scam) उघडकीस आला आणि सगळे चित्रच पालटले. या घोटाळ्यात बऱ्याच दिवसांपासून केजरीवाल तुरुंगात आहेत. त्यामुळे प्रचाराचे नेतृत्व करू शकत नाहीत. आताच्या घडीला पक्षाकडे कोणत्याच नेत्याचा चेहरा नाही.

भारतीय जनता पार्टीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पार्टी अध्यक्ष जेपी नड्डा, माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बडौली यांच्यासह अनेक नेते आहेत. काँग्रेसकडे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, प्रदेशाध्यक्ष चौधरी उदयभान, खासदार कुमारी शैलजा, खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्यासह अनेक नेते आहेत. हे सगळे नेते पक्षाच्या प्रचारात गुंतले आहेत. आम आदमी पार्टीकडे सध्या नेत्यांचा दुष्काळ आहे.

कमी मतांची टक्केवारी

आम आदमी पार्टीने सन 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढल्या होत्या. या निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. तसेच पक्षाच्या मतांची टक्केवारी देखील कमी होती. अशा परिस्थितीत हरयाणात चांगली कामगिरी करणे पार्टीसाठी सोपी गोष्ट राहिलेली नाही.

हरियाणा विधानसभा निवडणूक; सुनीता केजरीवालांकडून मोठ्या घोषणा, ‘या’ पाच योजनांचं हमीपत्रं जारी

कोण करणार नेतृत्व?

आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हरियाणात पक्षाच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व कोण करणार? भाजप (BJP) आणि काँग्रेस त्यांच्या नेत्यांच्या नेतृत्वात निवडणुकीत उतरले आहेत. तर आपने सुनीता केजरीवाल यांच्यामार्फत पाच गॅरंटी जाहीर करून मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही अरविंद केजरीवाल तुरुंगात असल्याने प्रचाराचे नेतृत्व कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न सध्या आपसमोर आहे. या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

अग्निवीर, शेतकरी आंदोलन प्रमुख मुद्दे

हरियाणाच्या निवडणुकीतील (Haryana Elections) महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार केला तर यामध्ये अग्नीवीर आणि शेतकरी आंदोलन प्रमुख आहेत. एमएसपीला कायदेशीर गॅरंटी देण्याच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शेतकरी संघटना पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत आहेत. हरियाणाच्या निवडणुकीत दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा अग्नीवीर योजनेचा आहे. या दोन्ही मुद्द्यांचा संबंध थेट केंद्र सरकारशी आहे. केंद्रात भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकार (NDA Government) आहे. अशा परिस्थितीत भाजपसाठी हे दोन्ही मुद्दे एखाद्या आव्हानपेक्षा कमी नाहीत.

जाट नेतृत्वाचा अभाव

हरियाणात जाट समाजाचे प्राबल्य आहे. राज्यात समाजाची लोकसंख्या जवळपास 25 टक्के आहे. हरियाणात आम आदमी पक्षाची कमान सुशील गुप्ता यांच्याकडे आहे. आजमितीस पक्षाकडे या समाजाचा एकही लोकसभा किंवा राज्यसभा खासदार नाही. राज्यातील सत्ताधारी भाजपनेही मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांवर अन्य समाजाच्या नेत्यांना प्राधान्य दिले आहे. भाजपकडे राज्यसभा खासदार सुभाष बराला, माजी मंत्री किरण चौधरी, राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश धनखड, माजी मंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्यासारखे जाट नेते आहेत. काँग्रेसकडे सुद्धा काही जाट नेते आहेत. पण आम आदमी पार्टीकडे संपूर्ण राज्यात प्रभाव असणारा एकही जाट नेता नाही.

एकला चलो मुळे वाढल्या अडचणी

हरियाणात आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक लढत आहे. त्यामुळे आता पक्षाला राज्यात एकही सहकारी नाही. येथील स्थानिक पक्ष इंडियन नॅशनल लोकदलाने बसपाबरोबर आघाडी केली आहे. या राजकीय परिस्थितीत आम आदमी पक्षाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आता एकट्यानेच निवडणुका लढून चांगली कामगिरी करुन दाखवण्याचे आव्हान पक्ष नेत्यांसमोर उभे आहे.

follow us